२०२० या संपूर्ण वर्षात कोरोनाच्या
साथीने अवघ्या जगात थैमान घातले होते. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन
झालेला देश
नुकताच
कुठे मोकळ्या
हवेत श्वास घेऊ पाहत आहे. पण या पूर्ण कालावधीत फक्त देशालाच
नव्हे तर अवघ्या विश्वाला एक नव्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. येणाऱ्या
पिढ्यांसाठी हा एक नवीन इतिहास लिहिला जात आहे.
आता नवीन वर्ष सुरू झाले आहे.
गेल्या वर्षी आयोगाच्या सततच्या बदलत्या तारखामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा
ठरवणे अवघड होत गेले. एक वेळ अशी आली की आयोगाच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी
तहकूब करण्यात आल्या, त्यांच्या तारखा अजूनही निश्चित झाल्या नाहीत. त्या लवकरच होतील पण
एक परीक्षार्थी व विद्यार्थी म्हणून आपले काम असते की आपण सदैव तयार असले पाहिजे.
सैनिक जसे युद्धासाठी तयार असतात अगदी तसे. कुठलाही excuse अशा वेळी
स्वतः साठी देणे हे आपल्याचसाठी जोखमीचे ठरू शकते. म्हणून अंतिम विजय गाठायचाच
असेल तर न थांबता आपण स्वतः ठरलेल्या नियमांप्रमाणे चालत राहिले पाहिजे.
आयोगाच्या परीक्षांचा
अभ्यास करत असताना अनेक विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. इतिहास हा त्यातीलच एक विषय. मुळात शालेय वयात काही ठिकाणी ज्या
पद्धतीने इतिहासाचे अध्ययन व अध्यापन केले
जाते त्यातून विद्यार्थ्यांची इतिहासाविषयीची निम्मी आवड संपलेली असते. कला
शाखेतील विद्यार्थी काही प्रमाणात इतिहासाशी सबंध ठेऊन असतात पण अकरावी पासून सायन्स साईड
घेतलेल्या विद्यार्थ्यांचा इतिहासाशी सबंध येतो तो थेट आयोगाच्या परीक्षांचा
अभ्यास करतेवेळी. अशा वेळी इतिहास हा विषय नकोसा वाटणारे अनेक विद्यार्थी आहेत. पण
मार्कांच्या शर्यतीत एक एक गुण महत्वाचा असतांना तो टाळता देखील येत नाही. मुळात
खरेच इतिहासाचे स्वरूप असे आहे का? तर मुळीच नाही. इतिहास हा एक अत्यंत रंजक विषय आहे
व तितकाच तो गुण देणारा देखील आहे. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेपासून तर एमपीएससी
वा जिल्हा स्तरावरील अगदी वर्ग ३ च्या परीक्षांमध्ये देखील इतिहास आपले महत्वाचे
स्थान राखून आहे. म्हणून या वेळी आपण पाहणार आहोत इतिहास या विषयाबद्दलचे गैरसमज
दूर करून अधिकाअधिक गुण आपल्याला त्यात कसे मिळवता येतील.

सर्वात प्रथम इतिहासाबद्दल असणारा अगदी
प्राथमिक गैरसमज असा की इतिहास म्हणजे
फक्त सनावळ्या व
युद्ध. वरवर पाहता त्यात तथ्य आहे पण अलीकडील आयोगाच्या
परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की अलीकडे खूप
क्वचित प्रश्न सनावळ्यांवर असतात. उदाहरणार्थ
२०१९ या वर्षात झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा व यूपीएससी ची पूर्व परीक्षा
यांचे पेपर पाहिले असता आपल्या लक्षात येईल की, दोन्ही पेपर
मिळून(१५+१५) अर्थात एकूण ३० प्रश्न जे इतिहासावर आहेत त्यातील फक्त दोन ते तीन
प्रश्न सनावळ्यांवर आहेत. तेही अप्रत्यक्षपणे विचारले गेले आहेत. त्यामुळे
विद्यार्थी मित्रांनो हा आपला गैरसमज मनातून काढून टाका की इतिहास म्हणजे फक्त
वर्ष व सन.
इतिहास म्हणजे जुनी गाडलेली भुते. त्यांना
परत का जमिनीवर आणायचे? हा अजून एक गोड गैरसमज. मुळात कुठल्याही समाजाच्या, राज्याच्या वा
देशाच्या प्रगतीचा पाया हा इतिहासावर आधारलेला असतो. ऐतिहासिक आकलन न झाल्यास
वर्तमानातील प्रश्नांचे स्वरूप कळने अवघड जाते. अशी इतिहासाचा कोणताही पाया नसलेली
व्यक्ती शासन प्रक्रियेतील महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत कशी बरे सांगोपांग विचार
करून निर्णय घेऊ शकेल? आज आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थीच उद्या आयएएस, आयपीएस, उपजिल्हाधिकारी, प्रांत, पोलिस उपधीक्षक, तहसिलदार अशा विविध
पदावर काम करणार आहेत. त्यांना या देशाच्या इतिहासाची व समाजाची वीण कळलीच नाही तर
ते देत असलेल्या योगदानाचे मूल्य त्यांना कसे कळेल? ते अवघड प्रसंगी
सर्वांचा विचार करून निर्णय कसे घेऊ शकतील?
भारतातील आरक्षणाचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, श्रीलंकेचा प्रश्न, भारतातील आदिवासी
जाती-जमाती, भारतातील भटक्या जाती व जमाती, भारतातील विविध ऐतिहासिक व धार्मिक
पर्यटनस्थळे, सामाजिक पद्धती, प्रथा- परंपरा या सर्वांचे आकलन केव्हा होईल
जेव्हा या सर्वांचा थोडा का असेना इतिहास आपल्याला माहिती असेल. आणि तेव्हाच आपण
आपल्या भावी पिढीला एक समृद्ध वारसा देऊ शकतो.
अलीकडे जेव्हा विद्यार्थी मला भेटतात वा
संपर्क करतात तेव्हा त्यांचा प्रश्न असतो आयोगाच्या परीक्षेत आजकाल इतिहासाचे
“काहीही” प्रश्न विचारतात. या या अमुक पुस्तकात त्याचे उत्तरच सापडत नाही. किंवा
अगदीच काही निरागस मुले म्हणतात, “आयोगाने बहुतेक या वर्षी आऊट ऑफ सिलेबस प्रश्न
विचारले आहेत.” खर तर बहुतांश परीक्षेमध्ये आयोगाचा अभ्यासक्रम ‘आधुनिक भारताचा
इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात’ असा आहे त्यामुळे कोणताही प्रश्न विचारला तर
तो यात बसतो. दुसरे म्हणजे प्रश्नांचे स्वरूप. आता आपण हा विचार केला
पाहिजे की स्वातंत्र मिळून आपल्याला 73 वर्ष झाली आहेत. 1947 ते 2020 या दीर्घ
कालावधीत भारतीय राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती व दळवळण यात
मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मूल्य-व्यवस्था बदलेली आहे. 70-80 च्या दशकातील
पिढी व या 2020 मधील तरुनांची पिढी यांच्यात एकूणच सर्वांगीण अंतर पडले आहे. साहजिकच
जस जसा कालावधी वाढतो व नवनवीन शोध लागत
जातात तसे एकाच घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत जातो. उदाहरणार्थ 1950-60 च्या
दशकातील लोक ज्या पद्धतीने व विचाराने एकूणच भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे व
त्यांच्या नेत्यांकडे पाहत असत त्यात आता बदल झाला आहे. हा बदल चिकित्सक व समीक्षक
पद्धतीचा आहे. राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली चळवळ व राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल
पूर्ण आदर ठेऊन आजकाल नवीन संशोधक या पद्धतीने विचार करत आहेत की त्या काळात
त्यांच्या आजूबाजूला कोणत्या घटना घडत होत्या. त्यांच्या आसपास या चळवळींचा काही
प्रभाव होता का? किंबहुना प्राचीन भारताच्या हडप्पा मोहेंजोदडो साइट्स जगप्रसिद्ध आहेत पण
मग आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात त्या संस्कृतशी सबंधित काही सापडते का? असे प्रश्न तरुण
संशोधांकांना पडतात, ते त्याचा अभ्यास करतात. त्यावर लिहितात. त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची
मदत मिळते. त्यातून अनेक नवे संशोधन प्रकाशित होत आहेत. त्या काळात महत्वाचे
योगदान देणार्या घटना व व्यक्तींवर संशोधन होऊन त्या प्रकाशझोतात येत आहेत. परिघाबाहेरचे
प्रश्न विचारले जात आहे. हा subaltern history आहे. नीचे से देखो
असे त्याचे स्वरूप आहे. एका अर्थाने इतिहास हा स्थिर कधी नसतो.

या सर्व बदलांचा परिणाम आयोगाच्या
अभ्यासक्रम व प्रश्न विचारण्याच्या पद्धतींवर देखील होतो. नुकतेच जून-2020 मध्ये
आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात जो काही बदल केला आहे तो या
सर्व घडामोडींचा परिणाम आहे. अजून एक उदाहरण आपणास देतो
, 2020 मध्ये झालेल्या
upsc च्या पूर्व परीक्षेत
सखाराम गणेश देऊस्कर व रखमाबाई राऊत यांच्यावर बहूपर्यायी प्रश्न विचारले गेले
आहेत. जे देऊस्कर महाराष्ट्रीयन असून त्यांनी बंगाल मध्ये मोठे कार्य केले होते.
1884 च्या रखमाबाइ राऊत खटल्याचे परिणाम महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण
भारतातील सुधारणा चळवळींवर पडले. तसेच काही वर्षापूर्वी राज्यसेवा परीक्षेत बुलढाणा
जिल्ह्यात 1930 च्या काळात सत्यशोधक समाजाच्या धरतीवर झालेल्या चळवळीवर प्रश्न
विचारले गेले होते.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे प्रश्न कसे सोडवायचे
व एकूणच इतिहासासाठी कोणते पुस्तके वाचायची? अभ्यास करतांना
विद्यार्थ्यांची संदर्भ पुस्तकांची यादी ठरलेली असते. त्यात अधिकचे पुस्तक
कोणालाही नको असते. वाटल्यास कमी झाल्यास चालेल अशी मानसिकता असते. एकूणच
परीक्षेतील स्पर्धा व प्रत्येक विषयाला मिळणारा वेळ बघता एक प्रकारे ते बरोबरच आहे.
अभ्यास करत असलेल्यांचे दोन प्रकार पडतात एक ज्यांचे उद्दीष्ट लगेचच येणारी
परीक्षा असते व दुसरे ज्यांना पुढील एक दोन वर्षात परीक्षा द्यायची असते. ज्यांना
परीक्षा देण्यास वेळ आहे त्यांनी त्यांच्याकडील सर्व संदर्भ पुस्तके वाचने गरजेचे
आहे. कारण परत तितका वेळ भेटत नाही. आणि महत्वाचे म्हणजे वाचलेले अभ्यासलेले कधीच
वाया जात नाही उलट ते आपल्या नॉलेज मधील अॅडिशन असते. फक्त इतिहासच नाही तर इतर
विषयांना देखील हाच नियम लागू होतो.
आधुनिक भारताच्या इतिहासासाठी माझे पुस्तक
अलीकडे जवळपास सर्वच विद्यार्थी वाचत असतात. या पुस्तकाचा फायदा हा आहे की हे
पुस्तक संपूर्ण परिक्षाभिमुख व अभ्यासक्रमावर आधारित आहे. आयोगाचा अभ्यासक्रम व
आयोगाच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न हा या पुस्तकाचा पाया आहे. फक्त राज्यसेवाच
नव्हे तर संयुक्त परीक्षा गट-ब व क साठी देखील हे पुस्तक उपयोगी आहे. या पुस्तकाची
रचना करण्यासाठी कोणते संदर्भ पुस्तके/ग्रंथ वापरली आहेत त्यांची यादी पुस्तकाच्या
शेवटी देण्यात आलेली आहे. ज्यांना आता लगेचच येणारी परीक्षा द्यायची आहे
त्यांच्यासाठी व आगामी वर्षात येणार्या परीक्षा द्यायच्या आहेत अशा सर्वांसाठी हे
पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे याच वर्षी प्राचीन भारताच्या इतिहासाची
देखील पहिलीच आवृत्ती प्रकाशित झाले आहे. प्राचीनचे हे पुस्तक देखील परिक्षाभिमुख
आहे.
दुसरे महत्वाचे म्हणजे चालू घडामोडींचा
अभ्यास करत असतांना विद्यार्थी ज्या वेळी वृत्तपत्रांचे वाचन करत असतात त्या वेळी
त्यात इतिहासाबद्दल येणार्या लेखांचे आवर्जून वाचन करावे. इतकेच नव्हे तर इतिहासाच्या
नवीनच प्रकाशित होणार्या पुस्तकांची समीक्षा देखील वाचण्यास हरकत नाही. त्यातून
आपल्याला नवे दृष्टीकोण मिळतात. एखाद्या व्यक्ति विषयी वाचत असतांना त्याच्या
जीवनातील विविध पैलूंवर लक्ष असू द्यावे. इतिहासाचे कोणतेही पुस्तक वाचत असतांना
त्यातील कालानुक्रम सोबतच घटनांमागील कार्यकारणभाव त्याचे लॉजिक देखील समजून घेणे
गरजेचे आहे.
खर तर इतिहास हा खूपच सुंदर विषय आहे.
त्याविषयी भरपूर काही लिहिता येईल. तूर्तास आता इथे थांबू. नवीन वर्षाच्या व आगामी
काळात होणार्या सर्व परीक्षांसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
- समाधान महाजन
(सदरील लेख युनिक बुलेटीनच्या जानेवारी 2021 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)