अनंत सामंत

 

के फाईव ही अनंत सामंत यांची कादंबरी जबरदस्तच आहे. अजुन पर्यंत एखाद्या वेबसीरिज वाल्यांच्या ती का लक्षात आली नाही असे वाटते. अवघ्या 105 पानांमध्ये  कंटेंट ठासून भरला आहे. एकदा का पुस्तक वाचायला सुरू केलं की पूर्ण होइस्त व ठेवता येणं अशक्य. 

मुळातच सामंत हे एक लेखक म्हणून चांगले व ताकदीचे  आहेतच पण ते आयुष्य देखील भन्नाट च जगले आहेत. आखून दिलेल्या रेषेवर उभ्या आयुष्यात ते कधी गेले नाहीत म्हणून जीवनाची विविध रूपे जवळून त्यांनी पाहिली. आणि म्हणून कदाचित त्यांच्या लिखाणात जाणवणारी विविधता व त्या त्या वेगळेपणा तील सूक्ष्म मांडणी वाचकाला अचंबित करते. 

ऑक्टोबर एंड मध्ये उल्लेख येणाऱ्या आर्ट गॅलरी, चित्रकाराच्या रोजच्या आयुष्यात तो वापरत असलेली भाषा आणि एकूणच त्या क्षेत्रातील बारकावे पाहता वाटत की लेखकाने अनेक वर्ष त्या क्षेत्रात घालवले असावेत किंवा मग ते स्वतःच पट्टीचे चित्रकार असावेत. 

त्यांची के फाई व वाचतांना  तर अनेक धक्के बसतात. आजच्या फॅमिली मन वेब सिरीज सारखे  किंवा त्याही पेक्षा खुंखार अशी ही रचना आहे. यातील वर्णन वाचतांना अनेकदा ती डोळ्यापुढे घडत आहेत इतके जिवंत चित्रण सरांनी केले आहे. 

सामंत यांच्या लिखाणात निर्दयी जाणवेल इतकी तटस्थता आहे. एकाचवेळी वाचकाच्या  मानवी मन व हृदयाला चुचकारत  असताना ते स्वतःला तटस्थ तर ठेवतातच पण त्यांचा नायक त्याहीपेक्षा कठोर असतो. अनेकदा वाचकाला नायकाचा राग येऊ शकतो.... 

हे विशेषतः जाणवते सामंतांची फेमस एम टी आयवा मारू वाचतांना. ही कादंबरी वाचून झाल्यावर सरांशी बराच वेळ बोलणे झाले होते... त्या वेळी इतर बोलण्यासोबतच  त्यांनी सांगितले होते की के फाईव तुला नक्की आवडेल. आणि अर्थातच.... 

त्यांच्या कादंबरीची नायिका ही शोभेची बाहुली नसते. परिस्थिती सोबत मिळेल त्या साधनाने व मिळेल त्या सहकार्याने ती लढत असते. एक वेळ अशी येते की कादंबरी मुळातच तिच्यासाठी लिहिलेली आहे की काय अशी शंका यावी इतपत तिचा लढा ती स्वतः चाा मानते व जीवनाला झुंज देते.... शरीराचे पाश तर ती केव्हाच फेकून देते किंबहुना आपल्या सोबत वाचकाला देखील फेकण्यास भाग पाडते....नग्न देहापेक्षा माणसाच्या स्वभावातील क्रूर नग्नता एखादा बुरखा टरा ट र फाडावा त्या प्रमाणे त्याप्रमाणे फाडून ती उभा करते....तेव्हा कादंबरी एका वेगळ्याच टप्प्यावर पोहचलेली असते. 

आजच्या   पिढीला अनंत सामंत  नाव माहीत आहे की नाही ठाऊक नाही. माझा  अनुभव   तरी नकारात्मक आहे. एम टी आयवा मारू म्हटल्यावर एकाने ही शिवी आहे का असेही विचारले होते.....

असो, आता त्यांच्या उरलेल्या पुस्तकांची सुरूवात आश्र्वस्थ ने करतो.

- समाधान महाजन

पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल(अजंठ्यांतील चित्रांचा चित्रकार)

 11 जुलै 2021च्या सकाळी जळगावमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. आम्ही निघून भुसावळला जाईपर्यंत पावसाने चांगलाच वेग पकडला होता. नव्यानेच झालेल्या चारपदरी मार्गावर सगळीकडे पाणीच पानी पसरले होते. वाहने पार्किंग लाइट लाऊन हळुवार जात होती. भुसावळच्या रेल्वे डीआरएम कार्यालयाच्या थोडे पुढे गेले की रस्त्याला लागूनच कॅथॉलिक सीमेट्री आहे. ब्रिटिश कलावधीतील अनेक युरोपियनांच्या समाध्या या ठिकाणी आहेत. आम्ही पोहचलो तेव्हा पाऊस थांबला होता. सीमेट्रीचा दरवाजा बंद होता पण आम्हाला पाहताच तेथे अनेक वर्षांपासून कामाला असणारे इंगळे नावाचे गृहस्थ लगेचच आले. दरवाजा उघडून आत गेलो. किमान मी तरी पहिल्यांदाच एखाद्या ख्रिश्चन सीमेट्रीमध्ये पाय ठेवत होतो. आत सगळीकडे गवत व झाडे वाढलेली होती. अर्थात मधला मार्ग चांगल्या स्थितीत होता. त्यावरून चालत आम्ही थोडे पुढे गेलो आणि डाव्या बाजूला असलेल्या एका कबरीजवळ थांबून इंगळे म्हटले की हीच ती कबर. 
होय, हीच ती कबर होती जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील चित्रे ज्याच्यामुळे पहिल्यांदा जगापुढे आली व प्रसिद्ध झाली त्या रॉबर्ट गिलची. स्थानिक पारो नावच्या आदिवासी युवतीच्या प्रेमात असणार्‍या देवदासची.     

28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ नावाचा एक यूरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर अजंठाच्या या परिसरात आला आणि आता प्रसिद्ध असलेल्या व्यू पॉइंटवरून त्याला 10व्या क्रमांकाच्या लेणीची कमान दिसली. ही अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात होती. अर्थात येथील आजूबाजूच्या स्थंनिकांना याची माहिती होती पण जगासाठी हा मौल्यवान ठेवा लपलेला होता. जॉन स्मिथने या लेणीचा शोध लावल्यानंतर पुढील 24 वर्ष काहीच झाले नाही. पण ब्रिटीशांच्या शिरस्त्याप्रमाणे अहवाल तयार झाले. अभ्यास झाला. अखेर 1844 मध्ये कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली. 

कोण होता रॉबर्ट गिल?  

26 सप्टेंबर 1804 ला लंडनच्या बिशपगेट येथे रॉबर्ट गिलचा जन्म झाला.गिल वयाच्या 19 व्या वर्षी पी.पी.ग्रेलीमर यांच्या शिफारशीने जेम्स पॅटीस यांच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला. मद्रास आर्मीत तो एक कॅप्टन होता. 1843 पर्यन्त त्याने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी काम केले. तो लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होता. 

रॉबर्ट गिलची अजिंठा येथे नियुक्ती-  कोर्ट ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून 1 ऑक्टोबर 1844ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली. त्यात त्याला एक सहाय्यक ड्राफ्समन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले. त्याने वेल्लोरमधला एक निष्णात चित्रकार सहायक म्हणून मिळविला.  रॉबर्ट गिलची या कामासाठी निवड करताना केलेला शिफारशी शेरा असा आहे, ‘‘आलेखकार म्हणून कॅप्टन गिलचे कौशल्य सर्वविदित आहे. प्रस्तावित काम जोखमीचे आहे. ते निभावताना साहसी आयुष्य जगण्याची ओढ पाहिजे. कॅप्टन गिलची कलाकारी साहसाची जी धारणा आहे त्याचा या कामगिरीशी अगदी मेळ बसतो.’’

अजिंठा येथे आगमन - 13मे1845 ला सतरा सुरक्षा जवानांसह रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. असाईच्या लढाईच्या वेळी जिथे ड्यूक ऑफ वेलिंग्टन राहात होता तोच बंगला निवासाकरिता गिलला दिला गेला. (काही ठिकाणी असा उल्लेख आहे की, अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहत असे. त्या ठिकाणी आज ग्रामीण रुग्णालय अस्तीत्वात आहे. त्यासमोरील प्रवेशद्वारावर असलेल्या इमारतीत रॉबर्ट गिल अनेक वर्ष राहिला. त्याला स्थानिक लोक गिल टोक म्हणून ओळखतात.) तो १३ मे १८४५ रोजी पोहोचला. त्यानंतर चार महिन्यांनी सप्टेंबरमध्ये चित्रांच्या गरजेचे साहित्य पोहोचले. 

रॉबर्ट गिलपुढील आव्हाने व त्याचे काम -  गिलचा  हा मुक्काम औरंगाबादपासून ६३ मैलांवर किंवा जालन्यापासून ५४ मैलांवर होता. टपाल घ्यायला किंवा द्यायला, सामानसुमान खरेदीला, पाठविलेली वस्तू मिळवायला किंवा पाठवायला एवढे अंतर तुडविण्याखेरीज तरणोपाय नव्हता. त्याला नेमून दिलेले काम चांगलेच कठीण होते. तेही अनेक अर्थाने. उष्ण कोरडी हवा, दिवस चढावा तसतसे वाढणारे रणरण तापमान. रोज तेथून वाघिरा दरीपर्यंत यायचे. टेकाडे तुडवून लेण्यांशी पोहोचायचे. जनावरांचे भय आणि वाटेवरचा चोराचिलटांचा उपद्रव नेहमीचाच. गिल आणि त्याचा चमू यांची तिथली रोजची हजेरी म्हणजे तर भिल्लांच्या दृष्टीने त्यांच्या मुलुखात केलेली घुसखोरीच! ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गिलबरोबर शरीररक्षक देण्याची शिफारसदेखील केलेली होतीच. प्रवासाची यातायात इतकी की, कित्येकदा एखाद्या जरा बऱ्या गुंफेमध्येच तो आठ-दहा दिवसांसाठी मुक्काम करीत असे (फग्र्युसनने लिहिलेल्या वृत्तांतानुसार क्रमांक वीसची गुंफा). या सगळ्या जिकिरींची त्याला पूर्वकल्पना दिलेली होती. त्यात स्पष्ट लिहिले होते, ‘‘अनेक गुंफांमध्ये इतका अंधार आहे की झगमग दिव्यांखेरीज तिथले काहीही दिसणार नाही. काहींची छताची उंची इतकी आहे की शिडीवजा मचाण बांधूनच तेथील चित्रे दृग्गोचर होतील. काही गुंफांमध्ये चिखल-पाण्याचा  बुजबुजाट आहे. तिथे वायुविजन शून्यवत असते. एकूण वातावरण मलिन आणि रोगट आहे. मधमाश्यांची मोहोळे आणि वाघुळांचे थवे आहेत. भिंती आणि छतावरील ही राड आणि डागाळणाऱ्या मोहोळांचा निचरा केल्याखेरीज चित्रे दिसणार नाहीत.’’

त्याच्या हातातली चित्रसामग्री अर्थातच मूळ चित्रांपेक्षा अगदीच निराळी होती. त्याच्या किन्तानी पटाचा आकार मूळ चित्रांपेक्षा अर्थातच सरासरीने लहान होता. मूळ चित्रांबरहुकूम चित्रांमधली प्रमाणे तर राखायची, पण त्यातले तपशील सुटू द्यायचे नाहीत. (खरे तर निदान नजरेस पडू शकतात तेवढे तपशील तरी) प्रकाशाची मात्रा, रंगांची ठेवण, छटांचे मिश्रण असा सगळा तोल सांभाळण्याची बिकट कसरत साधायची होती. म्हटले तर चित्राचे चित्र, पण तरी मूळ चित्राचे लघुरूप. काही अगदी ‘लघु’ नव्हती. ९० चौरस फुटांचे किन्तान लागणारीदेखील होती. त्याने बहुतेक गुंफांचे नकाशे बनविले. अनेक चित्र/ शिल्पांतील आकृतींचे साधे सुटे रेखाटन करून केले. त्याची आणखी एक अडचण होती. या चित्रांतले प्रसंग, त्यामागची प्रेरणा आणि धारणा, त्यांचा गर्भितार्थ हे उमगावे तरी कसे? त्याचे आकलन होईल असे जे काही वाङ्मय असेल ते मला पाठवा असे त्याने लिहिलेदेखील. पण त्या काळात बुद्धचरित्र, इतिहास, जातककथा, त्यातील प्रसंग असे सहजसुगम आकलन आणि माहिती तुटपुंजीच होती. जी होती ती या चित्रांत कशी उमटली याची तर सुतराम जाणीव नव्हती.

हे अवजड काम पूर्ण करायला किती काळ लागणार? प्रारंभी गिलला वाटत होते की सुमारे अठरा महिने लागतील! तिथले अडथळे आणि अडचणींचा डोंगर त्याला अजून पुरेसा कळला नव्हता! त्याचे काम हरप्रकारच्या अडचणींनी

रेंगाळणार होते. तिथली साफसफाई हे पहिले काम! पावसाळ्यात वाघिरा ओलांडणे आणि वर गुंफांमध्ये पोहोचणे मुश्कील म्हणून काम ठप्प! १८५२ साली तर त्याचे किन्तानी कापडच चोरीला गेले! थंडीमुळे चोरांनी ते पळविले होते! त्यात लेण्यांचा अर्धगोली पसारा! त्यामुळे दिवस चढावा तसतशी प्रत्येक लेण्यांमधील सूर्यप्रकाशाची ठेवण बदलायची.  तसे काम करण्याची गुंफा बदलणे भाग पडायचे. उंचीवरील रेखाटने मचाणावरती पाठीवर झोपूनच करावी लागायची. १८५३ नंतर धाडलेल्या अनेक अहवालांमध्ये थकवा, आजारपण, रोगराई, औषधांची वानवा याबद्दल अनेकवार तक्रारी आहेत. एकदा चित्र पूर्ण झाले की त्यांचे तेल आणि रंग वाळायला दीड-दोन महिने जायचे. मग ते गुंडाळी करून टिनच्या डब्यात भरायचे. मुंबईमार्गे मद्रासला धाडायचे. कधी मूळ ‘हात देण्या’तील कमतरता व्हायची तर कधी हवा अतिकोरडी व्हायची, कधी सुरळी डब्यात भरताना हेळसांड व्हायची यामुळे काही चित्रांना चिराळलेपणा यायचा.

गिलच्या अजंठ्याच्या चित्रांचे प्रदर्शन - त्याने पाठविलेल्या रेखाटनांची, त्यावरून लाकडात खोदलेल्या उठावचित्रांची प्रसिद्धी आणि वाहवा होऊ लागली होती. क्रिस्टल पॅलेसमध्ये अनेक प्रकारची प्रदर्शने भरविली जात असत. नोव्हेंबर 1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे सन 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला. रॉबर्ट गिलच्या एकूणच कामगिरीची दखल घेऊन 1 एप्रिल 1854 ला त्याला लष्करातील मेजर पदावर पदोन्नतीही देण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर रॉबर्टने चित्रनिर्मितीच्या कामातील दुसरा टप्पा सुरू केला. त्याच्या या चित्रनिर्मितीच्या दोन वर्षांत (1854-55) भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला.

ईस्ट इंडिया कंपनीच्या म्युझियमला १८५३ साली क्रिस्टल पॅलेस कंपनीच्या संचालकांनी रीतसर विनंती केली.

‘‘भारतीय कला आणि रूढींवर आधारित वेगळे दालन प्रदर्शनात असेल. त्यामध्ये कंपनीच्या संग्रहातील अजिंठा गुंफांची चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवली गेली तर ती पाहण्याचा अनेकांना लाभ मिळेल. फार मोठ्या प्रमाणावर ती बघितली जातील.’’ या चित्रांचा कौतुकमय उदोउदो झाला. त्या काळात ओवेन जोन्स नावाचा ख्यातकीर्त वास्तुकार आणि नक्षीकार होता. १८५६ साली त्याने दुनियाभरच्या दागिन्यांचे सजावटी नमुने असलेले ‘ग्रामर ऑफ ऑर्नमेन्ट’ हे गाजलेले पुस्तक लिहिले. त्यातली भारतीय नक्षीकामाची उदाहरणे गिलच्या ‘अजिंठा चित्रां’वरून बेतलेली होती! त्याच सुमाराला प्रवाशांसाठी ‘भारतदर्शन’ मार्गदर्शक पुस्तकनिघाले; त्यातदेखील ही लेणी आणि तेथे तळ ठोकून राहिलेल्या गिलचा उल्लेख होता.

या धाडसी कलाकारीचे आपल्याला यथोचित श्रेय मिळावे अशी गिलची स्वाभाविक इच्छा आणि आकांक्षा होती. फग्र्युसनने हे प्रदर्शन पाहिले होते. त्याला या चित्रांचे अपार मोल वाटत होते. परंतु तो प्रदर्शनातील मांडणीवर फार नाराज झाला होता. तेथील प्रकाश यथोचित नसावा. खेरीज ही कुठली चित्रे आहेत? त्यांचे मूळ प्राचीनपण किती? त्यांचा संदर्भ काय? आणि महत्त्व काय? याची काही ओळखदेख न करताच ती मांडली गेली होती, अशी तक्रार त्याने नमूद केली आहे.

चित्रे जळाली-  १८६६ साली या क्रिस्टल हॉल नावाच्या भव्य वास्तूमध्ये मोठी आग लागली आणि गिलची ही तपश्चर्या एका फटक्यात भस्मसात झाली. त्यांचे कोठलेच छायारूपदेखील मागे शिल्लक नव्हते. कोणकोणती चित्रे गमावली हे सांगणेदेखील मुश्कील होते. हा काळ भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट होता. एकीकडे 1857 च्या उठावाने कंपनी जेरीस आलेली असतांना अखेर 1858 पासून राणीच्या जाहीरनाम्याने कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिशांची प्रत्यक्ष सत्ता अस्तीत्वात आली. भारतात एकीकडे सुरू असणार्‍या या प्रचंड मोठ्या राजकीय सामाजिक उलथापालथीचा रॉबर्ट गिलसारख्या अवलियावर काहीही परिणाम झाला नव्हता. तो अजून अजंठ्याच्या चित्रातच बुडालेला होता. १८५८ नंतरसुद्धा उरलेसुरले काम आणि खूप पैसे मिळतील या आशेतला बेदरकार छांदिष्टपणा यात रमलेला गिल तिथेच राहिला होता. थोडाफार कर्जबाजारी झाला होता. सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. त्याने मागविलेल्या नव्या धाटणीच्या कॅमेऱ्याने त्याने घेतलेले अनेक फोटो होते. तेही त्याला जरा पडत्या किमतीला कंपनीला विकावे लागले! काही फोटो, रेखाटने आणि अपघातवशाने मद्रास डेपोत पडून राहिल्याने दहा चित्रे बचावली 

आता फोटोग्राफीकडे-  सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. याच कालखंडात त्याने अजिंठ्याची 29 चित्रे साकारली. त्यातले शेवटचे चित्र जुलै 1863 ला त्याने पूर्ण केले. डिसेंबर 1866 ला तो अजिंठ्यात असताना त्याची चित्रे जळाली, त्यातली 1850 ते 1854 या कालखंडातील पाच चित्रे शिल्लक ती https://collections.vam.ac.uk/item/O115446/copy-of-painting-inside-the-oil-painting-gill-robert/वेबसाईटवर आजही पाहायला मिळतात. अजिंठ्याची चित्रकला आणि त्या अनुषंगाने रॉबर्ट गिलच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात घडलेल्या घटना हा त्याच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. त्यानंतर त्याने 1863 ला 200 स्टेरीओग्राफिक प्रकाशचित्रांची 200 दृश्ये लंडनला पाठवली होती. या फोटोग्राफीच्या माध्यमातून अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकला यांची प्रकाशचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. त्याची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली आहे. आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाइटवर ही प्रकाशचित्रे हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. रॉबर्ट गिलच्या प्रकाशचित्रांमुळे हा ठेवा ख-या अर्थाने जगासमोर आला. ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. 1864 साली त्याच्या या प्रकाशचित्रांचा संग्रह असलेली “One Hundred Stereoscopic Illustrations of Architecture and Natural History in Western India, photographed by Major Gill”,, शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन व याच प्रकारचा दुसरा छोटा खंड जॉन मुरॉय यांनी प्रसिद्ध केला, त्याचं नाव होतं “The Rock-Cut Temples of India, illustrated by seventy-four photographs taken on the spot by Major Gill”, याचंही शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन यांनी केले होते. 

इतर महत्वाचे कार्य- अर्थातच त्याचे काम केवळ अजिंठा या विश्वविख्यात नावापुरते सिमीत ठेवणे उचित ठरणार नाही. लोणार या जगप्रसिद्ध सरोवराची, अमरावतीच्या जवळ मेळघाटात असलेल्या जैन तीर्थक्षेत्र मुक्तगीरीच्या मंदिर-शिल्पसमूहाची सचित्र ओळख जगाला करून देणारा रॉबर्ट गिल हा जगातला पहिला प्रकाशचित्रकार आहे. www.users.globalenet.co.uk वर उपलब्ध माहितीनुसार 1867 ला तत्कालीन शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1868 त्याला शासनाने डेलमियर लेन्सचा कॅमेरा व केमिकल्स दिली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च 1870 ला हे काम पूर्ण केले आणि 1872-73 ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला दिला. 

रॉबर्ट गिल व त्याची प्रियसी पारो –1845 मध्ये अजंठा येथे आल्यानंतर अजिंठ्यात लेण्यांच्या उत्खननाचे कामही जोरात सुरू होते. हजारो मजुर या कामात गुंतले होते. यातच एक म्हणजे लेणापुर गावची आदीवासी पारो. परिसराची माहिती असल्यामुळे पारो गिल यांना मदत करायची. हळु-हळु या संबधांचे प्रेमात रूपांतर झाले. ग्रामस्थांना यास विरोध केला. दोघांत तब्बल 10 वर्षांचे सहजीवन होते. यामुळे ग्रामस्थांनी तिला विष पाजुन मारले असे एक कथा सांगते. तर पारोचा मृत्यु आजारपणामुळे झाल्याचेही सांगीतले जाते. 


ना.धॊ. महानोरांचे खंडकाव्य "अजिंठा" – शिक्षक म्हणून मी जिंतुर येथे असतांना कवीमित्र श्री हरिष हातवटे यांनी मला प्रथम अजिंठा हा संग्रह वाचण्यास दिला. या वेगळ्याच कविता मी प्रथमच वाचत होतो. चौरस आकाराचे हे छोटेसे पुस्तक, त्यातील कविता आणि त्यातील पद्मा सहस्रबुद्धे यांची रेखाचित्रे छानच होती. महानोरांच्या काव्यात ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रकरणे नाहीत पण त्यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करुन, कल्पनाशक्ती वापरुन एका तरल निर्मिती केली आहे. कविवर्य कुसुमाग्रजांची प्रस्तावनाही वाचनीय आहे. महानोरांचा हा संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर ही गिल पारोची कथा अजून सर्वदूर पसरली. तो पर्यंत पारो-रॉबर्टची प्रेमकथा फारशी प्रसिद्ध नव्हती.  

अजिंठा चित्रपट - २०१२ मध्ये नितीन देसाईंचा "अजिंठा" चित्रपट आला आणि पारोच्या कथेला अजून प्रसिद्धी मिळाली. अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात, काठाकाठातला. झाडांच्या देठातला, रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला. या ना.धों. महानोर यांच्या कविताना चित्ररूप देऊन रुपेरी पडद्यावर आणले नितिन मनमोहन देसाई यांनी. 

एक आर्टिस्टची नजर घेऊन बनविलेला हा चित्रपट मराठी चित्रपटातील वेगळ्या विषयावर बनविल्या जाणार्‍या ज्या मोजक्या फिल्म्स आहेत त्यापैकि एक. मेजर रॉबर्ट गिल १९४४ मध्ये अजिंठ्याला आला. सैनिकी पेशाचा हा चित्रकार अजिंठा पाहून मंत्रमुग्ध होतो आणि त्याच बरोबर भाषेच्या पल्याड जाऊन पारो ह्या आदिवासी मुलीच्या प्रेमात पडतो त्याची ही कहाणी. महानोरांनी शब्दबद्ध केलेल्या ह्या शोकांतिकेत नैसर्गिक सौंदर्य आणि अजिंठ्यातील कलाकृती ह्या दोन्हींचा संयोग आहे. महानोरांच्या कविता कौशल इनामदारांनी संगीतबद्ध केल्या आहेत. यामध्ये ढोलकी आणि इतर एतद्देशीय वाद्ये वापरलेली आहेत. ही गाणी "जैत रे जैत" सारखी गळ्यात रुळली नाहीत तरी महानोरांच्या कवितेचा बाज राखून आहेत. सिनेमाचे सेट्स आणि अजिंठ्याचे विहंगम दृश्य ह्यांचे मिश्रण चांगले झाले आहे. गिलची चित्रे आकार घेतांना छान दाखवली आहेत. पारो जंगलातील संपत्ती वापरुन रंग तयार करते ते ही सुंदर रितीने दाखवले आहे. तिला इंग्रजी येत नसले आणि गिलला मराठी येत नव्हते तरी त्या दोघांना चित्रांमधील भव्यता आणि त्यामागची शब्दातीत पार्श्वभूमी माहीत असावी. ह्या प्रेमकथेला जातककथा आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान ह्यांची सुंदर जोड आहे.  नितीन देसाईंनी (आणि मंदार जोशी) लिहीलेल्या पटकथेमध्ये गिलच्या पाश्चात्य मनातील विचार आणि जलालचे भाषांतर छान दाखवले आहे. फ़ीलीप स्कॉट-वॉलेस आणि सोनाली कुलकर्णी आपापल्या भूमिकेत शोभून दिसले आहेत. 

खरे काय आहे? रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही. 1854-55 मध्ये भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते. पारोच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश ठेऊन बंदूक हाती घेतली. 1857 च्या उठावाच्या वेळी तो सैन्यात पुन्हा दाखल झाला. पण तिथे त्याचे मन रमेना म्हणून 1861 मध्ये त्याने पुन्हा चित्रकलेला वाहून घेतले. 

 सन 1845 ते 1856 या 11 वर्षांच्या सहवासातून त्यांना कुठलेही अपत्य झाले नाही किंवा होणार होते असाही उल्लेख दिसून येत नाही. परंतु पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात

अजिंठा गावात बांधली. ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत. आज या कबरीच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे! पारोच्या विरहाने रॉबर्ट गिल दु:खात आरपार बुडाला हे अर्धसत्य आहे. कारण वयाच्या 52 व्या वर्षी 1856ला तो अजिंठा येथे असताना अ‍ॅनी नामक स्त्री त्याच्या सहवासात आल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. अ‍ॅनीने रॉबर्टच्या सहवासात 26 फेब्रुवारी 1866 ला मिल्ड्रेड मेरी गिल या मुलीला व त्यानंतर रॉबर्ट (बग्गी) गिल या मुलाला मुंबई येथे जन्म दिला असल्याच्या नोंदी आहेत.

चित्रपटामुळे पारोचे नाव सगळीकडे पोहचले असतांना अजिंठा गावातील तिच्या समाधीकडे मात्र दुर्लक्षच आहे. गाजर गवत, उकिरडा आणि घाणीचा सामना करत या समाधीकडे जावे लागते. 

रॉबर्ट गिलचा शेवट व समाधी- एप्रिल 1879 च्या पहिल्या आठवड्यात खान्देशातल्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या एका दवाखान्यात रॉबर्ट गिल उष्माघाताने फणफणत होता. त्यातच 10 एप्रिल 1879 ला त्याचे निधन झाले त्याच्या निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या दफनभूमीत त्याचे दफन करण्यात आले, तेथे त्याची कबर आजही आहे. तिच्या आजूबाजूला गवत, झुडपे वाढलेली आहेत. आपल्या सांस्कृतिक ठेव्याला जगात नेणार्‍या गिलची व त्याला मदत करणार्‍या पारोची किमान कबर तरी आपण सुस्थितीत  राखायला पाहिजे. 

- समाधान महाजन 


संदर्भ – 

1) ‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा : तपश्चर्या आणि आहुती-  प्रदीप आपटे(दै.लोकसत्ता दि. 28 मे 2021)

2) रॉबर्ट गिल; प्रियकरापलीकडचा प्रज्ञावंत – रणजीत राजपूत (दै.दिव्य मराठीतील 2012 मध्ये प्रकाशित लेख)

3) अजंठा - भुजंगराव बोबडे (अजंठा विषयीचा एक लेख)

3) अजंठा – गौरी दाभोळकर (ऐसी अक्षरे, 29 डिसेंबर 2015)

4) अजंठा - ना.धों.महानोर 



यावलचा(जिल्हा, जळगाव) वैभवशाली इतिहास

यावल हा जळगाव मधील एक महत्वाचा तालुका आहे.  अंकलेश्र्वर शिरपूर रावेर बऱ्हानपुर महामार्गावरील यावल हे महत्त्वाचे गाव आहे पूर्वी यास यावल साखळी किंवा व्यावल असेही म्हणत. रावेर, फैजपुर, सावदा व यावल या भागात केळीचे महत्वपूर्ण पीक घेतले जाते. त्यास अनुकूल अशी इथली जमीन व वातावरण आहे. यावल मध्येच सातपुडयाच्या कुशीत  पाल हे थंड हवेचे व पर्यटनाचे ठिकाण आहे. या तालुक्याचा काही भाग हा सातपुडा पर्वताच्या परिसराने व्यापला आहे. यावल पूर्वी नीळ व हातकागद निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. याच ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय आहे.  यावलच्या चहूबाजूंनी तटभिंती व चार दिशांना चार प्रमुख दरवाजे होते. दक्षिणेकडील दरवाजा अजूनही शाबूत आहे. उत्तरेकडील दरवाजाचे बुरूज अस्तीत्वात आहेत. शहराजवळ एक मोठी जुनी मशीद आहे.  
यावल मध्येच निंबाळकरांची गढी वा किल्ला असल्याचे ऐकले होते. जळगावला असेपर्यंत किमान तो पहावा अशी इच्छा होती. या रविवारी तो योग आला. इथली ही गढी वा किल्ला शोधण्यास फारसा वेळ लागला नाही. जवळपास गावाबाहेर पश्चिम बाजूला असलेल्या नदीच्या पलीकडील किनार्‍यावर ही गढी आहे. इथले कोर्ट कुठे आहे? असे जरी कोणाला विचारले. व तुम्ही कोर्ट पर्यन्त पोहचलात  तरी तुम्ही आपोआपच गढीच्या पायथ्याशी पोहचता. कारण इथले कोर्ट बरोबर गढीच्या  परिसरात आहे, किंबहुना आता जिथे कोर्ट आहे तो भाग पूर्वी गढीचाच असावा. कारण जेव्हा फिरून तुम्ही अलीकडील नदीच्या बाजूने खाली उतरता तेव्हा लक्षात येते की आताचे कोर्ट हे किल्ल्याच्या आतील बाजूस आहे. बाहेरून तटबंदीची बाजू दिसते. कोर्टच्या दक्षिणेच्या बाजूला उंचच उंच बुरूज दिसतात. त्या बुरूजांपासून व पलीकडील मोठ्या  भिंतीच्या अलीकडील भागापासून मध्येच असणार्‍या एक छोट्या जागेतून वर जाण्यास मार्ग आहे. कदाचित पूर्वी ते मोठे महाद्वार असावे. वर गेल्यानंतर पूर्वी भक्कम असलेल्या तटबंदीचे अवशेष किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला दिसतात. पूर्वी कुठेतरी वाचले होते की किल्ल्यावर खूप कचरा व घाण आहे पण आता तसे काही दिसून येत नाही. बर्‍यापैकी किल्ला स्वच्छ आहे. येथील भव्य बुरूज हा 75.6 मी. लांब, 68.4 मी. रुंद आणि 45 मी. उंच आहे.  किल्ल्याच्या शाबूत असलेल्या भिंती मधून पूर्वीच्या बांधकाम कौशल्यासोबतच त्यांच्या आक्रमण व संरक्षण साठीची सिद्धता लक्षात येते. सुरूवातीला
आढळणार्‍या बुरूजांसोबत  पलीकडे देखील नदीच्या बाजूने एक मोठा बुरूज आढळून येतो. दक्षिण दिशेला गेल्यास यावल शहराचा एरिएल व्यू बघण्यास मिळतो. वरती पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या आजही बघायला मिळतात. कदाचित मधील काही वर्ष वरती काही नसावे पण अलीकडे लावलेली झाडे आता बर्‍यापैकी वाढल्यामुळे भर उन्हात गेल्यास नक्कीच सावली मिळते व किल्ल्याचा आनंद घेता येतो. या किल्ल्याला अथवा गढीला निंबाळकरांची गढी किंवा निंबाळकरांचा किल्ला  असे म्हणतात. 
या गढीला वा किल्ल्याला निंबाळकरांचे नाव का पडले? कोण होते निंबाळकर?         हा किल्ला गोबादादा निंबाळकर यांचा मुलगा आप्पाजीराव याने बांधला होता.  ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या ताब्यात असताना यावल हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. सन 1788 मध्ये शिंद्यांने राव धार निंबाळकर यास या परगण्याचा अधिपती नेमले होते. निंबाळकर घराण्याकडे ही सत्ता कित्येक वर्ष राहिली. यावल परगण्यास लागून असलेले रावेर, थाळनेर व उंबर हे होळकरांच्या ताब्यात होते.
निंबाळकरांनी होळकरांना 3,50,000 रुपये देऊन हे भाग यावल परगण्यात समाविष्ट केले. राव धार निंबाळकरांचा
मुलगा सुराजी राव निंबाळकर याने कर्नाटकी (नाईकडा) शिबंदी ठेवली होती. या कर्नाटक शिबंदीचा उपयोग त्याने शेजारच्या जमीनदारांच्या प्रदेशात केला होता. सन 1821 मध्ये त्याने या शिबंदीचा ताबा ब्रिटीशांकडे हस्तांतरित केला.  काही काळ यावल परगणा कठीण परिस्थितीतून गेला. त्यावेळी सुराजीराव निंबाळकरने आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भिल्ल व पेंढार्‍यांना  सक्रिय मदत केली. 1837 ते 1843 यावल हे शिंदेंच्या ताब्यात होते. सन 1843 मध्ये ब्रिटीशांनी हा परगणा ताब्यात घेतला. ब्रिटिश काळात या किल्ल्याचा उपयोग महालकारी कार्यालय म्हणून करण्यात आला होता. गडावर दोन मोठ्या इमारती होत्या. त्यातील एक जुनी कचेरी व दुसरी दुमजली इमारत ही निंबाळकरांचे निवासस्थान होती. पुढे तिला निमकचेरी असे संबोधण्यात जाऊ लागले. 
या गढीचे ठिकाण हे हडप्पासमकालीन/ ताम्रपाषाण वा मध्ययुगीन काळातील साईट आहे का? 
आज नेहमीप्रमाणे माझ्यासोबत इतिहासकार मित्र श्री भुजंगराव बोबडे होते. आम्ही किल्ल्यात प्रवेश करण्याच्या वेळेसच बोबडे सरांचे लक्ष खाली विखुरलेल्या पॉटरी/खापरांच्या तुकड्यावर पडली. सरांनी ती आम्हाला दाखविली. नंतर आम्ही व्यवस्थित पाहिले असता तशा प्रकारची अनेक खापरे त्या भागात पसरलेली दिसली. बोबडे सरांच्या म्हणन्यानुसार यांचा कालावधी प्रागैतिहासिक वा प्राचीन असू शकतो.  तसेच इथे मध्ययुगीन काळातील देखील काही खापरे आढळतात. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कारण या गढीला आजपर्यंत अशा अर्थाने कधी पाहिले गेले नाही. मुळात ही गढी  नदी किनारी आहे व पांढर्‍या मातीचा वापर करण्यात आला आहे. होऊ शकते की आधीच्या अस्तीत्वात असलेल्या पुरातत्वीय साईट वर या किल्ल्याचे बांधकाम झाले असावे किंवा
त्याची माती किल्ल्यासाठी वापरण्यात आली आसावी. कालांतराने किल्ल्याच्या भिंती व बुरूज ढासाळल्याने ही जुनी अवशेष वर आली असावीत. पण हे सर्व अंदाज आहेत. यावर पुरातत्व खात्यानेच अधिक प्रकाश टाकणे गरजेचे आहे.  आम्हाला त्या दिवशी जे काही आढळले त्यावर  खालील मीडियात आलेल्या बातम्यांच्या लिंक मी येथे शेअर करतो.                                                    1)https://m-tribuneindia-com.cdn.ampproject.org/v/s/m.tribuneindia.com/news/nation/late-harappan-era-artefacts-found-at-virgin-site-in-jalgaon-281570?amp_js_v=0.1&usqp=mq331AQKKAFQArABIIACAw%3D%3D#origin=https%3A%2F%2Fwww.google.com&prerenderSize=1&visibilityState=prerender&paddingTop=32&p2r=0&csi=1&aoh=16260660939334&viewerUrl=https%3A%2F%2Fwww.google.com%2Famp%2Fs%2Fwww.tribuneindia.com%2Fnews%2Fnation%2Flate-harappan-era-artefacts-found-at-virgin-site-in-jalgaon-281570&history=1&storage=1&cid=1&cap=navigateTo%2Ccid%2CfullReplaceHistory%2Cfragment%2CreplaceUrl%2CiframeScroll


व्यास मंदिर - याच निंबाळकर किल्ल्याच्या पुढे त्याच नदीकाठी सुंदर  व्यास मंदिर आहे. अलीकडे दक्षिण
भारतातील शैलीप्रमाणे एक मोठे प्रवेशद्वार मंदिराच्या समोर बांधण्यात आले आहे. तसेच मंदीरापर्यन्त जाण्यासाठी नदीवर सीमेंटचा एक छोटा पूल देखील बांधण्यात आला आहे. अलीकडे सुंदरसे गार्डन देखील आहे. मंदिराच्या पुजारी व सेवेकर्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भारतात महर्षि व्यासांची फक्त तीन मंदिरे आहेत त्यातील हे एक आहे. या ठिकाणी व्यासांचा निवास होता असे म्हणतात. दरवर्षी व्यासपौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते असे त्यांनी सांगितले. 

- समाधान महाजन 



धरणगाव व औटरम (हिंदुस्थानचा बेयर्ड निष्कलंक व निर्दोष सरदार)

धरणगाव शहरात ब्रिटिश अधिकारी औट्रम बद्दलचे दोन दुर्मिळ शिलालेख सापडल्याची बातमी काल सगळीकडे प्रसिद्ध झाली. खरे तर इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून माझी खूप दिवसांची इच्छा होती की, धरणगाव (जिल्हा, जळगाव) येथे जावे. धरणगाव हे ब्रिटिश काळातील खानदेशच्या जिल्ह्याचे ठिकाण होते. तेव्हाचा खानदेश जिल्हा म्हणजे आताचे धुळे, नदुरबार जळगाव ते पार बरहानपूर पर्यंतचा प्रदेश त्यात येत असे. या ठिकाणी ब्रिटीशांच्या वखारी (फॅक्टरीज) होत्या. पार्थला आठवीच्या इतिहासातील फॅक्टरी म्हणजे काय हे त्याला सांगतांना पुस्तकातील  पुढील वाक्य त्याला समजून सांगितली होती, "This was the base from which the Company’s traders, known at that time as “factors”, operated. The factory had a warehouse where goods for export were stored, and it had offices where Company officials sat. As trade expanded, the Company persuaded merchants and traders to come and settle near the factory."  त्यामुळे किमान त्याचे अवशेष तरी बघून यावे असे वाटत होते. माझे हे वाटने मी आमचे मित्र, मार्गदर्शक, इतिहासकार, हेरिटेज फाउंडेशनचे संचालक व डेक्कन अर्कीयोलोजिकल अँड कल्चरल रिसर्च इंस्टीट्यूट, हैद्राबादचे डायरेक्टर श्री भुजंग बोबडे यांना बोलून दाखवल्यावर त्यांना देखील ही कल्पना आवडली. अलीकडे आम्ही सोबत अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यामुळे अशा काही नवीन कल्पनांसाठी सर कायमच उत्साहाने तयार असतात. पण कालचा दिवस महत्वाचा होता. बोबडे सरांना जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच माहिती दिली होती की, धरणगाव येथे शिलालेख सारखं काही सापडले आहे. त्यामुळे इतर स्थळांना भेटी देण्यासोबतच तेही बघणे होईल असे बोबडे सरांनी सांगितले.

रविवारी आम्ही निघालो. श्री. बोबडे सर, मी, सोबत मित्र व  इतिहासाचे अभ्यासक सुशीलकुमार अहिरराव, मित्र आर.के वर्मा व अर्थातच पार्थ देखील सोबत होता. कारण त्याला पण या प्रकाराबाबत उत्सुकता होती. असे आम्ही सगळे जन धरणगावला पोहचलो. धरणगाव येथील नायब तहसीलदार श्री प्रथमेश मोहोड हे देखील तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचले व पुढील सर्व वेळ ते आमच्या सोबतच होते.धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयाच्या परीसरात बांधकामाची दुरूस्ती करत असताना दोन मोठे वर्तुळाकार शिलालेख प्राप्त झालेले दिसले. हे दोन्ही शिलालेख चांगल्या स्थितीत होते. एक मराठी व एक इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पण एकच मजकूर असलेले हे दोन्ही शिलालेख चक्क वर्तुळाकार होते. ते किती दिवसापासून कुठे होते? की एखाद्या जुन्या बांधकामात गाडले गेले होते? हाही इतिहास अज्ञातच आहे. त्यांच्या भाषेवरुन हे दोन्ही शिलालेख 19 व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील आहेत असे श्री बोबडे सर यांचा अंदाज आहे. हे दोन्ही शिलालेख जेम्स औट्रमबद्दल आहेत. 

एक साधा सैनिक म्हणून ब्रिटिश सैन्यात लागलेला व नंतर लेफ्टनंट जनरल या पदापर्यन्त मजल मारणार्‍या, कानपुर व लखनौ येथे 1857 च्या उठावात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवल्या गेलेल्या, अफगाण व सिंध युद्धात पराक्रम गाजविणार्‍या, अनेक ठिकाणी रेसिडेंट म्हणून काम केलेल्या, लंडन, कलकत्ता अशा विविध ठिकाणी ज्याचे पुतळे बसविले गेले. ज्याच्यावरून रस्ते,घाट व शहरांना नावे दिली गेलीत. अशा या जेम्स औट्रम बद्दल हे दोन्ही शिलालेख आहेत.  ज्याची कारकीर्द इतकी व्यापक होती व जगभर त्याच्या कार्याचा गौरव झाला होता. "हिंदुस्थानचा बेयर्ड निष्कलंक व निर्दोष सरदार" या उपाधीने गौरविण्यात आलेल्या  औट्रमचे धरणगाव सारख्या छोट्या गावात काय काम? व त्याचे शिलालेख इथे कसे सापडले.  कोण होता जेम्स औट्रम

सर जेम्स औट्रम (१८०३-१८६३).- हा प्रसिद्ध इंग्लिश सेनापति बेंजामिन औट्रम या एंजिनीयरचा मुलगा होता. त्याच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या आतच वडील वाल्यामुळें त्याची आई त्याला घेऊन अबर्डीन येथें रहावयास गेली. तेथेंच त्याचें प्राथमिक शिक्षण झालें. १८१८ सालीं अबर्डीन येथील मॅरिस्कल कॉलेजमध्यें त्याला ठेवण्यांत आलें. १८१९ सालीं हिंदुस्थानच्या लष्करी खात्यांत लेफ्टनंट म्हणून तो रुजू झाला. 5 ऑगस्ट 1819 ला 4th native infantry battalion मध्ये भरती करून त्याला खांदेशातील धरणगाव या मुख्यालयी पाठविण्यात आले.

धरणगाव (जिल्हा,जळगाव)- खांदेशातील धरणगाव हे ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे केंद्र होते. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलिस मुख्यालय हे धरणगाव याच ठिकाणी होते. शिवकाळापासून धरणगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. सुरतेवरून येता येता महाराज येथे थांबल्याची वंदयता आहे. कापसाची व मिरच्यांची मोठी बाजारपेठ असल्याने ब्रिटिशकाळात धरणगावला विशेष महत्व होते. गुजरात रेल्वेलाइनवर असल्याकारणाने व तत्कालीन ब्रिटिशांची मोठे केंद्र असलेल्या सूरतला रेल्वेने जोडलेले असल्याने खांदेशातील कापूस निर्यात करण्यासाठी ब्रिटीशांना धरणगावचे विशेष महत्व होते. येथे ब्रिटिशांची मोठी फॅक्टरी होती. वखारी होत्या. अजूनही त्या बांधकामाचे अवशेष या गावाच्या चोहोबाजूने दिसून येतात. गुड शेपर्ड स्कूल ही जुनी शाळा आहे. येथील अनेक जुन्या इमारतींना पाहिल्यावर इंडो-गॉथिक शैलीची

आठवण येते. येथे बंद पडलेल्या व भग्न अवस्थेत असलेल्या जुन्या कॉटन जिनिंग आहेत. तीन step-well (बावडी/पायर्‍यांच्या विहीर) या परिसरात पाहायला मिळतात. जुने भवानी देवीचे व महादेव मंदिर आहे. 

बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे हे जन्मगाव. फुलराणी व औंदुबर सारख्या अजरामर कविता लिहिणार्‍या बालकवींचे एखादी स्मारक या ठिकाणी खरे तर व्हावे अशी अपेक्षा. आम्ही आवर्जून त्या ठिकाणाला भेट दिली जिथे बसून औंदुबर सारखी कविता बालकवींनी लिहिली. त्या ठिकाणी आता औंदुबर देखील राहिलेला नाही. पण त्यात वर्णन केलेला निळासावळा झरा’, काळा डोह मात्र अजुनीही आहे.

धरणगाव व औट्रम - अशा या ऐतिहासिक शहरात 1825 ते 1835 अशी दहा वर्ष औट्रम राहत होता. येथेच औट्रमचे कार्यालय व निवासस्थान देखील होते. पुढे हेच निवासस्थान 1887 पासून महाराणी व्हिक्टोरिया ज्युबिलीच्या स्मारकप्रीत्यर्थ धर्मार्थ दवाखाना(charitable dispensary) म्हणून वापरण्यास सुरुवात झाली.(असा एक शिलालेखिय उल्लेख देखील या ठिकाणी सापडतो.) आज देखील ग्रामीण रुग्णालय म्हणून त्याचा वापर केला जात आहे. हे ग्रामीण रुग्णालय व त्याच्या बाजूला असलेले नगरपालिका भवन हे तत्कालीन प्रशासकीय इमारतींचे संकुल असल्याचा इतिहास अभ्यासकांचा दावा आहे. आम्ही दिनांक 05/07/2021 रोजी गेलो असतो जे वर्तुळाकार दगडात कोरलेले शिलालेख आम्हाला उपलब्ध झाले ते याच ठिकाणी. खरे तर ते शिलालेख आता व्यवस्थित जतन करणे गरजेचे आहे. खानदेश येथें असतांना येथील भिल्ल लोकांवर औट्रमने आपल्या अंगच्या कर्तबगारीनें चांगली छाप बसविली व त्यांचें एक पथक(फलटण) अर्थात भिल रेजिमेंट निर्माण करून शास्त्रीय पद्धतीनें त्या पथकाला त्यानें चांगलें लष्करी शिक्षण दिलें. या पथकाच्या साहाय्यानें खानदेशांतील लुटारूंचा त्यानें चांगला बंदोबस्त केला. धरणगाव येथे त्यांच्यासाठी मोठी वसाहत देखील त्याने बांधली होती. त्याला शिकारीचा विलक्षण नाद असल्यामुळें व शिकारीवर असतांना आणीबाणीच्या वेळीं जीं त्यानें अनेक अचाट साहसें केलीं त्यामुळें या भिल्ल लोकांची त्याच्यावर अतिशय भक्ति जडली होती. विश्वास बसला होता. औट्रमने उभी केलेली भिल रेजिमेंट पुढे ज्या ज्या ठिकाणी आदिवासींचा उठाव व्हायला लागला तेथे होऊ लागला. बॉडीगार्ड म्हणून देखील भिल रेजिमेंट मधील सैनिक काम करू लागले.

 लहानपणीं औट्रम फार अशक्त असे पण पुढें त्यानें चांगलेंच शरीर कमावलें व तो सहा फूट उंचीचा जवान बनला. १८३५ मध्यें त्याला गुजराथमध्यें पाठवण्यात आलें व तेथें असतांना कांहीं काळ त्यानें पोलिटिकल एजंटया नात्यानें काम केलें. १८३५ ते १८३८ पर्यंत गुजरातमधील संस्थानिकांचे उठाव मोडण्याचे काम देखील त्याने केले.

गौताळा- औट्रम घाट व औट्रम- आजच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर चाळीसगाव व कन्नड यांच्या मध्ये असलेल्या घाटाला औट्रम घाट म्हटले जाते, याचा याच रस्त्यावरून प्रवास करणार्‍या अनेकांना पत्ताच नाही. कारण त्याला कन्नडचा घाट म्हणून कॉमन पब्लिक ओळखते. ज्यांना किमान इतके माहिती आहे की या घाटाला औट्रम  घाट म्हटले जाते त्यातिल अनेकांना असे वाटते कि, औट्रम म्हणजे या रस्त्याचा व घाटाचा इंजिनीयर होता. त्यापलीकडील औट्रम  त्यांना अवगत नसतो. या भागातील अगदी एमपीएससी यूपीएससी करणार्‍या बर्‍याच विद्यार्थ्याना देखील औट्रम घाटाचा औट्रम व 1857 च्या उठावात कानपुरमध्ये हॅवलॉकला मदत करणारा, लखनौ उठावात ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करणारा, अवधचा पहिला कमिशनर म्हणून नेमणूक झालेला लेफ्टनंट जनरल औट्रम हा सेमच आहे याची जाणीव व ज्ञान दोन्ही नसते.    

तर असो, तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यांप्रमाणेच औट्रमला देखील शिकारीची आवड होती. धरणगाव येथे असतांना औट्रम याने ज्या बहुतांश शिकार केल्या त्या तत्कालीन घनदाट जंगल असलेल्या गौताळा घाटात केल्या. 1681 ला औरंगजेबाने या घाटाला प्रथम दुरुस्त केले असल्याच्या नोंदी मिळतात. 1827 ते 30 च्या काळात धरणगाव येथे सेवेत असतांना औट्रमने भिल्लांच्या मदतीने या घाटाचे बरेच काम केले होते व तो रस्ता पहिल्यापेक्षा अधिक सोयीचा केला होता. तसेच या घाटात होणार्‍या लूटमारीचा देखील त्याने बंदोबस्त केला होता. औट्रमच्या या सर्व कामाची दखल घेत जेव्हा 1872 ला मोटरगाडी नेण्याइतपत हा घाट मजबूत बनविण्यात आला. तेव्हा खानदेशचे कलेक्टर असलेले अॅशबर्नर यांनी या घाटाचे उद्घाटन केले व त्यास औट्रम घाट असे नाव दिले.  

अफगाण युद्ध व औटरम - १८३८ मध्यें पहिलें अफगाण युद्ध सुरू झालें. त्या वेळीं सर जॉन कीन याचा ए. डी. सी. म्हणून औट्रमची नेमणूक झाली. या कामावर असतांना त्यानें पुष्कळ शौर्याचीं कृत्यें केलीं. त्यांतल्या त्यांत गझनीजवळील झटापटींत शत्रूंचें निशाण काबीज करण्यांत त्यानें जी मर्दुमकी गाजविली ती खरोखर वाखाणण्यासारखी होती. या त्याच्या धाडसी कृत्यामुळें त्याला मेजरचा हुद्दा प्राप्त झाला.

सिंध प्रांत व औट्रम - १८३९ मध्यें त्याला लोअर सिंधचा पोलिटिकल एजंट नेमण्यांत आलें. नंतर थोड्याच दिवसांत अपर सिंधचा पोलिटिकल एजंट म्हणूनहि त्याची नेमणूक झाली. या जागेवर असतांना त्याचा वरिष्ठ अंमलदार सर चार्लस नेपीयर हा होता. नेपीयरच्या मनांत अपर सिंध खालसा करावयाचा होता. या गोष्टीला ओट्रम हा प्रतिकूल होता. त्यानें नेपीयरच्या कृत्यावर निर्भिडपणें सणसणीत टीका केली. पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. पुढें कांहीं दिवस लोटल्यानंतर ८००० बलूंची लोकांनीं हैद्राबाद येथील गोर्‍या लोकांच्या छावणीवर छापा घातला. त्यावेळीं औट्रम यानें आपल्या शौर्याची पराकाष्ठा करून आपल्या छावणीचें संरक्षण केलें. या वेळीं त्याची सर्वांनीं फारच तारीफ केली. खुद्द नेपीयरनेहि हिंदुस्थानचा बायार्डअसें यास उपनांव दिलें.

बडोदा/लखनौ/अवध/पर्शिया व औट्रम-  १८४३ मध्यें त्याला मराठी मुलुखांत पाठवण्यात आलें. या वेळीं त्याला लेफ्टनंट कर्नल असा हुद्दा मिळालेला होता. १८४७ त त्याला बडोदा येथें पाठवण्यांत आलें. बडोद्यास असतांना, त्यानें इंग्रज अधिकार्‍यांनीं चालविलेल्या लांचलुचपतीच्या प्रकारावर उघड टीका केली. त्यामुळें मुंबई सरकारचा त्याच्यावर कांहीं काळ रोष झाला. १८५४ मध्यें लखनौच्या रेसिडेंटच्या जागीं त्याची नेमणूक झाली. १८५६ सालीं त्यानें अयोध्या प्रांत इंग्लिशांच्या राज्याला जोडला व तो त्या प्रांताचा कमिशनर झाला. त्याला पर्शियावर स्वारी करण्यास पाठवण्यात आलें. खूशाब येथें त्यानें शत्रूंची कत्तल करून त्यांनां शरण यावयास लावलें. या त्याच्या पराक्रमाबद्दल त्याला ग्रँड क्रॉस ऑफ दि बाथहा बहुमानाचा किताब देण्यांत आला.

1857 चा उठाव व औट्रम - पर्शियामधून औट्रमला पुन्हां हिंदुस्तानांत बोलावण्यांत आलें, व कलकत्त्यापासून तो कानपूरपर्यंतच्या टापूंत जें लष्कर होतें त्याच्यावर त्याला अंमलदार नेमण्यांत आलें. याशिवाय अयोध्येच्या कमिशनरचें काम त्याच्याचकडे सोंपविण्यांत आलें. हें साल १८५७ होतें. उठावाला नुकतेंच तोंड फुटलें होतें. उठावातील सैन्याच्या मार्‍यापुढें टिकाव धरणें अशक्य झाल्यामुळें हॅवेलॉक सेनापतीला कानपूर येथें आश्रय घ्यावा लागला होता. औट्रम हा आपल्या सैन्यानिशीं कानपूर येथें हॅवेलॉकच्या मदतीला आला. त्यानें लगेच हॅवेलॉकला लखनौ येथील फौजेच्या मदतीला पाठवलें व त्याच्याबरोबर स्वयंसेवक या नात्यानें तो गेला. मंगलवार व अलमबाग येथील हल्ल्यांत त्यानें चागलेंच शौर्य गाजविलें व शत्रूंचा धुवा उडविला. त्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉस देण्यांत आला. लखनौच्या दुसर्‍या वेढ्यांच्या प्रसंगी गोमती नदीच्या बाजूच्या उठाववाल्यांच्या सैन्यावर त्याला पाठवण्यांत आलें. या हल्ल्यांतहि त्यानें जय संपादन करून उठावात सहभागी सैन्याला हरविले. लखनौ इंग्लिशांच्या ताब्यांत आलें. 

औट्रम याला लेफ्टनंट जनरल करण्यांत आलें. १८५८ मध्यें पार्लमेंटमध्यें त्याचे जाहीररीत्या आभार मानले. व त्याला बॅरोनेट करण्यांत येऊन एक हजार पौंडांचा सालिना तनखाहि देण्यांत आला. पुढें त्याची प्रकृति नादुरूस्त झाल्यामुळें तो १८६० मध्यें इंग्लंडास परत गेला. त्याच वर्षी कलकत्ता येथे औट्रम इंस्टीट्यूट या नावाची सैंनिकांसाठी एक स्वतंत्र संस्था ब्रिटिश सरकारने सुरू केली होती.   त्यानें केलेल्या शौर्याबद्दल त्याचें अभिनंदन करण्यासाठीं इंग्लिशांनीं एक जंगी मिरवणून काढली व त्याला एक मानपत्र अर्पण करण्यांत येऊन,

लंडन व कलकत्ता येथें त्याचा पुतळा उभा करण्याचें ठरलें. तो १८६३ च्या मार्च महिन्यांत 11 तारखेला मरण पावला. त्याचें शववेस्ट मिन्स्टरमध्यें पुरण्यांत आलें व त्याच्या थडग्यावर बेअर्ड ऑफ इंडियाहे अर्थपूर्ण शब्द कोरण्यांत आले. तेव्हाच्या टाइम्स ऑफ इंडियाने त्याच्या निधनाची बातमी देतांना एक छान ओळ वापरली होती- ‘No lips will open’. 1863 ला लंडन येथे त्याचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. कोलकता येथे देखील त्याचा पुतळा आहे. हुगळी नदीच्या किनारी असलेला घाट देखील औट्रमच्या नावाने ओळखला जातो. पाकिस्तानच्या जमशेदाबाद या शहराचे नाव पूर्वी औट्रमच होते. अशा या जागतिक किर्तिच्या ब्रिटिश अधिकारी व सेनानीच्या कारकीर्दीची सुरुवात खानदेशमधील धरणगाव या लहानशा गावातून झाली. आपल्या आयुष्याची दहा वर्ष तो या ठिकाणी राहत होता.

- समाधान महाजन 

(लोकल न्यूज चॅनल वर त्यासबंधी आलेल्या बातमीची लिंक - https://youtu.be/jCKv89OxPqU )