जे पीड परायी जाणे रे .....

बऱ्याचदा असे जाणवते लोक रिलेट करून घेत नाहीत. एकतर त्यांना ते येत नसावं किंवा ते मुद्दाम करत नसावेत. आपल्यासारखाच हाडामासाचा देह समोरच्यालापण आहे व आपल्याला असणाऱ्या भाव भावना देखील त्याला आहेत हे अनेकदा लोकांच्या गावीच नसल्यागत वावरत असतात. 

बऱ्याच gangster मुव्ही पहा. अनेकांचे सहज मर्डर करणाऱ्याला स्वतःचे मरण दिसायला लागले कि किती केविलवाणा चेहरा दिसायला लागतो त्याचा. असे मुव्ही समाजातील घटनांवरून व मानवी स्वभावाच्या स्वाभाविक अभ्यासावरून बनवलेले असतात. 

सिंडलरर्स लिस्ट मध्ये मृत्यूच्या रांगेत उभे असलेले ते लोक आठवा नक्कीच त्यांना मारणारे लोक त्याही वेळी नॉर्मल असतील तेव्हा त्यांना हा मृत्यू रिलेट करता येत नसेल काय? 

अलीकडे मी anarchy हे विलियम dalrymple चे पुस्तक वाचत होतो. शेवटचे जे काही मुघल सम्राट होते त्यातील काहींचे व त्यांचे सरदारांचे मृत्यू डोळ्यात तप्त सळइ घालून, हात पाय तोडून, तुकडे करून असे केले जात. कुठे जात असतील भावना ? 

आपल्याला जे वाटतेय त्यातील थोडे का असेना पण समोरच्याला वाटत असेल इतकी जाणीव देखील आहे कि नाही इतकी माणसे सामान्य जीवनात  क्रूर होऊन जगतात.

हि क्रूरता फक्त मर्डर वा शारीरिक हिंसेपुरती नसती. कोणाला प्रचंड दुखावणे, विश्वासघात करणे, वेळ न पाळणे, शब्द न पाळणे .... अशा खूप काही मानसिक टोर्चारिंग करण्यात देखील समोरचा व आपण यात करोडो मैलाचे अंतर असल्यागत लोक वागत जातात. 

# लिटररी नोंदी १९



जिव्हाळा - रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी जिव्हाळा हे पुस्तक लिहिले आहे. अलीकडेच ते  माझ्या वाचण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या लेखक कवींविषयी त्यांनी यात लिहिले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत अनुभव  आहेत. पण असे असले तरी त्यांनी ज्या व्यक्तींबाबत लिहिले आहे त्या व्यक्ती पब्लिक फिगर असल्याने लोकांना देखील आवडतील असेच अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत. आपल्या आवडत्या लेखक कवीविषयी अधिकची माहिती मिळणे हे वाचकांसाठी आनंददायी असते.  

१) पहिला लेख वरदान हा तारा वनारसे यांच्यावर तर  २) दुसरा कलासक्त हा लेख ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यावर आहे.

३) वलय –

·      श्री. पु. भागवत यांच्यावर हा लेख लिहिला आहे. मौज-सत्यकथेवर संपादक म्हणून विष्णूपंत यांचे नाव असायचे पण खरे संपादकीय सूत्रधार श्री पु अर्थात श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत हे होते.

·      श्रीपू हे १९५४ पासून रुईया कॉलेज मध्ये शिकवू लागले होते. १९८३ ला सत्यकथा हे मासिक बंद पडले. १९८६ साली ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले. श्रीपू महत्मा गांधींना भेटले होते. गांधी जिना बोलणी असफल झाल्यानंतर बिर्ला हाउसमध्ये वार्ताहर परिषद झाली तेव्हा प्रभात दैनिकाचे संपादक श्री.शंनवरे यांच्यासोबत श्रीपू तेथे गेले होते. तसेच १९४२ च्या गवालिया tank वरील ऐतिहासिक सभेच्या वेळी ते खूप लहान होते पण तिथे मोठ्या भावासोबत हजर होते.

·   करंदीकरांनी एका लेखात लिहिले, “कविता कशी भोगावी असं विचारलं तर त्यांच्यासाठी एक ग्राम्य उत्तर असं: ‘कपडे काढून’.” तेच करंदीकर गमतीने मित्राबद्दल म्हणत असत, ‘आपला श्रीपू काही झाले तरी कपडे काढायला तयार होनार नाही’ (पे.१०४)

४) नंदनवन –

·       हा लेख गंगाधर गाडगीळ यांच्यावर आहे.

·       बॉम्बे बुक डेपो ची स्थापना १९२४ ची. गाडगीळ, बापट, पाडगावकर, सदानंद रेगे, व करंदीकर हे मित्र होते. ते एकत्र जमायचे. खाणे, पिणे असे कार्यक्रम सुरु राहायचे. गंमतीने ते या गटाला ‘मुर्गी क्लब’ म्हणत असत.

·       आपटे समूहानंतर गाडगीळांनी वालचंद समूहात अनेक वर्ष सल्लागाराचे काम केले. १९८३ मध्ये गाडगीळांना ६० वर्ष पूर्ण झाली.

५) उन पावसाच्या शोधात –

·       वसंत कानेटकर यांच्यावर हा लेख आहे. वसंतराव यांची पहिली कादंबरी ‘घर १९५० मध्ये प्रकाशित झाली.

·       १९५५ च्या काळात ते कॉलेजच्याच आवारात छोट्याशा घरात राहत होते. १९६७ मध्ये ते शिवाई बंगल्यात स्थायिक झाले. ते गोखले शिक्षणसंस्थेचे आजीव सभासद होते. १९७१ मध्ये या मेंबरशिपला पंचवीस वर्ष पूर्ण झाली.

·       वसंतरावांचे लग्न त्यांची मामेबहीण असलेल्या सिंधुताई यांच्याशी झाले होते. ते त्या दोघांनी स्वतः ठरवले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा होता. सिंधूताईंचा कवितासंग्रह – ‘ मातीलाही कधीतरी वाटत...’.   नंतर वसंतरावांनी सुमन बेलवलकर यांच्याशी लग्न केले. मार्च १९९७ मध्ये वसंतरावांना ७५ वर्ष पूर्ण झाली. तेव्हा नाशिकमध्ये त्यांचा मोठा सत्कार झाला होता.

६) उंच जिथे माथा –

·       दुर्गा भागवत यांच्यावर हा लेख आहे.

·       एखादा अभ्यासाचा विषय त्यांच्या मनात घोळत असला कि, आपण सांगतो ते कोणाला याचे भान त्यांना राहत नसे. एकदा दुर्गा भागवत या रामदास भटकळ यांच्या ऑफिसमध्ये गेल्या असता तिथे अडवाणी नावाचा एक कागदाचा व्यापारी बसला होता. बाई बोलत होत्या. मध्येच भटकळ कामात इतर कोणाशी बोलत असल्याचे पाहून त्या व्यापाऱ्याला सांगू लागल्या...

·       काही वेळाने त्याला वाटले कि बाईंना प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून ते दुर्गाबाईंना म्हणाले,madam, यु राईट ऑल धिस, आय विल गिव्ह यु व्हेरी गुड पेपर टू प्रिंट

·       दुर्गाबाइंनी महात्मा गांधींना प्रथम पाहिले ते टिळकांच्या अंत्ययात्रेत. व त्यांचे भाषण ऐकले ते १९२५ मध्ये. गांधींचे भाषण ऐकून सतरा आठरा वर्षांच्या दुर्गेने आपल्या सोन्याच्या बांगड्या कस्तुरबांच्या झोळीत टाकल्या होत्या. (पे.२२७)     

७) कविवरा – 

·       हा कुसुमाग्रजांवरील लेख आहे. भटकळ यांची कुसुमाग्रज यांच्याशी पहिली भेट नाशकात १९५५ ला झाली. (मी हा विचार करतोय मला आठवते काही तरी १९९६-९७ च्या आसपास मी नाशिकला आलो होतो, तेव्हाच्या वृत्तपत्रात भरभरून त्यांच्याविषयी आलेले होते. पूर्ण नाशकात सगळीकडे होर्डिंग बनर लागलेले होते. कशाने ते आठवत नाही पण होते. त्यावेळचे नाशिक माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या युवाकासाठी खूप मोठे शहर होते. १९५५ ला जेव्हा यांची भेट झाली होती तेव्हा नाशिक कसे असेल. कसे दिसत असेल?...खूप लहान असेल, छोट्या इमारती असतील. गर्दी कमी असेल. हि लोक कुठे भेटत असतील... कोणत्या रस्त्याने गेले असतील.) तेव्हा शालिमार जवळ कुसुमाग्रजांचे घर होते असा उल्लेख येतो. तात्या मद्यप्राशानाच्या बैठकीला 'ग्रंथवाचन' म्हणत 'रामायण' म्हणजे 'रम' असाही उल्लेख त्यात आला आहे. 

·       सुरुवातीच्या काळात तात्या पत्रकार म्हणून पुण्याला प्रभाकर पाध्यांच्या स्वदेस मध्ये, रांगणेकरांच्या चित्रा मध्ये, मुंबईच्या धनुर्धारी मध्ये काम करत होते. शाळा कॉलेजात असतांना त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. मित्रांनी स्थापन केलेल्या ध्रुव मंडळान पैसे जमवून त्यांच्या 'जीवनलहरी' या पहिल्या संग्रहाचे प्रकाशन केले. त्यांनी गोदावरी सिनेटोन मध्ये पटकथा संवाद लेखन केले होते तसेच लक्ष्मणाची देखील भूमिका केली होती. तात्यांच्या कविता खांडेकरांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः प्रस्तावना लिहून १९४२ साली विशाखा कवितासंग्रह प्रसिद्ध करून घेतला.  

·       तरुणपणात तात्या कलंदर वृत्तीचे होते. त्यांना गंगुबाई सोनावणे यांच्याबद्दल आकर्षण वाटत असले तरी लग्नचा विचार लौकिकदृष्ट्या शक्य नव्हता. बाई शिक्षिका होत्या. वयाने मोठ्या होत्या. (पेज नंबर २४१)

·       नाशिकमध्ये तात्या व वसंत कानेटकर हे दोन्ही मोठ्या व्यक्ती राहत होते. पण दोग्घांचे वयक्तिक सबंध चांगले होते. कुसुमाग्रज हे कानेटकरांपेक्षा दहा बारा वर्ष मोठे होते. वसंत कानेटकर हे कवी गिरीश यांचे चिरंजीव. वसंतरावांनी आपल्या नाटकात मुक्तपणे कुसुमाग्रजांच्या कवितांचा उपयोग केला.

·       बोरकरांना आपला काविपणा कधी विसरता येत नसे. ‘ते फोन उचलला कि पोएट बोरकर स्पिकिंग असे म्हणत तात्यांचे उत्तर होते कि, बाकीबा हे फुल टाईम पोएट आहेत तर मी पार्ट टाईम पोएट आहे

·       तात्यांनी नटसम्राट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाही सलग पाहिले नाही.(पे.२५४) नटसम्राट मधील एक ओळ अशी होती – ‘गंगेने कसे वाहावे ते ब्रम्हपुत्रेने सांगू नये आणि ब्रम्हपुत्रेने कस वाहावे ते गंगेने

·       तात्यंना साहित्य अकादमी मिळाला तेव्हा ते बारा तेरा जणांसोबत गाडीवर दिल्लीला गेले होते.

८) आनंद करंदीकर-

·       हा लेख विंदा करंदीकर यांच्याशी संदर्भात आहे.

·       करंदीकरांची पहिली वर्ष कोकणात गेली. पुढे शिक्षण आणि अध्यापन कोल्हापूर परिसरात झाले. मुंबईला आल्यावर ते रामनारायण रुईया कॉलेजात इंग्रजी शिकवू लागले. १९४९ मध्ये करंदीकरांचा पहिलाच कवितासंग्रह ‘स्वेदगंगा’ प्रकाशित झाला.

·       केशवसुतांच्या कविता प्रसिद्ध करायला हरी नारायण आपटे यांना पुढे यावे लागले. कुसुमाग्रजांची विशाखा खांडेकरांमुळे उजेडात आली. करंदीकर-पाडगावकर यांचे पहिले कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यास स्वतः कवींना जुळवाजुळव करावी लागली. (पेज २७४)

·       शिकागो विद्यापीठाची फेलोशिप करंदीकरांना मिळाली होती. त्यातून ते पुढे इंग्रजी कविता करू लागले होते. ए.के. रामानुजम हे कानडी व इंग्रजी भाषेतील महत्वाचे कवी होते. विंदांनी रामानुजम यांच्या मदतीने स्वतःच्या कवितांची इंग्रजी भाषांतरे केली.

 

९) संधिकाळ – 

  • हा लेख ग्रेस यांच्याशी संदर्भात आहे.
  • ग्रेस यांचे शब्द ‘अनाघ्रात किंवा व्हर्जिन असले आणि त्यामुळे त्यांना पूर्वीचे काही संदर्भ नसले तरी खूप काही सांगून जातात.
  •  ग्रेस यांच्या पत्नीचे नाव लीलाताई तर मिथीला, माधवी आणि राघव हि त्यांच्या मुलांची नावे होती ज्यांना ते बाला, बेला आणि बिशू असे म्हणत असत.
  •  त्यांच्या लेखनात विशेषतः गद्य लेखनात अनेक साहित्यकृतींचा उल्लेख येतो. त्यात सार्त्र, चक्रधर, गालिब अशा विविध साहित्य प्रवाहातील थोरांचा उल्लेख असतो.
  •  युरोपातील फ्रेंच नाटककार सम्युअल बेकेट यांच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ नाटकाची थीम काय आहे हे कोणाला समजेना म्हणे! ते नाटक पन्नास वर्ष टिकून राहिले. त्यानंतरच्या टीकाकरांना कळेना कि पन्नास वर्षांपूर्वी यात न समजन्यासारखे काय होते.
  • ग्रेसच्या कवितातील/लेखनातील तीन वैशिष्ट्य – १. त्यांच्या कवितात संगीत आणि चित्र अर्थात श्राव्य आणि दृश्य संवेदनांना चाळवणारे उल्लेख मोठ्या प्रमाणावर येतात. २. ग्रेसच्या कवितेत कलाकृतींचे आणि त्यातील व्यक्तींचे संदर्भ येतात.ते समजून घेण्यासाठी ती प्रत्येक कलाकृती वाचणे, पाहणे किंवा ऐकणे शक्य नसले तरी योग्य ती संवेदना आपल्यात निर्माण करता आली पाहिजे. ३. ग्रेसचा शब्दसंभार- अशा शब्दांचा वापर करतात जे शब्दकोशात पण सापडणार नाही. आपल्याला सापडला तोच त्याचा अर्थ. एका कवीने म्हटल आहे कि मी ते लिहिलं तेव्हा त्याचा अर्थ मला आणि देवाला ठाऊक होता आता तो फक्त देवाला ठाऊक आहे.
  • शब्द आणि प्रतिमा यांचा अर्थपूर्ण कोलाज करण्याची ग्रेसची ताकद लक्षात घेणे हि ग्रेसच्या कवितेला भिडण्याची पहिली महत्वाची पायरी आहे. प्रत्येकाने आपल्या भाववृत्तीनुसार कवितेचा आस्वाद घ्यावा.
  • जी.ए. आणि ग्रेस यांची प्रत्यक्ष आयुष्यात कधी भेट झाली नाही. त्यांच्यातील संवाद जास्त पत्रातून व नंतर फोनवर होत असे.

 

१०) रणांगण – स्नेहबंधाच

·       हा लेख विश्राम बेडेकर यांच्यावर आहे.विश्रम हे नाव त्यांचे मूळ नाव नाही. त्यांचे नाव विश्वनाथ. लहानपणी त्यांना बाबू म्हणायचे.

·       बेडेकरांची ब्रम्हकुमारी आणि रणांगण हि पहिली दोन पुस्तके ह.वि.मोटे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली होती. हरी मोटे व विश्राम बेडेकर हे दोन्ही मित्र होते तरी त्यांच्या पत्नी या सख्ख्या बहिणी होत्या, कृष्णाबाई मोटे व मालतीबाई बेडेकर असे त्यांचे नाव. दोन्ही खरेमास्तरांच्या मुली होत्या.

·       कृष्णा खरे यांचे शिक्षण पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घोडनदी या गावी झाले. तिथ पुढे शाळा नसल्याने १९१४ मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंगणे येथील महर्षी कर्वे यांच्या शाळेत पाठविले. तिथे त्यांना गृहीतागामा हि पदवी मिळाली. त्यांचे व हरिभाऊ यांचे लग्न १९३१ च्या आसपास झाले. कृष्णाबाईंनी दृष्टीआडची श्रुष्टी आणि मीनाक्षीचे जीवन हि दोन पुस्तके लिहिली.  

·       विश्राम बेडेकर १८ वर्षांचे असतांना त्यांचे पहिले लग्न झाले. बाळूताई बेडेकर अर्थात विभावरी शिरूरकर यांनीच हिंदोळ्यावर हे पुस्तक लिहिले होते. बाळूताई या विश्राम बेडेकर यांच्या मैत्रीण नंतर दुसऱ्या पत्नी. ३० डिसेंबर १९३८ मध्ये त्यांनी लग्न केले. श्रीकांत हा या दोघांचा मुलगा. बाळूताई या देखील मोठ्या बहिनिसारख्या गृहीतागामा झाल्या. त्यांच्या इंग्रजी भाषणाची तारीफ सरोजिनी नायडू यांनी देखील केली होती.  लीलाताई या बेडेकरांच्या तिसऱ्या पत्नी.

 

अशा तऱ्हेने जिव्हाळा या पुस्तकातील व्यक्तिचित्रणाचा सारांश मी माझ्या परीने मला भावाला तसा लिहिला.

-    समाधान महाजन

१८/१२/२०२२

बटर फ्लाय - सुंदर शॉर्ट फिल्म

Butterfly short film

सुजित पाटिल या डॉक्टर मित्राची शॉर्ट फिल्म पाहिली. बटर फ्लाय नाव आहे. थोडं वेळ काढून व थोड्या सहनशिलतेने ही फिल्म पाहिली तर .... निव्वळ अप्रतिम..

सुरुवातीला वाटत हा तोच गरीब श्रीमंत मधील पारंपरिक वर्ग संघर्ष असेल मग कोणीतरी बदला घेईल किंवा कोणतरी दया दाखवेल व फिल्म संपेल..पण असे काही झाले नाही. 

फिल्म सुरू झाली की काही मिनिट फक्त पाहत राहायचे नंतर फिल्म तुम्हाला आपोआप पाहायला लावील. मला ही फिल्म पाहतांना साऊथच्या 96 या चित्रपटाची प्रकर्षाने आठवण आली. तो पाहताना सुरुवातीची माझी प्रतिक्रिया होती की काय बोअर करतायत ते राव....पण खूप जणांकडून रेकमंडेशन आल्यामुळे थोडे नेट लावून पाहिले आणि चक्क पूर्ण चित्रपट संपला तरी वाटत राहिलं की अजुन काही हवं होत....पण सुजित सारखी दिग्दर्शक लोक प्रचंड हुशार असतात त्यांना कळतं कुठं थांबावं...सुजित चा बटर फ्लाय देखील नेमका तिथेच थांबलाय...जिथं आपल्याला वाटतं संपू नये.. बटर फ्लाय ला पूर्ण आनंद मिळावा..काहीतरी चमत्कार व्हावा. पण तो होत नाही. त्यामुळे या शॉर्ट फिल्मचा इफेक्ट जोरदार मिळतो

मनात रेंगाळत राहतो. 

सुजित प्रोफेशनने डॉक्टर असून  डायरेक्टर म्हणून वावरतांना एखाद्या कुशल सर्जनप्रमाणे अनावश्यक भागाला कात्री देत मोजक, हव ते तो दाखवतो. निर्मिती मूल्य उच्च आहेच. संगीत अप्रतिम आहे. कॅमेरा वर्क जोरदार आहे. 

विशेष म्हणजे यात काम करणारे दोन्ही लीड ॲक्टर पेशाने पत्रकार व डॉक्टर असल्याचे कोणत्याही अँगल ने वाटत नाही. वाटत की हे थिएटर ॲक्टर आहेत. सर्वांचेच काम उत्तम झाले आहे. सुजीतकडून पुढे भरपूर अपेक्षा आहेत त्या नक्कीच तो पूर्ण करील. अर्थात आता देखील बटर फ्लायला एकूण 54 अवॉर्ड मिळाले हेही नसे थोडके. 

एक वेगळा अनुभव म्हणून ही शॉर्ट फिल्म एकदा नक्की पाहायला हवी. 

- समाधान महाजन 

11/12/2022

दुडिया

नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न गेल्या काही वर्षापासून अस्तित्वात आहे. विशेषतः सत्तरच्या दशकापासून सुरु झालेल्या या प्रश्नाने कालांतराने मोठे स्वरूप धारण केले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच्या काळात या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यातही मुलाखतीला कामाला येईल म्हणून  बरीच माहिती मी जमा केली होती. त्यावेळी गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या अजय खर्डे या माझ्या एपीआय मित्राकडून खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलची माहिती मिळवली होती. त्याच्याकडून अम्बुश/ट्रप, नक्षली शरीराची करत असलेली विटंबना, वातावरणात कायम पसरलेली भीती, रोड ओपनिंग, पोलीस स्टेशन भोवतीची CRPF ची तुकडी. CRPF व लोकल पोलीस मध्ये नसलेला ताळमेळ, वरिष्ठ लेव्हल कडून सतत येत असलेल्या आदेशानुसार वागावे लागणे, सततचा ताण या कागदावर कुठे नसलेल्या माहितीची दारे मला त्याच्यामुळे खुली झाली होती.

आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची नक्षलवाद या विषयावर असलेली व नुकतीच प्रकाशित झालेली दुडिया नावाची कादंबरी वाचण्यात आली. विश्वास पाटील यांच्या नेहमीच्या कादंबरीच्या तुलनेत हि दुडिया कादंबरी जराशी वेगळीच आहे. वर्तमानकाळातील देशापुढील नक्षलवाद सारख्या महत्वाच्या समस्येकडे हि कादंबरी लक्ष वेधतेच पण इतकेच नव्हे तर या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याच्या उगमाची व विस्ताराची परखड कारणमीमांसा देखील करते.   

या कादंबरीची सुरुवातच मुळी सलवा जुडमचे प्रसिद्ध नेते महेंद्र कर्मा यांच्यासह ३२ जणांच्या हत्येच्या बातमीने होते. छत्तीसगडमध्ये निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून पवार नामक एका महाराष्ट्रीयन अधिकाऱ्याची नेमणूक होते. त्याच्या ड्युटीच्या पहिल्या दिवसापासून त्याने केलेल्या निरीक्षणांच्या नोंदीचा आगळावेगळा प्रवास म्हणजे दुडिया नावाची कादंबरी. त्याच्या नजरेतून व अभ्यासातून  आपल्याला छत्तीसगड मधील नक्षली समस्येची पाळमूळ कळत जातात. अबूजमाड सारख्या विस्तीर्ण पसरलेल्या जंगल व डोंगररांगावर नक्षलीच्या भीतीची काळी छाया क्षणोक्षणी जाणवते. उखडून टाकलेले रस्ते, पेरलेल्या स्फोटकांमुळे छिन्नविछिन्न झालेल्या गाड्या व मानवी देहाची तुकड्यात केलेली विटंबना अंगावर काटा आणते. सगळीकडे जंगलासोबत एके ४७, एस.एल.आर. एलएमजी/लाईट मशीन गन प्रेशर बॉम्ब, antilandmine व्हेईकल यांचा प्रभाव जाणवतो. 

साठ सत्तरच्या दशकात सरकारी या नावाने ओळखले जाणारे स्थानिक स्तरावर काम करणारे फॉरेस्ट, पोलीस, पटवारी टाईपच्या लोकांनी या आदिवासी लोकांच्या अज्ञानाचा, भोळेपणाचा, प्रचंड गैरफायदा घेतला. त्यांचे शोषण झाले. मोहाची फुले, शेती, जंगल, तेंदूपत्ता यात रमणारा आदिवासी कायद्यांनी परका ठरवला.  त्यातून नक्षललोकांना हातात बंदूक घेऊन बदला घेण्याची भाषा बोलणारे लोक आदिवासींना आपले वाटायला लागले. त्यांचा प्रभाव व प्रसार वाढायाला लागला. तो इतका वाढला कि शस्र आल्याने मूळ आपलेच आदिवासी बांधवांना ते आपल्या बाबी ऐकायला भाग पाडू लागले. ते आणि पोलीस यांच्या लढ्यात सामान्य आदिवासी भरडला जाऊ लागला. 

या सर्वांचा परामर्श कादंबरीत घेत असतांनाच त्या भागात राहनारे आदिवासी लोक, त्यांचे पूर्वीचे व आताचे जीवन, नक्षल चळवळीत शामिल असलेले आदिवासी व ती चळवळ सोडून  पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची धडपड करणारे असंख्य युवक युवती , त्या भागात कर्तव्यावर असनारे अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी या सर्वांचा  एकूणच मानवीय पातळीवर, भावनिक संघर्ष व उलाढाल पकडतांना कादंबरीकाराला यश आले आहे. 

कादंबरी ज्या दुडिया नावाने आहे ती दुडिया हि आदिवासी मुलगी, तिचे पात्र अगदी जिवंतपणे डोळ्यापुढे उभे राहते.  लहानपणापासून म्हणजे अगदी जन्मापासून  तर कादंबरीच्या शेवटापर्यंत असणारी  दुडिया यात एक नायिका आहेच पण ती अशा असंख्य दुडीयांचे प्रतिनिधित्व करते ज्या मुली असे जीवन जगत आहेत. 

यातील ज्या निवडणुकीच्या कामासाठी नायक पवार छत्तीसगड मध्ये जातो. मुळात ते निवडणुकीचे काम आपल्या नागरी भागात घडते इतके सोपे नक्कीच नक्षल भागात नाही. पण ज्या तळमळीने व मनापासून अधिकारी कर्मचारी काम करतात त्याचे उत्कृष्ट चित्रण कादंबरीत आले आहे. मला 'न्यूटन' या राजकुमार राव च्या चित्रपटाची आठवण आली. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारतीय लोकशाही व त्याचा प्राण असणारी निवडणूक यशस्वी व्हावी म्हणून न्यूटन आपली ताकद लावतो. प्रत्यक्षात लेखकाच्या अनुभवांप्रमाणे अशी असंख्य माणसे आहेत तेही अशा भागात म्हणून तर भारतीय लोकशाही टिकून आहे. 

निवडणुकीच्या कामाला जातांना कर्मचारी अगदी पॉलीसी पेपर, गुंतवणुकीचे डीटेल्स घरच्यांना सांगून निघतो, शाश्वती नसते परत येऊ कि नाही म्हणून. असे प्रसंग वाचतांना डोळ्यात पाणी तरळते. 

चौबे, शर्मा सारखे अधिकारी आपल्या प्राणांची पर्वा न करता हि समस्या सोडविण्याच्या सातत्याने प्रयत्न करत राहतात हे यात आहेच शिवाय अनेक सूक्ष्म नोंदींमुळे कादंबरीतील उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. 

अनेक हत्या प्रतीहत्यांच्या बातम्यांची नोंद कादंबरीत घेतली आहे. जसे- 

1. एप्रिल २०१० मध्ये ताडमेटाला गावाजवळ CRPFची एक अक्खी कंपनी ८३ पैकी ७८ जवान जागीच ठार केले होते. बेसावध असतांना गोळीबार करून हे कृत्य केले गेले होते. 

2. एप्रिल २०१२ मध्ये सुकमा जिल्ह्याचे कलेक्टर अलेक्स पॉल मेनन हे मांझीपारा नावाच्या खेड्यात गेले होते. तेथून नक्षलवादीनी त्यांचे अपहरण केले व बारा दिवस बंदी बनवले होते. 

3. २५ मे २०१३ रोजी झिरम घाटातील नक्षली हल्ल्यात केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल व सलवा जुडूमचा प्रसिद्ध नेता महेंद्र कर्मा यांच्यासह ३२ जणांना ठार करण्यात आले. 

4. व्ही.के.चौबे सारख्या एसपींना बॉम्बस्फोटात ठार करण्यात आले. ते राजनांदगाव जिल्ह्याचे एस.पी. होते. 

नक्षलवादाच्या उगमाचे विवेचन ओघाने कादंबरीत येत असतांना अलीकडील काही महत्वाच्या कारणांचा देखील ते आढावा घेतात जसे- 

1. निर्णय घेणारे IAS अधिकारी दरवेळी बरोबरच असतात असे नाही. किंबहुना स्थानिक ज्ञान नसतांना फक्त एक परीक्षा पास झाल्यामुळे त्यांना मिळालेल्या विशेषाधीकारांचे ते नक्की चांगला वापर करतील याची काय शाश्वती हे सांगतांना लेखक म्हणतात, “स्पर्धात्मक परीक्षेला बसून उत्तीर्ण होणारे सारेच काही बुद्धिमान नसतात. दुर्दैवाने ज्यांची बस चुकते, जे थोड्याशा मार्कांनी पास होतात, तेही काही बेअक्कल नसतात. भाई यह एक्झाम पास होना tact और तकदीरवाली बात होती है”... 

मग मध्येच ते कठोर होऊन स्वतःच्या कॅडरवर टिप्पणी करणार, ‘हमसे जनता बार बार पुछती है, एक बडी एक्झाम क्लियर करने कि हमको क्यू और कितनी सजा दोगे भाई?” 

2. रंगदारी या प्रकाराबद्दल ते सांगतात, “कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक ठराविक हिस्सा वरिष्टांना द्यावाच लागतो. आप आगर भीतर पाहाडी मुलुख मे जाओगे तो – दरमहा हिस्सा MLA आणि जंगलातल्या एके ४७ वाल्या नाक्षालीन्पर्यंत देखील न चुकता जातो. काम करणे अवघड आहे. पाच सहा किलोमीटरचा रस्ता करणे अवघड आहे कारण सर्व सामुग्री जाळली जाते, काम करणाऱ्यांना मारले जाते. अशात कोण कंत्राटदार काम घेईल?

3. सलवा जुडूम हि महेंद्र कर्मा यांनी सुरु केलेली चळवळ. सुरुवातीला लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. विकासासाठी आदिवासी लोक नक्षलींच्या विरोधात उभे राहिले. सरकारने देखील त्यात एस.पी.ओ नेमले. त्यांच्या हाती शस्रे दिले. हजारो संख्येने आदिवासी मेळावे होऊ लागले. नक्षली चिडले. दोन्ही गटात सिव्हील war सारखी परिस्थिती निर्माण झाली. मानवी हक्क वाले जागे झाले. कोर्टात केस गेली.  सरकारी बाबू लोकांना जुने व्यसन असत, नवी समस्या मिटविण्यासाठी जुनाट कायद्यांच्या एखाद्या कलमाला लोंबकळत राहायचे. झाले एस.पी.ओंच्या नेमणुका बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. चळवळ अधोगतीला लागली. महेंद्र कर्म नक्षलींच्या हिट लिस्टवर आले. त्यांना देखील निर्घुण पणे ठार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहावर अक्षरशः नाचले.

4. शस्रांची कमतरता किंवा राजकारणांची तडजोड यातून अलीकडे शासकीय यंत्रणांनी खूपच मार खाल्ला आहे. याबाबत कादंबरीतील एक पात्र म्हणते, “तिच्या मते सरकारी फौजा म्हणजे- नपुसक नवरा- तो घरात निजला काय अन बाहेर पावसात भिजला काय, काय फरक पडतो?

5. नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी केंद्र सरकारकडून दरवषी नक्षलप्रभावित राज्यांना हजारो कोटींची मदत केंद्राकडून मिळत असते. ती इतकी प्रचंड असते कि सर्वांना तिची चटक लागली आहे.उद्या अचानक हे नक्षलवादि संपले तर हा फंड आपोआप बंद पडेल ज्याची अनेकांना सवय झाली आहे. 

असे विविध प्रश्न उपस्थित करून व नक्षल प्रश्नाचा सांगोपांग आढावा घेत असतांना दुडिया नामक एका तरुणीची नक्षल ते पोलीस मदनीस अशी कहाणी लेखक आपल्याला तिच्या तोंडून सांगत असतो. दुडिया नामक या तरुणीच्या मार्फत कादंबरी नक्षलचा अमानुष चेहरा आपल्या समोर मांडत असतो. त्यांच्यातील एकमेकातील मतभेदाचा मुद्दा देखील अगदी बेमालूम पणे कथानकात आलेला आहे. 

एकूणच कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. 

समाधान महाजन 

३/१२/२०२२