बऱ्हाणपूर एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. 1602 ला अकबराने असिरगड व बऱ्हाणपूर ताब्यात घेतले तेव्हा त्याने म्हटले होते की , " आता मुघलांना दक्षिणेचे प्रवेशद्वार उघडले आहे". बऱ्हाणपूर मुघलांचा महत्वाचा सुभा होता. तत्कालीन खान्देशची ती राजधानी होती. अनेक राजपुत्र तिथे वेगवेगळ्या कालावधीत सुभेदार म्हणून काम पाहत होते. मुघलांची ती एक मोठी सैनिकी छावणी होती.
हे शहर व परिसर कितीही महत्वाचा असला तरी पाहिजे ती प्रसिद्धी न मिळाल्याने पर्यटकांची संख्या अत्यंत कमी असते. याला कारणीभूत जस प्रॉप् र ब्रॅण्डिंग न करणं हे असतं तसच सर्वसामान्य लोकांमध्ये बऱ्हाणपूर बद्दल असलेला गैरसमज देखील असतो. बरहाणपुर म्हटलं की पूर्वीच्या काळी येथे सुरू असणारा मुजरा आणि आता मिळत असलेली मिलन मिठाई मधील मावा जिलेबी यासाठीच बरीच मंडळींना बऱ्हाणपूर माहित असतं, त्यापलिकडे जाऊन हे शहर व परिसर समजून घेणे गरजेचे आहे.
एकदा उज्जैन वरून ओंकारेश्वर मार्गे येत असताना वाटेत हा भला मोठा किल्ले वजा डोंगर पहिला होता. तेव्हा पासून खूप उत्सुकता लागून होती की कधी एकदा असीरगड व बऱ्हाणपूर पाहील असे झाले होते. upsc त ऑप्शनल विषय इतिहास होता तेव्हाच बऱ्हाणपूर वाचण्यात आलेलं. शिवाय जळगाव हून अंतर फक्त 100 किलोमीटर च्या आसपास आहे... म्हणून कधीतरी जायचेच होते.
.....आणि तो दिवस उगवला. सोबत माझ्या इतकीच इतिहासाची आवड असणारा तसेच कधीकाळी माझा विद्यार्थी असलेला व सध्या SIAC सहित अनेक मान्यता प्राप्त संस्थांमध्ये इतिहास विषय शिकविणारा सुशील अहिरराव माझ्यासोबत होता. आम्ही भुसावळला गेल्यानंतर त्या ठिकाणी योगेश पाटील (IRTS) यांच्या घरी आम्ही नाष्टा केला त्याला सोबत घेऊन आम्ही बरहाणपुर च्या दिशेने रवाना झालो.
योगेश देखील कधी काळी आमच्या नाशिक सेल्स टॅक्स ऑफिसला STI होता व त्याचा पण ऑप्शनल विषय इतिहासच होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजची ट्रीप ' ऐतिहासिक ' अशीच होती.बऱ्हाणपूर हे रेल्वे स्टेशन सध्या योगेशच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने आम्ही थेट रेल्वे स्टेशन गाठले. तेथील स्टेशन इनचार्ज आमची वाटच पाहत होते. त्यांनी अगत्याने खाऊ घातलेला नाश्ता चहा घेवून आम्ही असिर्गडकडे रवाना झालो.
बऱ्हाणपूर पासून गड जवळपास 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता पुढे ओंकारेश्वर व इंदोर कडे जातो. मुख्य रस्त्यापासून उजव्या हाताला किल्ल्यावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो. तिथे असणाऱ्या गावात तपास केला असता त्यांनी सांगितले की गाडी थेट वर पर्यंत जाते. छोटा व वळणावळणाचा रस्ता होता. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने हळूहळू आम्ही वर पर्यंत पोहचलो. अत्यंत छोटा रस्ता असल्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. वर पोहचल्यावर किल्ल्याची भव्यता व विस्तार लक्षात येतो.
*****
असिरगड किल्ला -
अस मानले जाते की महाभारतामध्ये उल्लेख केलेला अश्वत्थामागिरी म्हणजेच हा किल्ला होय.उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवरून असे लक्षात येते की या किल्ल्यावर आठव्या ते बाराव्या शतकापर्यंत टकी राजपूतांचे शासन होतं. 1295 मध्ये दक्खन मोहिमेवरून परत दिल्लीकडे जातांना अल्लाउद्दीन खिलजी याने या किल्ल्याचा ताबा मिळवला. त्याशिवाय अहीर शासक 'असा आहेर' यांनी देखील या किल्ल्यावर राज्य केलं होतं.पंधराव्या शतकामध्ये या किल्ल्यावर फारुकी राजवंशाचा अधिकार होता. सम्राट अकबराने 1602 मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन मुघलांसाठी दक्षिणेचा दरवाजा उघडून दिला असे म्हटले जाते.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ फारसी मधील तीन चार तत्कालीन शिलालेख जतन करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अकबर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कालावधीतील शिलालेखांचा समावेश आहे. हे शिलालेख फारसी भाषेत आहेत.
अकबरकालीन शिलालेखानुसार 1601 मध्ये फारुखी राजवंश कडून अकबराने हा किल्ला हस्तगत केला व फारुखी राजवट समाप्त होऊन खानदेश मुघलांच्या ताब्यात गेले. अकबराने राजपुत्र दानियल ला खानदेश चा (बऱ्हाणपूर)सुभेदार म्हणून नियुक्त केले.
1617 मध्ये राजपुत्र खुर्रम याला शहाजहान ही पदवी देऊन बऱ्हाणपूर सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु 1622 मध्ये शहाजहानला बऱ्हाणपूरच्या ऐवजी कंधार येथे सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले त्यावेळी त्याने जहांगीरच्या विरोधात विद्रोह पुकारला. मोगल सेनेने त्याला पराभूत करून आग्र्यावरून असिरगडावर पाठवले तेव्हा त्याने गोपाळदास गौड याच्याकडे किल्ला सोपवून तो दख्खन मध्ये गेला. पण मोगल सेनेने त्याला पुन्हा पराभूत केले. बरीच वर्ष चाललेल्या संघर्षानंतर शेवटी 1626 मध्ये झालेल्या करारानुसार आपली दोन मुले दारा शिकोह आणि औरंगजेब, असिरगड किल्ला व 10 लाख रुपये मुघल शासनाला द्यावे लागले. 1627 मधील जहांगीरच्या मृत्यूनंतर परिस्थिती शहाजहानला अनुकूल झाली व अखेर तो भारताचा मुगल सम्राट बनला.
असीरगडावरील औरंगजेबकालीन शिलालेखानुसार1658-59 मध्ये औरंगजेबाने आपले वडील शहाजहान यांच्या विरोधात विद्रोह पुकारून सत्ता आपल्या ताब्यात घेतली व औरंगजेब सम्राट बनला. या वेळी औरंगजेबाने असीरगडावर सेनापती म्हणून अहमद नजम सानी याला नियुक्त केले होते.
मोगलांच्या पतनानंतर निजाम, पेशवे, शिंदे, होळकर यांनी या किल्ल्यावर राज्य केले असे मानले जाते. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला.
महादेव मंदिर - गडाच्या पश्चिम बाजूला एक पुरातन शिव मंदिर आहे. असे मानले जाते की महाभारतातील गुरु द्रोणाचार्यचा मुलगा अश्वथामा येथील मंदिरात रोज पुजा करायला येतो असे मानतात. आता दिसत असलेल्या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात मराठ्यांच्या काळात झाली. मंदिराजवळ एक मोठी प्राचीन बावडी (विहीर) आहे. तिथे दगडांमध्ये काही खोल्या व मार्ग बनवण्यात आले आहेत.
ब्रिटिश छावणी - किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम भागात ब्रिटिशांची छावणी होती. त्याकाळातील अनेक भवन, तळघर व कब्रस्थान तेथे आहेत. इंग्रजांनी पकडलेल्या कैद्यांना या ठिकाणी ठेवले जात होते. तत्कालीन किल्ला दुर्गम भागात असल्याने कैद्यांना पळून जाणे शक्य नसायचे.
इतकेच नाही तर कुका चळवळीतील अनेक विद्रोहींना या किल्ल्यावर 1872 मध्ये कैदेत ठेवण्यात आले होते. तिथे झालेल्या यातणांमुळे दोन क्रांतिकारी रूर सिंह व पहाड सिंह यांचा मृत्यू याच ठिकाणी झाला. तर मुलूक सिंह नावच्या क्रांतिकारीला शिक्षा पूर्ण झाल्यावर 1886 मध्ये पंजाबमध्ये पाठवून दिले.
हुतात्मा वीर सुरेंद्र सहाय- ओरिसा राजघराण्यातील सदस्य वीर सुरेन्द्र सहाय्य व त्यांच्या साथीदारांना 1827 मध्ये इंग्रजांविरुद्ध केलेल्या बंडाबद्दल व 1857 च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल 1818 च्या कायद्यातील कलम 3 नुसार झालेल्या शिक्षेत असिरगड किल्ल्यावर बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. 28 फेब्रुवारी1884 रोजी याच किल्ल्यावर त्यांचे निधन झाले. त्यांच्या सोबत च्या पाच लोकांचा मृत्यू देखील इथेच झाला. 1जानेवारी 1877 रोजी ब्रिटिश ची महाराणी ला भारताचे महाराणी घोषित केल्यानंतर धुरव व मित्र भानू या दोघा जणांना सोडण्यात आले होते. 1904 ला जनरल डफटन याने या किल्ल्याचे रुपांतर इंग्रज छावणीमध्ये केले.
पाण्याची व्यवस्था - असीरगड किल्ल्यावर एक मामा भांजा तलाव आहे. यात एक चौकोनी कुंड व एक विहीर आहे. पावसाचे पानी साठवून ते नंतर वापरण्यासाठी याचा उपयोग होत असे. किल्ल्यावर पाण्याची उत्तम व्यवस्था होती. इथे गंगा -जमुना व बदाम कुंड हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. त्याशिवाय इथे 6 तलाव व 14 विहीरि आहेत. राणी तलाव तसेच महादेव मंदीराजवळ असणारी बावडी हे पाण्याचे आजून काही स्रोत आहेत. किल्ल्याच्या खालच्या भागात एक मोठा तलाव आहे ज्यात किल्ल्यावरून वाहणारे पानी साठवून ठेवले जाई.
*****
किल्ल्याचे हे सर्व भाग पाहण्यासारखे आहेत. प्रवेशद्वार, तटबंदी, मजीद व महादेव मंदिर या वास्तू बऱ्यापैकी टिकून आहेत. तलाव आहेत. पण ब्रिटिशांची वास्तू पूर्ण धसलेल्या अवस्थेत आहे. अजूनही किल्ल्याची भव्यता व विस्तार किती मोठा आहे हे जाणवते. जर किल्ल्यावर व्यवस्थापन डागडुजी योग्य प्रमाणात केली तर अजूनही किल्ल्याचे सौंदर्य ऊठून दिसेल.
यानंतर आम्ही बऱ्हाणपूर गावातील बोहरा समाजाच्या प्रार्थना मंदिराकडे गेलो. पूर्ण संगमरवरात तयार केलेल्या पाच समाध्या अत्यंत आकर्षक आहे. पूर्ण परिसर प्रसन्न आहे.
ते पाहून झाल्यावर आम्ही कुंडी भंडारा पाहण्यासाठी गेलो कुंडी भंडारा हे बराहणपुर मधील अत्यंत महत्त्वाचे व प्रसिद्ध असे ठिकाण आहे. नुकतीच आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली की युनेस्को हेरिटेज साईट मध्ये कुंडी भंडारा नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काय आहे हे कुंडी भंडारा -
कुंडी भंडारा – सम्राट जहांगीर चा सुभेदार अब्दुल रहीम खान – ए –खान याने 1615 मध्ये या पानी पुरवठा करणार्या पद्धतीची निर्मिती केली. त्या काळात अशी पद्धत जगात फक्त इराक-इराण मध्ये अस्तीत्वात होती. तेथूनच या पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. सातपुडा पर्वत आणि तापी नदी यांच्या मध्ये वसलेल्या बरहाणपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी त्याने ही योजना कार्यान्वित केली
होती. त्यासाठी सातपुडा पर्वतापरिसरात असलेल्या भूमिगत जलस्रोतांचा शोध लावून पाण्याचा प्रवाह तापी नदीकडे जाण्यासाठी त्याने या जलस्रोतांना तीन ठिकाणी थांबवून त्यांना एक भूमिगत कालव्याने जोडून शहर व राजवाड्याकडे नेले होते. कुंडी भंडारा ते किल्ल्या पर्यन्त जाण्यासाठी जवळपास 100 कुंड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व कुंड्या एका कालव्याद्वारे जोडण्यात आल्याआहेत. या विहीरींची खोली जवळपास 80 फुट आहे. पाणी पुरवठा करण्याची जगातील ही एकमेवद्वितीय पद्धत आहे. ज्यामुळे अगदी अंतरराष्ट्रीय पर्यटक देखील याकडे आकर्षिले जातात. यातील 83 नंबरची कुंडी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहे व ती रेल्वेने चांगली जतन करून ठेवली आहे.
जे तीन जलाशय निर्माण करण्यात आले त्यांचे नाव होते 1)मूल भंडारा 2) सुखा भंडारा 3) चिंताहरण हे तिन्ही जलाशय शहरापासून दूर उत्तर पश्चिम दिशेला आहेत. त्यांची ऊंची शहरपेक्षा 100 फुट जास्तीची ठेवण्यात आली होती. जमिनीखाली वाहत असलेल्या त्या कालव्यावर ठिकठिकाणी हवा व प्रकाश येण्यासाठी कुंड्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्यांचे तोंड उघडे ठेवण्यात आले होते जेणेकरून आत हवा जाईल. कुंडीला वरच्या बाजूला बुरूजासारखा आकार देण्यात आला होता. त्यालाच कुंडी भंडारा असे नाव देण्यात आले होते. कुठल्याही मशीन वा यंत्राचा वापर न करता पानी पूर्ण शहरभर पुरवले जात असे.
तिथे असणारे एमपीटीडीसी चे लोक सांगत होते की तीस चाळीस वर्षांपू्वी पर्यंत यातून पाणी पुरवठा होत होता. कालांतराने अतिक्रमणे वाढली काही कुंड्या रहिवाशी घराजवळ असल्याने त्यांची पाहिजे ती देखभाल झालेली नाही तरी देखील पर्यटन मंडळाने अनेक कुंड्या सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
मुख्य व पहिल्या कुंडिजवळ एक लिफ्ट आहे त्याद्वारे खाली उतरता येते व आत जाऊन कालवा तील जाणारे पाणी बघता येते. जमिनीत खोलवर जिथे तो कालवा आहे तिथे लिफ्ट ने एकावेळी चार पाच लोकांना जातव्येते मात्र सध्या लिफ्ट नादुरुस्त असून लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू आहे.
पूर्ण बऱ्हाणपूर शहराला असलेली तटबंदी आजही अस्तित्वात आहे. पूर्ण शहर हे या तटबंदीच्या मध्ये वसलेलं होतं. शहरामध्ये आजही आपल्याला जुन्या काळातील अनेक दरवाजे बघायला मिळतात. या तटबंदीच्या आत जुने बरहाणपुर शहर हे वसलेल आहे. त्याच्यातून पुढे गेल्यानंतर आपल्याला तापी नदीच्या किनारी शाही महल बघायला मिळतो. अकबर ते aurngajeb सर्व मुघल सम्राट कधी ना कधी या ठिकाणी राहिलेले आहेत. मध्यप्रदेशच्या पर्यटन महामंडळाने हा किल्ला व्यवस्थित ठेवलेला आहे.
शाही महल(fort) - तापी नदीच्या किनारी 80 फुट उंचावर स्थित आहे. याची निर्मिती आदिल खान द्वितीय (1457 ते 1503) ने केली. या ठिकाणी सात मजली विशाल इमारत होती. त्यातील काहीच मजले आता शिल्लक आहेत. विटांनी तयार केलेले विशाल प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे जेथून तापी नदीचे दर्शन होते.
नदीच्या पलीकडे मुमताज महल ची कबर आहे. आग्रा येथे ताजमहाल बांधून पूर्ण होईपर्यंत तिचे शव येथेच ठेवण्यात आले होते नंतर ते काढून ताजमहाल येथे नेण्यात आले असे म्हणतात. मुघल काळातील वैशिष्टय बनलेली चौरस बाग याही ठिकाणी आहे. आता शिल्लक असलेल्या प्रचंड मोठ्या अवशेषांवरून लक्षात येते की त्या काळी या किल्ल्याला किती प्रचंड महत्त्व होत.
मिर्झा राजे जयसिंग यांची समाधी - राजस्थानची स्थापत्य कला व मुघलकालीन शिल्प असणारी मिर्झा राजे जयसिंग यांची समाधी बरहानपुर गावपासुन साधारण 10-11 किलोमीटर दूर आहे. इथे या समाधीला छत्री असेही संबोधले जाते. हे स्थळ मोहना व तापी नदीच्या किनारी आहे. 32 खांबाची ही छत्री आहे ज्यावर चार मोठे व चार छोटे घुमट आहेत. या स्थळापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता माहिती करून घेऊन जावा लागतो.
एकूणच बऱ्हाणपूर व असिरगड ही भारताची एक वैभवशाली परंपरा व समृद्ध इतिहास आहे. हा वारसा जपला पाहिजे व किमान भेट तरी दिली पाहिजे.
- समाधान महाजन










