विस्थापित ते प्रस्थापित हे डी झेड ठाकूर यांचे एक आत्मचरित्र वजा कथन आहे. पुन्हा एकदा मित्रवर्य उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी हे पुस्तक सजेश्ट करून उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. लेखक श्री ठाकूर साहेब यांनी कारकून ते उपजिल्हाधिकारी ही पदे भूषविली. उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी 12 वर्ष काम पाहिले.
एप्रिल 1957 पासून तर नोव्हेंबर 1995 पर्यंत अशी जवळपास अडोतीस वर्ष त्यांनी सेवा केली. या नोकरीचा वा सोबतच वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोखा त्यांनी यात मांडला आहे. लौकिक अर्थाने ते साहित्यिक नाहीत. त्यामुळे पुस्तक साहित्यिक कलाकृती म्हणून वाटणार नाही हे नक्की पण या पुस्तकाकडे बघतांना मला त्या काळातील काही घटना महत्वपूर्ण वाटल्या , त्या मी नोंद करून ठेवल्या.
• 1951-52 हा काळ रेशनिंग अर्थात कंट्रोल चा होता. बाजारात पैसे देऊन धान्य भेटत नसे. एका गावाहून दुसऱ्या दुसऱ्या गावी धान्य नेण्यासाठी बंदी करण्यात आलेली होती. प्रवासात सोबत पीठ बाळगता येत असे.
• 1957 मध्ये पहिली पोस्टिंग अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात लिपिक पदावर झाली. तत्कालीन अक्कलकुवा गावाचे वर्णन त्यांनी छान केले आहे. नंदुरबार ते अक्कलकुवा या प्रवासात त्यांना आठ तास लागत असत. त्याकाळात खानदेशात शिरपूर शिंदखेडा यांना जोडणारा तापी नदीवर गिधाडे या गावात ब्रिटिशकालीन पूल होता.
• तत्कालीन अक्कलकुव्याची मामलेदार कचेरी सागबारा सरकारच्या जुनाट इमारतीत होती. पोलीस स्टेशन देखील त्याच इमारतीत होते. संध्याकाळनंतर पेट्रोमॅक्स व कंदीलच्या उजडा मध्ये काम करावे लागत असे. गावात फक्त 15 ते 20 पक्के घरे होती पण ती कौलारू छपरांची होती. बाकी सर्व बांबूच्या कुडाची व कौलाची घरे होती. गावात एकही खानावळ लॉज व करमणुकीचे साधन नव्हते. तळोदा अक्कलकुवा खापर ही एकमेव बस होती. ती फक्त डिसेंबर ते सहा जून अशी हंगामी स्वरूपात धावत असे. गावात बँक नव्हती ते काम तहसील कचेरीतील कोषागार कार्यालयामार्फत चालत असे. एक कर्मचारी असलेले टपाल कार्यालय होते. धुळे येथून निघालेले पत्र अक्कलकुवा येथे पोहोचण्यासाठी 8 ते 10 दिवस लागत असत. शहरात विद्युत पुरवठा नव्हता ठिकाणी कंदील अथवा खुंट कंदील लावण्याची सोय केलेली होती. नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसे सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरून आणावे लागत असे.
• 1960-61 या काळात शेतकऱ्यांना विहीर , इंजिन ,बैल, बी बियाणे , खत व खावटी यासाठी तहसील कार्यालयातून कर्ज दिले जात असे. 1960 - 61 च्या काळात धुळे येथे गटविकास अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली.
• शहादा ते तोरणमाळ 57 किलोमीटर अंतर होते. तोरणमाळ येथे जाण्यासाठी राणीपुर पर्यंत 29 किमी जीप ने जावे लागे. व तेथून पुढे पायी. पण 1970-71 मध्ये तःसिलदारांना शासकीय वाहन पुरविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे तेथून पायी जावे लागत असे. तेथील तलावाच्या काठी असलेले वन विभागच विश्राम गृह ब्रिटिश कालीन होते.
• 1968 मध्ये चुडामन पाटील हे धुळ्याचे खासदार होते. 1973 ला लेखकाची नियुक्ती शिंदखेडा येथे झाली. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी रायबरेली येथील जागेवर पराभूत झाल्या. त्याकाळात त्याच सुमारास आलेले " झुमका गिरा रे बरेली की बाजार मे " हे चित्रपट गीत चांगलेच गाजले होते.
• 1977 मध्ये नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय नव्हते. धुळे, जळगाव, नाशिक हे सर्व जिल्हे तेव्हाच्या मुंबई म्हणजे आताच्या कोकण विभागात समाविष्ट होते. मुंबई महसूल विभगाची हद्द पूर्वेस मुक्ताई नगर ते दक्षिणेस सावंतवाडी अशी होती.
• 1980 च्या काळात साखर व सिमेंट वर शासनाचे पूर्ण नियंत्रण होते. त्या काळात खिशात पैसे असतील तर बाजारातून सोने विकत घेता येत होते. पण साखर व सिमेंट मिळत नव्हते. लग्नकार्य व दशक्रिया विधी साठी वीस किलो व सत्यनारायण सारख्या धार्मिक पूजेसाठी पाच किलो पर्यंतची साखर देण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले होते. सिमेंट घोटाळ्यामुळे तत्कालीन एका मुख्यमंत्र्यांना त्यांचे पद गमवावे लागले होते.
• 1980 - 81 मध्ये मालेगाव जवळील दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना हा पूर्ण क्षमतेने चालत होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात शेतकरी संघटनेचे कार्य जोरात सुरु होते. 1980 मध्ये टेहरे येथील शेतकरी आंदोलनात दोन शेतकरी मृत्यू झाल्याने वातावरण हे तणावपूर्ण होते.
• 1980- 81 मध्ये आठवीच्या पुस्तकात "महंमदाने पलायन केले ...." असा मजकूर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण होते. यात मालेगाव शहर अग्रेसर होते.
• 1983 मध्ये धुळे शहरात मामलेदार कचेरी ते कुमार नगर अशी शहर बस सेवा अस्तित्वात होती. नंतर ते गणेश कॉलनी पर्यंत वाढवण्यात आली.
- समाधान महाजन

खूप चांगली माहीत
ReplyDeleteखूप चांगली माहीत
ReplyDelete