आज श्री.भुजंगराव बोबडे या इतिहासाने झपाटलेल्या एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. जे फक्त इतिहास लिहीत नाहीत तर इतिहास जगतात. इतिहास त्यांचा श्वास आहे. ते ज्या वेळी ऐन-ए अकबरीच्या पेज नंबर अमुक अमुक च्या तमक्या पॅरेग्राफ वर काय आहे हे सांगत असतांनाच्या दुसर्या मिनिटाला गांधी किंवा हडप्पन साईटस वर अचूक बोलू शकतात. आपले गाव विचारून झाले की लगेचच त्याच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या आर्किओलोजिकल साईटची किंवा एखाद्या ऐतिहासिक पण दुर्लक्षित स्थळाची माहिती ते लागलीच आपल्याला देतात तेव्हा आवाक होण्याची पाळी आपली असते.
फोनवरच्या पाहिल्याच बोलण्याच्या वेळी माझा जिल्हा व तालुका धुळे आहे असे ऐकताच, "तुम्ही भारतातील एकाच जिल्ह्यात सर्वाधिक आर्किओलोजिकल साइट्स असलेल्या जिल्ह्यातील आहात असे सांगून मला जो पराकोटीचा मोठा धक्का दिलाय त्यातून मी अजूनही सावरलो नाहीय..... "
भुजंगराव माझ्यापेक्षा वयाने एक-दोन वर्ष लहान असले तरी त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी पाहता त्यांना इतिहासातील माझे गुरु म्हणून घेण्यास मी विनाअट तयार आहे. (याठिकाणी एका पायावर असेही लिहिता आले असते पण दोन्ही पाय घेऊन सरांसोबत आता भरपूर भटकंती करायची असल्याने त्यांना त्रास देत नाही.☺)
भुजंगराव सध्या डेक्कन आर्किओलॉजीकल अँड कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट,हैदराबाद येथे संचालक आहेत. पण याआधी जळगावच्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. शिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांनी आधी काम पाहीले आहे.देशातील अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांच्या वेगवेगळ्या समितीत त्यांच्या समावेश आहे.अनेक नवी संग्रहालये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतायेत. इतिहास विषयात त्यांनी केलेले संशोधन बहुश्रुत आहे.
इतिहास मुळातून समजून घेण्यासाठी सरांनी सात लिप्या शिकून घेतल्या जसे की, देवनागरी, मोडी, ब्रम्ही, नंदीनागरी, ग्रंथा इत्यादि. त्यांच्याकडे आज 40 हजार संशोधन ग्रंथ, 15 हजार हस्तलिखित ग्रंथ, 4 हजाराहून अधिक पुरातात्वीक वस्तू, मौर्य काळापासूनची साडेचार हजार नाणी, 15व्या -16 व्या शतकातील पेंटिंग्ज, ताजमहलबद्दलचे जगातील एकमेव हस्तलिखित 'तारीख-ए-ताज', 1577 मध्ये अबूल फझलने लिहिलेला 'अकबरनामा', छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल माहिती देणारे जगातील पहिले हस्तलिखित, ज्याच्या जगात चारच प्रती आहेत अशा सुवर्ण अक्षरात लिहीलेल्या कुरानाची प्रत, असा मोठा खजिना त्यांच्याकडे आहे. आजच्या कॉपी पेस्ट पीएचडीची तुलना केली असता सर अनेकार्थी डॉक्टरेट आहेत.
एक ट्रक क्लिनर ते आज देशातील महत्वाचे इतिहास संशोधक हा त्यांचा संघर्षमय व जिद्दी प्रवास अनेकांना प्रेरणा देऊन जातो. सर मूळचे मराठवाड्यातील उदगीरचे असले तरी देखील आता त्यांची कर्मभूमी जळगाव व खांदेश अशी आपण म्हणू शकतो. पण सरांचा प्रवास भारतभर काय विदेशात देखील सुरू असतो.
किंचितही अभ्यास न करता जगभर इतिहासाला मतभेद व विद्वेषाचे एक विद्रूप रूप देणारी विषवल्ली सारीकडे वाढत असण्याच्या काळात भुजंगराव सारख्या सच्च्या इतिहासप्रेमी माणसांची गरज आधिकच जाणवते. हे सांस्कृतिक संचित जोपासले पाहिजे. वाढले पाहिजे.
- समाधान महाजन