रॉकेट बॉइज

रॉकेट बॉइज ही भारताच्या अंतरीक्ष व आण्विक कार्यक्रमावर आधारित एक चांगली वेब सिरिज आहे. सिनेमेटिक लिबर्टी म्हणून काही बाबी सोडल्या तर एकूणच स्वातंत्र्यानंतर या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत यावर एक चांगला प्रकाश टाकला आहे. 

तत्कालीन भारताची आर्थिक परिस्थिति. देशापुढील प्राथमिकता वेगळ्याच असतांना असा खर्चीक असणार्‍या प्रकल्पांना मान्यता देणारे तेव्हाचे नेहरूनसारखे पंतप्रधान किती दूरदृष्टीचे होते हे आपल्याला समजते. हा धागा इंदिरा गांधीपर्यन्त जातो. 1974 चे पोखरण पर्यंतचा प्रवास रॉकेट बॉइज 2 मध्ये आहे. 

भारत हा एक अद्भुत देश आहे. भारताचा स्पेस रिसर्च प्रोग्रॅम व आण्विक कार्यक्रम पाहिला तर असे दिसते की किती संघर्षातून आपल्याला हा वैभवशाली वारसा मिळाला आहे. होमी भाभा, विक्रम साराभाई, राजा रामन्ना, अब्दुल कलाम ही माणसे म्हणजे एक कर्तुत्वशाली इतिहास रचलेली माणसे आहेत. ही माणसे झपाटलेली होती. 

इतिहास हा उगाचच तयार होत नाही. भव्यदिव्य काम करायला व तितके मोठे नाव व्हायला तितकीच मेहनत घ्यावी लागते.  कोणतेही मोठे काम करायचे असेल तितके डेडिकेशन लागते. झपाटून देऊन काम करावे लागते. आणि कोणतीही पळवाट शोधता येत नाही. बरीच कामे स्वतःला करावी लागतात. 

इतका मोठा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यानंतर तयार झाला. हे फार मोठे आश्चर्य मानले पाहिजे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अंतरराष्ट्रीय परिस्थिति वेगळी होती. रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्धामुळे भारतासारख्या देशांकडे फारसे स्वातंत्र्य त्या बाबतीत नव्हते. हे त्या सिरिज मध्ये देखील दिसते. आजपर्यंत या क्षेत्रातील इतक्या घटना पहिल्यांदाच सामान्य मानसापुढे येत आहेत. होमी भाभा, साराभाई, अब्दुल कलाम, राजा रमान्ना यांच्या  बद्दल माहीत नसलेली अनेक सत्य यानिमित्ताने पुढे येत आहेत.  

- समाधान महाजन 


वाचता वाचता - गोविंद तळवळकर

 

अलीकडे गोविंद तळवलकर यांचे ‘वाचता वाचता’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1979 मध्ये आलेली आहे. यात त्यांचे त्या काळातील अग्रलेख किंवा स्तंभलेख असण्याची शक्यता आहे. हा तोच काळ होता जेव्हा भारतात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू होता. आणीबाणी जाऊन जनता पक्षाचे सरकार आले होते. त्यामुळे काही ठिकाणी आणीबाणीचे संदर्भ येतात. 

मी आतापर्यंत गोविंद तळवलकर यांच्या विषयी विविध ठिकाणी वाचले होते. काही ठिकाणी त्यांचे लेख वाचले होते. पण त्यांचे हे मी वाचलेले केवळ दुसरे पुस्तक. सत्तांतर भाग 2 हे पुस्तक देखील या आधी माझ्या पुस्तकाच्या संदर्भात मी वाचले होते. पण या दोन्ही पुस्तकात फरक आहे. सत्तांतर मध्ये आधुनिक भारताचा इतिहास येतो. पण या पुस्तकातून तळवलकर यांचा व्यासंग कळतो. त्यांचे देशोदेशीचे भान व समकालीन वाचन कळते. तत्कालीन अनेक महत्वाच्या घटना ज्या आताची जगभरातील पिढी कदाचित विसरून गेलेली असेल त्या पुन्हा वाचनात आल्या. अनेक प्रसिद्ध व्यक्ति, त्यांचे जगाने, त्यांच्या स्वभावातील विविध पैलू, एकमेकांशी असलेले सबंध असा सर्व अभ्यास मुळ अधिकृत पुस्तकातून करून अगदी मोजक्या शब्दात त्यांनी वाचकांपुढे मांडला आहे.    

डोंबिवलीत 1925 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. 22 मार्च 1917 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 1965 ते 1995 अशी 29 वर्ष ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते. म्हणजे हे पुस्तक त्यांचये संपादक पदि असतांना आलेले होते. अभिनेते शरद तळवलकर हे त्यांचे काका. टाइम्स मधील त्यांचे अग्रलेख राज्यात गाजत असत. चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा कुसुमाग्रजांची कविता दैनिकाच्या पहिल्या पानावर त्यांनी छापली होती. 

अनेक दर्जेदार इंग्रजी लेखक व पुस्तकांची नावे त्यांच्या या वाचता वाचता या पुस्तकात मिळाली. संग्रही ठेऊन संदर्भ म्हणून वापरावे असे हे पुस्तक आहे. 

- समाधान महाजन 


रौंदळ

ख्वाडा, बबन आणि आता रौंदळ...

भाऊसाहेब शिंदे अभिनित जेही चित्रपट आले ते अगदीच वेगळे व अस्सल ग्रामीण मातीतील आहेत. यातील कथा, संवाद भाषा ऐकतांना आपण गावात असल्याचाच फील येतो. कुठेही कृत्रिमता भासत नाही. रौंदळ सध्या सगळीकडे चांगला सुरु आहे. आधीचे दोन चित्रपट बऱ्यापैकी ग्रामीण जातीय वास्तव जे स्लो पॉइझनिंग सारखे पसरलेले असते त्या वर्मावर बोट ठेवणारे होते तर रौंदळ हा क्लास (वर्ग) व्यवस्थेवर जोरदार भाष्य करणारा आहे.

उस पिकविणारा शेतकरी हा कायम तालेवार, बागायतदार व श्रीमंत शेतकरी असल्याचा काहीसा शहरी सूर असतो. अर्थात जो त्या प्रक्रियेतील आहे त्याला यातील बारकावे चांगले माहिती असतात. अशा राबणाऱ्या शेतकऱ्याचा उस अनेक बाबींवर अवलंबून असतो. त्यातील महत्वाचे म्हणजे उसाला चांगला भाव मिळून तो योग्य वेळेत कारखान्याकडे गाळपासाठी जाणे. यातील वेळेचे गणित थोडेही चुकले कि चार पाच एकर शेती असलेला शेतकरी अक्षरशः घायकुतीला येतो. तो त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. अस्तित्वाचा प्रश्न असतो.

त्याच्या याच अस्तित्वाच्या वाटेवर एखादा मतांच्या गणितासाठी जर इगोचा फना काढून उभा राहत असेल तर संघर्ष जीवघेना बनतो. आयुष्य पणाला लागते. असच काहीस रौंदळ उभे करतो अर्थात ते थिएटर मध्ये जाऊन बघण्यासारखे आहे. भाऊसाहेब शिंदे पहिल्या चित्रपटापासून जोरदार आहे. यातही तो आपला ग्रामीण रांगडी बाज राखून आहे. त्याला ते जमते किबंहुना ते त्याच्या अंगात आहे असे दिसते. चित्रपटातील आजोबा आवडले. ग्रीप चांगलीच आहे. तत्सम तद्भव पुणेरी चॉकलेट, कॅडबरी मराठी चित्रपटांपेक्षा असा एखादा वास्तव चित्रपट नक्की पाहायला हवा.

निर्माते बाळासाहेब शिंदे व भाऊसाहेब शिंदे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. खरतर ग्रामीण भागात लोकांपर्यंत चित्रपट गेला पाहिजे. आम्हाला पिकवता येत पण विकता येत नाही .....त्याचे परिणाम पोहचले पाहिजे.