ओपेनहायमर

ओपेनहायमर
स्फोटानंतरच्या आग,राखेचा मोठ्या लोळात...कानठळ्या बसवणारा आवाज योग्य त्या ठिकाणी म्युट करून येणाऱ्या साउंडच्या पार्श्वभूमीवर फक्त दुर्बिणीतून बघणाऱ्या ओपेनहायमरच्या आतबाहेर होणाऱ्या  श्वासाचा आवाज... ऐकू येतो हे प्रतीकात्मक आहे. इतका मोठा विध्वंस करू शकणाऱ्या शोधानंतर श्वासाचे असणेच आशादायी व जिवंत असू शकते. बाकी शस्र तर नरसंहारक आहेतच. 


चाचणी यशस्वी झाल्यानंतर बॉम्ब घेऊन जात असलेल्या पाठमोऱ्या गाड्या ....लक्षात येईल इतक्या वेळ दिसत राहतात. इथे रॉबर्टचा त्याच्या पूर्ण टीमचा आता काहीही  कंट्रोल राहिलेला नाही.... त्यांचा प्रयोग पूर्ण होऊन त्यांनी लावलेला शोध आता त्यांचा न राहता  सर्व गव्हर्मेंट व आर्मीच्या हाती गेलेले आहे... 


..आणि कुठल्या शहरावर बॉम्ब टाकायचा यासाठी शॉर्टलिस्ट करण्यासाठीची मिटिंग ... टोकियो यासाठी वाचते कि बॉम्ब ज्यांना टाकायचा आहे त्यातील एकाचा हनिमून तिथे होता...ते उध्वस्थ होतांना तो बघू शकत नव्हता...  एखाद्या शहराचे नशीब असेही त्याला वाचवते... सत्ताधारी ज्या काळात अमेरिका होती तेव्हाची गोष्ट...पॉवर!?


हिरोशिमानंतर झालेल्या मोठ्या सत्काराप्रसंगी ओपेनहायमरला काही वेगळे बोलायचे असते. तो बोलतो काहीतरी वेगळे. त्याला बोलायचे असते ते तिथल्या कुणालाही आवडणार नाही याची त्याला जाणीव असते पण त्याच्या मनातले विचार प्रचंड फोर्सने बाहेर पडू पाहतात या वेळेचे साउंडस व एक्स्प्रेशन याला तोड नाही.... 


आणि एकूणच खूप काही ... रिसर्च anlysis..मेहनत, स्क्रिप्ट...फ्रेम टू फ्रेम जाणवत राहते. 


फक्त इतक्या सुंदर फ्रेम्सवर अत्यंत भडक पद्धतीने जाड font मध्ये धुम्रपान स्वास्थ के लिये हानिकारक है असे लिहून नोलानच्या कलाकृतीवर जी भारतीय कारागिरी दाखवली आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवता आली असती.


- समाधान महाजन

दहाड व द ट्रायल: प्यार क़ानून धोखा

दहाड व द ट्रायल: प्यार क़ानून धोखा


1) दहाड - सोनाक्षी सिन्हा ची वेब सिरिज पेक्षा त्या टिमची सिरिज आहे. मुख्य स्टोरी तर आहेच. पण अनेक बारीक सारिक घटना प्रसंग यातून जी सामाजिक, राजकीय, मानसिक संरचना उभी केली आहे ती बघण्यासारखी आहे. अनुभवण्यासारखी आहे. जात, स्रि-पुरुष नाते, समाज व त्यातील उतरंडी... पोलिस प्रशासन तर राजकारण अनेक पैलू यात बघण्यासारखे आहेत. जन


2)  द ट्रायल: प्यार क़ानून धोखा- नावाप्रमाणे ही सिरिज आहे. काजोल यात आहे. स्टारकास्टची सिरिज आहे. मात्र यातही प्रकर्षाने जाणवनार्‍या अनेक बाबी आहेत. 

आजकाल कुटुंब ही संस्था मोडकळीस आली की काय असे वातावरण आजूबाजूला असतांना त्यातील एका कुटुंबाला सामोरे जावी लागणारी घटना व नंतर घटनांची मालिका आहे. मुलांपुढे आजकाल तुम्ही काहीही लपवू शकत नाहीत. त्यामुळे additional जज असलेल्या बापावर झालेल्या सेक्सोर्टेशनच्या आरोपवरील प्रश्नांना व त्या क्लिप्सला सामोरे जातांना ही पिढी नक्की काय समजून घेतेय व जे समजून घ्यायचेय ते मनाच्या नक्की कोणत्या कोपर्‍यात कुठे ठेवायचे की त्याचा चांगला योग्य त्या ठिकाणी वापर करून प्रश्न कमी करायचे हे बघण्यासारखे आहे.   

- समाधान महाजन 

अजमेर 92 व सिर्फ एक ही बंदा काफी है....

अजमेर 92 व सिर्फ एक ही बंदा काफी है....

 

1) ' सिर्फ एकही बंदा काफी हैं ...' 

बघण्यासारखा आहे. यातील अनेक बाबी सुंदर आहेत. असारामचा खटला सर्वांना माहिती आहे व शेवट देखील. त्यातील कोर्टरूम ड्रामा आतील व बाहेरील अशा दोन्ही बाबींवर हा बेस्ड आहे. 

यातील एक बाब उल्लेखनीय आहे...त्या मनोज वाजपेयी बनलेल्या ओरिजीनल पी.सी.सोलंकी या वकिलाचा पोस्को कायद्याचा अभ्यास सखोल आहे. ..तितका अभ्यास  कुणाचाच नसतो...भारतातील दिग्गज वकील त्याच्या या अभ्यासाच्या कमांडमुळे हरतांना दिसतात. त्यात रामजेठमलानी,सुब्रह्मण्यम स्वामी, सलमान खुर्शीद आदि दिग्गज वकिलांचा समावेश होता. पण आरोपीला जामीन मिळवू दिला नाही. यातील मनोज वाजपेयीचे काम नेहमीप्रमाणे उत्तमच. 

जे करायचे ते जीव लावून व इतकं पक्क करायचे की कोणतीच पळवाट त्यात राहिली नाही पाहिजे. मग अख्खं जग विरोधात असेल तरी बेहत्तर अभ्यासावरची पकड विजयश्री खेचून आणण्यात समर्थ असते. म्हणून तर सिर्फ एकही बंदा काफी असतो.

2)अजमेर 92

चित्रपट. 

मुलींनी घरात बोलायला हवं. 

मुलींनी घरात मनमोकळ बोलावं असं वातावरण व हेल्दी रिलेशन घरात असायला हवं.....

नसेल तर किमान जाणीवपूर्वक  तयार करायला हवं....

घरात न बोलल्यामुळे व तितका विश्वास वाटत नसल्याने बाहेरील छोटीशी घटना नंतर आयुष्य उद्ध्वस्त करते... 

हा चित्रपट जळगाव स्कँडलची आठवण करून  देणारा आहे. अजमेर ची घटना 1992 ला उघडकीस आली तर जळगाव भुसावळ ची घटना 1994 च्या आसपास उघडकीस आली होती. या दोन्ही घटनेत जितक्या केसेस रेकॉर्ड वर आल्या त्यापेक्षा जास्त रेकॉर्ड झाल्याच नाहीत...अनेक घर व आयुष्य उध्वस्त झालीत..

हेल्दी संवाद आयुष्य वाचवू शकतो.....

- समाधान महाजन 

राकेश वानखेडे- पुरोगामी, गिनी पिग, १२४अ

 राकेश वानखेडे यांच्या तीन कादंबऱ्या टप्याटप्प्याने वाचून पूर्ण झाल्या. गिनी पिग कोरोना काळात वाचनात आली होती तर आधी प्रकाशित झालेली पुरोगामी व आताची एक दोन चार अ या दोन्ही कादंबऱ्या अलीकडे वाचून पूर्ण झाल्या. गिनी पिग मधील नवोद्दत्तरी बदललेल्या एकूणच पार्श्वभूमीवर मांडलेला कादंबरीचा पैस माझ्यासारख्या समकालीन असलेल्याला जास्त जवळचा वाटतो. ते सर्व सूक्ष्म बदल वानखेडे यांनी ज्या नजाकतीने टिपले आहेत त्याला तोड नाही. उगाचच मध्यमवर्गीय घरातील केबल व टीव्ही पुरत्या बदलाची हि नांदी नाही तर पार आतून विस्कटून टाकणाऱ्या क्षणांच्या नोंदी आहेत.

पुरोगामी व १२४ अ या दोन्ही कादंबऱ्या वाचतांना सतत जाणवत राहते कि महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय सामजिक व विशेषतः चळवळीतील बदलांचा आढावा किंवा त्यांच्याबाबतचे चितन कारणमीमांसा हि पहिल्यांदाच इतक्या विस्तृतपणे वाचायला
मिळत आहे.  पुरोगामी मधील सामाजिक चळवळी बद्दलचे व त्यातील व्यक्तिंबद्दलचे  वर्णन व विश्लेषण वाचतांना सतत जाणवत होते कि महाराष्ट्रातील इतक्या व्यापक घडामोडींचा धागा आजच्या पिढीपासून सुटतोय कि काय?

दलित चळवळ, बाबासाहेबांची, त्यानंतरची, त्यातील अनेक फाटाफूट, गट तट,  समाजवादी, कम्युनिस्ट, कॉंग्रेस, प्रजा समाजवादी, शेकाप, आणि एकूणच महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ त्यातील व्यक्ती व त्यांचे अंतःस्तर हे सर्व  किमान माहिती होण्यासाठी  या कादंबऱ्या वाचणे गरजेचे आहे.

- समाधान महाजन