दहा बारा वर्षांपूर्वीची हि घटना. तेव्हा प्रशासकीय भवन व प्रशासकीय
अधिकारी या संकल्पनांनी माझ्या जगण्याला
ग्रासून टाकले होते. अर्थात मी अक्षरशः काहीच नव्हतो कारण मी फक्त अभ्यास करत
होतो. एकानंतर एक टप्पे पार करत होतो किवा परत येवून पहिल्या पासून तयारी करत
होतो. अस सारख होत असल्याने अनेकदा आत्मविश्वासाचे बारा वाजायचे. त्या वर्षी जरा बरा चालले होते अस म्हणायला काही हरकत नव्हती. कारण
नुकतंच यु.पी.एस.सी पूर्व परीक्षेचा निकाल लागला होता. मुख्य परीक्षेचे फॉर्म
वैगेरे भरले गेले होते. धड नोकरीच्या ठिकाणी नाही व धड घरी नाही असा होतो.
पुण्याच्या एका मित्राच्या रूमवर सामानाची बॅग टाकलेली व मिळेल तिथे अभ्यास
करणे सुरु झालेले. मधूनच घरून बायकोचा फोन आलेला कि दिल्लीहून यु.पी.एस.सी
चे काहीतरी पत्र आले आहे. अधिक तपास करता अस लक्षात आले कि,
माझे जे कास्ट सर्टिफिकीट होते ते केंद्र सरकारच्या नमुन्यात
नसल्याने त्यांनी परत केले होते व त्यांच्या नमुन्यात मागवले होते. मुदत फक्त १२
दिवसांची होती. माझ्यापर्यंत पत्र येईपर्यंत दोन दिवस निघून
गेले होते. आता मी पुण्याहून धुळ्याला जाइपर्यंत व त्यासाठी लागणाऱ्या
कागदपत्रांची पूर्तता करून प्रकरण जमा करत अजून दोन दिवस लागणार होते. मध्ये तीन
दिवसांची सुट्टी आलेली होती. एकूणच सर्व प्रकार मला फार अवघड वाटत होता. मुख्य
परीक्षा अगदी तोंडावर आलेली असतांना असा एक एक दिवसाचा अपव्यय म्हणजे स्पर्धेतून
बाहेर पडण्यासारखेच होते. पण हे करणे आवश्यक होते नाहीतर परीक्षा देन्याचीच संधी
नाकारली जाण्याची शक्यता होती.
जी बस मिळाली ती पकडून गावी आलो. जवळ असलेले सर्व कागदपत्र घेवून
धुळे गाठले. सेतू केंद्रात जावून तपास केला तर संपूर्ण प्रक्रिया एक महिन्यापेक्षा
जास्त कालावधीची होती. त्यांना माझी नेमकी अडचण सांगितली तरी ते फार उत्सुक दिसले
नाहीत किंबहुना त्यांनी ते समजूनच घेतले नाही. तेथून तहसील कार्यालय गाठले. शिपाई
आत जावू देईना. त्याला बळच सांगितल साहेब ओळखीचे आहेत. त्यांनीच भेटायला बोलावले
म्हणून. आत घुसलो. काय बोलावं समजत नव्हत अशा ठिकाणी जास्त पाल्हाळ लावलं तर
बाहेरचा रस्ता लवकर दाखवला जाईल म्हणून साहेबांचे लक्ष जाताच जवळपास ओरडतच
सांगितले सर मी यु.पी.एस.सी च्या मुख्य परीक्षाला आहे माझी गरज अशी आहे,
साहेबांनी चक्क बसायला सांगितल. त्यांच्या हाताखालच्या दोन माणसांकडे
मला सोपवलं, याला काय लागत बघा म्हटले. मग त्यांच्या सोबत बाजूच्या कक्षात गेलो.
त्यांनी ऐकले म्हटले हा फॉर्म सेतू कार्यालयातून घेवून प्रांत साहेबांना भेटा
दोन्हींकडचे नावे व नंबर त्यांनी दिले. सेतू कार्यालयात पोहोचेपर्यत लंचब्रेक
झालेला. दिलेल्या नंबर वर फोन केला त्याने चार वेळा रिंग जावून पण फोन उचलला नाही.
नावाने विचारले असते सर जरा बाहेर गेलेय तीन वाजेपर्यंत येतील म्हटले. तेथून पायी
चालत परत प्रांत ऑफिसमध्ये गेलेलो. इथे रेफरन्स मिळालेले अंकल खूपच चांगले होते.
पण ते म्हटले ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरायची आज शेवटची तारीख आहे. साहेब
त्यात बिझी आहेत. तीन-चार दिवसांपासून तर ऑफिसला पण थोडाच वेळ येतात. आजही
तालुक्याच्या दौर्यावर आहेत. कधी येतील नाही
सांगता येत. आता वैताग आला होता. परत चालत तहसील ऑफिसमध्ये आलो तिथे सर्व वातावरण
बदलले होते. राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी वाढली होती. पोलीस बंदोबस्त वाढला होता.
सकाळी ज्या ठिकाणी जाणे सहज शक्य होते तिथे आता जाता येत नव्हते. तहसीलदार साहेब
पण दिसत नव्हते. गर्दी गोंगाट वाढला होता. आता इथे माझा आवाज कोणालाही जाणे अशक्य
होते.
परत सेतू कार्यालय गाठले. आता पार संध्याकाळ झाली होती. दिवसभर फिरून
फिरून पाय दुखायला लागले होते. जेवण नाश्ता काहीच नाही पण चहा पिवून पिवून पोटातील
आम्लता चेहऱ्यावर आली होती. येथे वरच्या मजल्यावरच कलेक्टर ऑफिस होते. जायचे का
तिकडे असा विचार डोक्यात चमकला. असही मी जी परीक्षा द्यायला चाललो होतो तीच
परीक्षा देवून तर कलेक्टर होतात ना. मग त्यांना भेटले तर काम झाल पाहिजे. पण मग
भेटणार कस? कोण भेटू देईल आपल्याला? हा जो
न्यूनगंड असतो ना तो लैच हेवी होता तेव्हा. तरी जिना चढत वर गेलो. ऑफिसबाहेर
सिक्युरिटी, थोडा वेळ दरवाजा उघडला आत बरीच माणसांची गर्दी जमलेली. येथे आपला
निभाव लागणार नाही याची पक्की खात्री झाल्याने पुढे न जाता मागे वळून परत खाली
बाकावर येऊन बसलो. एव्हाना बाहेर चांगलाच अंधार पडलेला. कार्यालयात सगळीकडे लाईट
सुरु झालेले. दिवसभराची वर्दळ आता शांत झालेली. इतक्यात वरच्या मजल्यावरून एक
घोळका झटपट खाली उतरतांना दिसला.
कलेक्टर मॅडम त्यात दिसल्या. ते सर्व गाडीकडे जातांना दिसले. मीही
नकळत तिकडे जावून पोहचलो. मादाम काही सूचना देत होत्या. अचानक त्यांची नजर
माझ्यावर गेली. मी ‘मॅडम यू.पी.एस.सी.'
इतक म्हणून थांबलो, त्यांनी
पुढे विचारल्यावर थोडक्यात त्यांना अडचण सांगितली. त्यांनी लगेच बाजूच्या माणसाला
सांगून आजच मला काय ती मदत करण्यास सांगितले. मला अल द बेस्ट देवून त्या गाडीत
बसल्यादेखील. समोरच्या अंधारात जाणाऱ्या गाडीचा अंबर दिवा चमकत होता. अर्थात आपण
साक्षात कलेक्टर सोबत बोलतोय हे मला स्वतःलाच विश्वास न बसल्यासारख वाटत असल्याने
त्यांनी दिलेल्या शुभेच्छाचे आभार मानन्याचे देखील भान मला राहिले नाही. त्यांनी
ज्याला सांगितले त्या माणसाने माझ्याकडून कागदपत्र घेतली. पुढच्या अर्ध्या तासात
मला जे सर्टिफिकीट पाहिजे होते ते माझ्या हातात होते.
- समाधान महाजन