*व्यासपीठ दिवाळी अंकातील लेख*


*व्यासपीठ दिवाळी अंकातील लेख*


एमपीएससीचा अर्ज झेरॉक्सच्या दुकानातून भेटत असे तिथपासून तर पोस्टातुन व आताआता ऑनलाइन करावा लागतो या सर्व प्रवासाचे आम्ही एक विद्यार्थी म्हणून साक्षीदार होता. ऑनलाइन अर्ज व ऑनलाइन निकालाचे हे पहिलेच वर्ष होते. निकाल लागेल अशा आवई एक-दोन महिन्यांपासून सारख्या उठत होत्या. आज संध्याकाळी निकाल लागल्याचे कळताच शरीरातील रक्तप्रवाह वेगाने सुरु झाला. हा निकाल आयोगाच्या वेबसाईटवर पहिल्यांदाच टाकण्यात आला होता त्यामुळे एखादी कॉम्प्युटर इंस्टीट्यूट शोधणे अत्यंत आवश्यक होते.पटापट कपडे घालून बाहेर आलो, एक दोघांना फोन लावला त्यांचेही फोन बीझी येत होते. ‘मी पास झालो असेल कि नाही?’, हो कि नाही, पास कि नापास , नापास कि पास, सिलेक्टेड यादीत माझा नंबर असेल का? अशा प्रश्नांचे मोहोळ डोक्यात उठले होते.रस्त्याने मी जमिनीवर कमी होतो डोक्यात जास्त होतो,
मग एकदम वाटायला लागले कदाचित नसेल, कदाचित मी कमी असेल कुठेतरी. पहिल्यांदाच मेन्स दिलेला माणूस का कधी कुठे पास होतो.मग कोण असेल सुहास असेलच so serious person मग मी नसायला काय झाले? अनेक जन तर फस्ट चान्स मधेच सर्व टप्पे पार करून डायरेक्ट पोस्ट काढतात मग मी का नाही? असाहि या वेळी जाम सिरिअस होतोच कि आपण.
जवळचे नेट बंद होते प्रमोदला फोन केला फाट्यावर शोध म्हटल तोही कदाचित घरून निघाला असावा, अजून जोरजोरात चालू लागलो, पुढचे नेट शोधण्यासाठी; रस्त्याने चिमणे व कदम सरांची टोळी आडवी आली,
‘काय सर रिझल्ट हे वाटत आज?’
या दोघांसोबत संघटनेची अजून चार पाच मंडळी होती. काही लोकांची एकूणच देहबोली व आवाजाची पट्टी अशी असते कि त्यांना भेटणे तर दूर पण बोलावेसे हि वाटत नाही. त्यातली हि मंडळी होती काम कम बाते ज्यादा असा त्यांचा खाक्या, स्वतः कधी वेळेवर शाळेत जाणार नाही पण कोणी लेट दिसल कि लगेच काहीतरी टोमणे मारणार, कोणी काही जास्त व खर खुर बोलायला लागल कि मग बिओला किंवा एडीआय ला सांगून त्याच्या शाळेची व्हीझीट करायला लावत. त्यामुळे प्रमोद मी तुषार सारखी अनेक जन यांच्यापासून दूरच राहायचो, यांच्याशी पंगाच काय पण बोलणही मला नको वाटे.पण आज एकदमच रस्त्यात आडवे मी माझ्या तंद्रीत असल्यामुळे लांबून मला ते दिसले नव्हते बहुतेक..
यांना कुठून वास आला काय माहित, कदाचित कदम किंवा चिमणे चे काम असावे. जर आलाच निकाल योगायोगाने तर धूम. मग पहा म्हणाव मजा. मी शोधत होतो एखादी नेट ते शेवटी सापडले एका ठिकाणी.
ते वरच्या मजल्यावर, जवळपास धावतच मी वर गेलो.त्याच्या पाच कॉम्पुटर पैकी एकही खाली नव्हता तो म्हटला,सर पाच मिनिट बसा एक खाली होणार आहे.ती पाच मिनिटेही युगासारखी वाटत होती.इतक्यात परत फोन वाजला,सुहासचा.
आनंद काय झाले.कळले का ?
अं..नाही यार अजून.
अरे कस काय? नाही म्हणजे आता आलोय एक कॅफेवर मग बघितला कि सांगतो.
ओके, पण जर का वेळ लागत असेल तर तुमचा रोल नं मेसेज करा मी इकडे बघायला लावतो कोणालातरी.
बर मी सांगतो.
इतक्यात कॅफेतील एक जागा खाली झाली होती.तिकडे पळालो.साईट चे नाव टाकले,सर्वर नॉट फाउंड,मग परत परत टाकून पाहिले, नाही काहीच आले शेवटी कॅफेवाल्या पोऱ्याला बोलावले सर साईट जाम आहे वेळ लागेल.काही महत्वाचे आहे का? आता याला काय सांगू किती न कस महत्वाच आहे ते.सुहास ची आठवण आली द्यावा का नं याला पण म्हटल नको आपला नं आपणच पहावा. ‘आपुले मरण पाहिल्या मी डोळा’.... टाईप,साला नेमक्या अशाच वेळी या अभद्र लाईन का सुचताय?
टाका परत www.mpsc.gov किती वेळा झाले टाकून आता हा शेवटचा म्हणून परत एकदा अड्रेस टाकला तर स्क्रीन पार पांढरी सफेद. साल हा ऑनलाईन निकालाने तर मी पुरता ऑफ होऊन चाललो होतो.अचानक निळी पांढरी चित्र व अक्षर दिसायला लागली. कर्सर च्या जागी गोल गोल वर्तुळ फिरू लागले.मग आयोगाच पूर्ण पेज च ओपन झाले whats new मध्ये result पर्यायावर गेलो अन जवळपास श्वास थांबला.जिल्ह्याप्रमाणे पास झालेल्या विद्यार्थ्यांचे रोल नं तितके दिलेले होते.आमच्या जिल्ह्याचे नाव असलेले पेज ओपण केले इनमिन दहा बारा जन पास झालेले दिसत होते.आता मी बराच वेळचे मुठीत पकडून आणलेले वहीचे पान उघडले ज्यावर माझा रोल नं लिहिलेला होता. ०००७८५ सुरुवातीला एक दोन झिरो असलेले तीन नं होते मग मी हळूहळू पुढे वाचत गेलो.६५२ नंतर थेट ७८८ नं दिसत होता.मी परत परत चेक केले त्यात ७८५ दिसला नाही मग आडवी उभी लाईन घाई घाईत पाहिली व परत क्रमाने पाहायला लागलो.आता डोळ्यांना नक्की आकडे ओळखता येत नव्हते.मग परत नेटच्या पोऱ्याला बोलावले त्याला कागदावरील नं दाखऊन साईट वर तो शोधायला लावला.मी तरीही आशेने त्याच्याकडे पाहत होतो जर चुकून माझ्या कडून निसटलेला नं त्याला सापडला तर पण त्याने नकारार्थी मान हलवलेली दिसली तस एकदम computor स्क्रीन धूसर दिसायला लागली.
त्याच्या नकारात्मक मान हलवण्याचा सरळ सरळ अर्थ होता मी पास झालो नाही.मी परत परत त्या लिस्ट वरून माझी अंधुक झालेली नजर फिरवत होतो.पण तो नंबर तिथे नव्हता; नव्हताच तो त्या यादीत.आता या समोर असलेल्या लिस्ट चा अर्थ होता आयोगाशी माझे सम्बन्ध आता या परीक्षेपुरते पूर्णतः संपले अत्यंत कठोर पणे संगणकाच्या स्क्रीन वर flash झालेल्या यादीत माझे अस्तित्व नव्हते मी संपलो होतो.
मोबाईलचा रंग चमकला,सुहासचा कॉल;
‘आनंद काय म्हणतो निकाल ?’
‘नाही आला’ मी कदाचित खूप केविलवाण्यापणे त्याला सांगितले .
तुमचा आलाच असेल?
हो म्हणजे माझा आहे व शर्मा व पाटील दोघांचाही आहे.
अंधार अंधार पसरत गेला डोळ्यासमोर. कॉम्प्युटर समोरच्या खुर्चीवर मी लोळागोळा होऊन पडलेलो. उठण्याची कुठलीही इच्छा नाही.हे परमेश्वरा अस कस झालं? का? का मीच परत परत अपयशाच्या तोंडी जायचे.माझ्या आयुष्यात एकदा तर येऊ दे यशाचा क्षण.प्रकाशाचा एक किरण तर मला दिसू दे. मी उगउच नये पुन्हा जमिनीतून हि कोणती व्यवस्था आहे? कुठे कमी पडतोय मी?
हळूहळू मी जिना उतरून खाली आलो,प्रमोद खाली आलेला होता.
काय मामा, आहे ना ?
कदाचित त्याने माझ्या तोंडाकडे पाहिले नसावे.मी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणे ‘हा काहीही नको सांगूस तुझा निकाल आहेच मामा.’
‘नाही माझा निकाल नाही, मी पास झालो नाही मी नापास झालोय पुन्हा एकदा मी नापास झालोय, आयोगाने मला घेतल नाही मी अनफिट ठरलो ’ अशी किंकाळी मला फोडावी वाटत होती पण मी परत फक्त नाही म्हणून गप झालो.
प्रमोदने गाडीचे तोंड फिरवले, बस म्हटला, कुठ जायचं मी विचारल नाही त्याने सांगितल नाही पण गाडी सुरु झाली,पळायला लागली ....खर तर मलाच या साऱ्या वातावरणातून पळायचं होत सेफ सिक्युर वातावरणात जायचं होत पण साल नेमक तेच होत नव्हत परत परत मी याच साचलेल्या डोहात येऊन पडत होतो जे मला नको होत, काय कराव कळत नव्हत.
गाडी हळूहळू शहराच्या जरा बाहेर आणली प्रमोद ने आमच्या नेहमीच्या ठिकाणी. आम्ही दोघ यायचो बऱ्याचदा या शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पसरलेल्या विस्तीर्ण मैदानांवर. ज्यावर नगरपालिकेने मध्येच आखून ठेवलेले रस्ते होते, ड्रेनेज व विजेचे खांब होते ज्यातील आता बरेचसे खराब झाले होते. हा भाग म्हणजे संध्याकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त होता. मध्येच कुठेतरी सुरु असलेले घराचे बांधकाम व लांबच्या लांब पडलेले वाळूचे ढिगारे. अशाच कुठल्याशा उंच वाळूच्या ढिगावर स्वतःला झोकून द्यायचे पडून राहायचे बराच वेळ, संध्याकाळचा प्रकाश हळूहळू कमी होत जायचा रातकिड्यांच्या आवाजासोबत अंधार वाढत जायचा. मग वर चांदण्यांनी भरलेल्या आकाशात काहीतरी शोधत नजर लाऊन द्यायची. कधी कधी मी एकटाच जाऊन बसायचो थंडगार वाळू गरम झालेल्या अंगाला लागायची ,तेव्हा सोबतीला डोळ्यातल पानी, तीव्र एकांत व पार भरकटून गेलेलं मन असायचं . मी हा असा एकटा इथं बसलोय हे कोणाच्या लक्षातही येणार नाही किंवा मला बोलवायलाही कधी कोणी येणार नाही हे मी जाणून होतो . अर्थात बाहेरचे असं कुठलही काम नाही जे माझ्यासाठी आडून राहील, मला जे येते ते इतर अनेकांना येतं, नुसतच येत नाही तर ते त्यात एक्सपर्ट आहेत मग जर सक्षम पर्याय उपलब्ध असतील तर कोणी माझी आठवण का काढावी? माझ्यात अस काय आहे तर जगाने माझी वाट पहावी? मी एक फालतू माणूस आहे जो या जगात फक्त जन्माला आलाय म्हणून जिवंत आहे बाकी माझ्या असण्या नसण्याचा कोणावर काहीच फरक पडणार नाही माझ्यासाठी काय आहे जगात?..... काही डोळ्यातील सहानुभूतीचे भाव जे कधीही फितूर होऊ शकतात. माझ स्वतःच म्हणून काय आहे? काय आहे माझी ओळख ?.... एक गोल ...छोटा गोल...मोठा गोल...एक शून्य ...मोठा शून्य...... कि फक्त एक निर्वात पोकळी..........मग डोक्यापर्यंत गरम रक्त वाहत यायचे जणू त्याच्या प्रवाहाच वेग जाणवायचा, कानशील गरम व्हायची. पायतल त्राण कमी होत जायच. मग तोंड वाळूत खुपसून विचार करत बराच वेळ मी तसाच निष्क्रिय पडून राहायचो. मग कधीतरी भानावर आलो कि उठून घराकडे पाय ओढत चालू लागायचो.
सोबत प्रमोद असला कि मग तो माझ्या मनाशी बोलत राहायचा खूप काही ...त्याला विश्वास वाटायचा माझ्याविषयी तो मला धीर पण द्यायचा खूप माझ्या आत्मविश्वास व अभ्यासावर त्याला माझ्याही पेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आसायचा. पडल्या पडल्या तो काय म्हणतोय ते मी ऐकत राहायचो. तो बोलायचा माझ्याविषयी, माझ्या अभ्यासाच्या चांगल्या पद्धतींविषयी अन कळून नकळत फुलवत राहायचा माझ्या गळून रित्या झालेल्या निराशग्रस्त मनाला. उदाहरण देत राहायचा अपयशातून बाहेर येणारी अनेक जणांची. अशावेळी त्याचा शाब्दिक आधारही खूप मोठा वाटायचा.
माझ्यात अशीही ठिणगी पेटलेलीच असायची मी उठून परत रूमवर जाऊन रात्रभर जागायची खुणगाठ मनाशी ठरवून परत धूळ झटकत उभा राहायचो कि “येस,मला हे करायचं आहे. मी स्वतःला सिध्द करून दाखवणार आहे. एक दिवस असाच मी वर त्या चांदण्यासारख चमकत राहणार व खालून हि गर्दी असणार मला पाहण्यासाठी, तो दिवस मला माझ्या जीवनात उगवून आणायचा आहे.”
…………
एक रस्ता जालना जाणारा, एक परभणी व एक गावात जाणारा. गावातून येणारा रस्ता सरळ परभणी ला जायचा व या रस्त्याला समोरच्या दिशेकडून येवून मिळायचा जालन्याहून येणारा रस्ता. खर तर हा तिठा होता पण तरी लोक त्याला चौक म्हणायचे मी व प्रमोद त्याला फाटा म्हणायचो ...
इथ येवून बसलो कि बर वाटायचं....पण तितकीच काळजी मी घ्यायचो कि कोणी अजून ओळखीच भेटू नये. वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे कोण देईल? मला राग यायचा नको नको वाटायचं उत्तर द्यायला. त्यापेक्षा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहत बसायचो. डोक्यात मांडणी राहायची किती पेजेस वाचायाचे राहिलेत, कोण-कोणती पुस्तके अजून बाकीये, कोणत्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या राहिल्यात. अंडरलाईन केलेल्या ओळी डोळ्यापुढे सरकून जायच्या, क्रमच्या क्रम आठवून पाहायचो, बाजूला वेटरलोकांची धावपळ सुरु असायची, गाड्या येवून थांबायच्या लोक उतरायची त्यातून बसयाची जायची-यायची दो-तीन भिकारी आकारण इकडे तिकडे फिरत राहायचे. टेबलवर सांडलेल्या पाण्याला बोटाने वाट करून द्यायचो...मग त्या वाहत जाणाऱ्या पाण्याच्या ओघाळकडे पाहत बसायचो किती तरी वेळ. या जत्रा हॉटेल मधील गर्दी वाढली कि आम्हाला वाटायचे हि उठायची वेळ झालीय...किंबहुना मालक एक-दोनदा चक्कर मारून जायचा मग आम्ही हळूहळू बाहेर पडायचो.
वाटलच अजून जरा वेळ बसायचे कि मग जालना रोड वरील छोट्या छोट्या तीन चार चहाच्या हॉटेल होत्या तिकडे जावून बसायचो. रंगीबेरंगी पट्ट्या व त्यावर चमकणाऱ्या लाईट्स यामुळे त्यांच्याकडे जावेसे वाटायचे, पण जत्रा हॉटेल एव्हडी चव काही त्या चहाला नसायची. पण बसायला मुबलक वेळ भेटायचे त्यामुळे बर वाटायचं. लाल-पांढऱ्या रंगाच्या खुर्च्या ओळीत मांडून ठेवलेल्या असायच्या कितीही गाड्या आल्या तरी त्यातील मानस आजूबाजूच्या खुर्च्यांवर अड्ज्स्ट होऊन जायची त्यामुळे या ठिकाणाहून उठण्याची गरज नसायची.
संध्याकाळ वाढत जायची तसे या हॉटेल्समधील लाईट्स अधिकच चमकत जायचे, अंधार दाटून आलेला असायचा..मी शोधत राहायचो उद्याच भविष्य वेड्यासारखं या आसमंतात. प्रमोद मला बोलत करत राहायचा ....मी जे सुचेल ते त्याला सांगत राहायचो तो नवीन काहीतरी सुचवत राहायचा ....मला प्रश्न पडायचा कधी कधी हा का करतोय आपली अशी मदत का धावून जातोय माझ्या अपयशातही माझ्या सोबत ...का हा इतरांसारख मला सोडून जात नाही वा लांबून माझ्याशी संपर्कात राहत नाही का हा इतका मनात घुसून बसतो ....का माझ मन मोकळ करतो ...काही समजायचं नाही पण तो माझी एक हक्काची जागा होती ज्याला मी रात्री-पाहटे केव्हाही आवाज देवू शकायचो बस्स.
हि लगातार दुसरी परीक्षा राज्यसेवा मी फेल झालो होतो. सुहास त्रिमूर्ती सर्व पास झाले होते. आता लगेचच काय कराव काही सुचत नव्हत. पुढची परीक्षा अजून खूप लांब होती आतापासून तिचा अभ्यास करावा का कि सुहास व इतर सर्व म्हणतात तस मी यूपीएससीचा अभ्यास सुरु करावा. या अंधारातही मला चेतन या अजून एका मित्राचा चेहरा आठवत असे तो सारखा म्हणायचा .... ‘मित्रा तुझ्या अभ्यासाला जर का कोणी न्याय देईल तर upsc च कारण तुझा अभ्यास त्या लेव्हल चा आहे.’
एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून दोन-चार दिवस झाले असतील. आमच्या केंद्रातील पाठक सरांच लग्न होत. मी शक्यतो जायचो नाही कुठे बाहेर. त्यातही सुट्ट्या लागल्या कि माझी अभ्यासाची धूम असायची पण हे सर चांगले होते, मला मदत करायचे व माझ्या विषयी सहानुभूती बाळगून असणारे जी काही मोजकी मंडळी मला वाटायची त्यात पाठक सर होते म्हणून मग त्यांच्या स्वतःच्या लग्नाला का असेना जाने मला भाग होते. ते लग्न कुठ तरी अकोल्यात होते. बसचा बराच प्रवास करून मी तिथे पोहचलो. आमची सर्व कंपनी तिथे भेटली ... मित्रच ते धरून नाचवले मला त्यांनी ..... अभ्यासातल मरगळ कमी झाल्यासारखे वाटले..जेवण वैगेरे झाल्यावर सर्वांचा निरोप घेवून निघालो, निघायला उशीरच झाला होता. हिंगोली मार्गे यायचे होते. तिथे तर पोहचलो पण तेथून गाड्या भेटेनात लवकर. बरीच रात्र झाली. बऱ्याच उशिरा गाडी आली. मुळात बराच वेळ गाडी नसल्याने तालुक्याकडे जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी आधीच स्टँडवर होती. तिकडून येणारी बस पण बरीच भरलेली होती. हि बस सोडून चालणार नव्हते कारण मग मला सकाळच झाली असती. गर्दीतून आत तर घुसलो पण उभ राहण्यासाठी पण नीट जागा नव्हती. शेवटी परत समोर आलो व गाडी सुरु झाल्यावर कसा-बसा लोकांच्या पायाजवळ जागा तयार करून पायर्यांवर बसलो ...... खूप वेळ गाडी सुरु होती. अशीही झोप लागत नसतेच प्रवासात. मग आजूबाजूची विविध लोक ... त्याचं भौतिक अस्तित्व रात्रीच्या अंधाराला कापत निघालेली बस .... खिडक्यांमधून भरारत घुसणार वार....ह्या सर्व उभ्या असणार्या व बसलेल्या लोकांना नक्की कुठ जायचं असेल का कि फक्त घरीच ते जाणार आहेत यातील प्रत्येकाची काहीच ओळख नाही त्यांना ती तयार करावी वाटत असेल का?
रात्री खूप उशिरा गाडी पोहचल्याचे कंडक्टरच्या आवाजाने कळल. फाट्याच्या जवळच वळण घेवून गाडी गावात जाणाऱ्या सरळ रस्त्याला लागली. गाडीतील लाईट्स सुरु झाले . रस्त्यातील लाईट्स कदाचित लागले नसतील अस वाटल कारण नेहमीप्रमाणे रस्त्यावर उजेड दिसत नव्हता. स्टँडवर गाडी थांबली. उतरलो तर पाय एकदम पाण्यातच गेला. भर उन्हाळ्यात पाणी कस काय म्हणून दचकलो तर सगळीकडे पाणी साचलेले होते. भरपूर पाउस दुपारनंतर पडून गेलेला दिसत होता. स्टँडवरील लाईट्स पण बंद होते. ज्या बसने आलो त्याच बसचे हेडलाईट्स संपूर्ण अंधारलेल्या वातावरणाला चिरून काढत होते.. बस गेली आणि परत अंधाराचे साम्राज्य पसरले. डोळे चोळून चोळून पहिले तेव्हा कुठ थोड थोड दिसायला लागल. अंधारात अदमासे पाऊले टाकत चालायला लागलो बसस्टँड समोरच्या मुख्य रस्त्यावर लागलो. पावसामुळे एकूणच सर्व गावाची लाईट गेलेली दिसत होती. हा तसा पावसाळ्याचा मौसम नव्हताच त्यामुळे वेगळच काही वाटत होत. एकतर आमवस्या जवळ असावी किंवा आभाळात अजूनही पावसाचे ढग भरलेले असावेत. कारण आकाशातून चांदण्याची साधी तिरीपही जाणवत नव्हती ... पुढे जावून उजव्या हाताला वळलो अन नाल्याच्या पाण्याचा आवाज पण जाणवायला लागला जो सकाळी येत नव्हता, याचा अर्थ दुपारून खूपच पाऊस झाला असावा, मध्येच रस्त्यावर झाडाच्या पडलेल्या फांदीत पाय अडकून मीच धडपडलो. पुढ ते धीरगंभीर वडाच झाड उभ होत आजच्या अंधारात ते मला फारच भेसूर वाटत होत. फांद्या व पानांचं मोठं डोक व वाकड्या तिकड्या पारंब्या एखाद्या हैवानासारख पसरून ते उभ होत. समोरच्या मंदिरात एरवी रात्रंदिन पेटत असलेली व रोज अंधारात दुरूनच दिसणारी ज्योत पण आज दिसत नव्हती. घाभारा अंधारात बुडालेला होता. मंदिराचा कळस कसाबसा अंधुक उजेडात आब राखून दिसला...रूम जवळ आलो एक पायरी चढून खिशातून चावी काढून कुलूप उघडायला गेलो. हाताने चाचपडून पाहिले तर तर तिथे कुलूपच नव्हत.. कडी उघडून आत पावूल टाकल तर इथेही पाणी लागल...म्हटल दरवाजातून आत पाणी घुसल असेल..पुढे गेल्यावर एकदम कशालातरी पाय अडकून धडपडलो पायाला चांगलच लागल त्या वेदना शरीरभर पसरत असतांनाच लक्षात आल कि मी ज्याला धडपडलो तो चक्क मोठा दगड होता ...त्याला रूम मध्ये कोणी आणले कसा आला तो इथे असे प्रश्न पडत असतांनाच त्याच क्षणाला वर पाहिले न उत्तर चटकन मिळाले मी चक्क मोकळ्या आकाशाखाली उभा होतो फक्त नावालाच.....रूममध्ये होतो...पावसाचा हा जहरी फटका होता रूमचे पत्रे उडून गेले होते..व पत्र्यावर ठेवलेले दगड रूममध्ये येऊन पडलेले होते..आता रुममध्ये थांबण्यात जास्त अर्थच नव्हता. बाहेर आलो कुठ जाव डोक चालत नव्हत रात्रीचे दीड दोन वाजलेले होते. कोणाला त्रास देण्यात अर्थ नव्हता लाईट नव्हते त्यामुळे विविध घरातील फॅन व एसी सर्व बंद असल्याने थोडा आवाज पण मोठा वाटत होता, माझ्या हालचालींनी घरमालकाच्या घरात काही आवाज आला मला बर वाटला मी माझ्या रूम ला कडी लावून बाहेर आलो त्यांनी त्यांचे लोखंडी गेट उघडले...
म्हटले, काका काय झाल हे ?
अहो सर खूपच वादळ न पावूस आला हो दुपारून ....तुमच्या रूमचे अख्हे पत्रे उडून मागच्या शेतात जावून पडलेत ... अजुन्बी तिथेच हायत.
माझ ....
तुमच बी चक सामान भिजलं हो..
मायला पुस्तक बी भिज्लीत ...
मग कुठशीक ठेवलीत कि हाय तिथच अजून....
ठेवलीत तुमच्या काकूने वर गच्चीवर जावून......आम्ही बी वर झोपलोत या तुम्ही पण ...
गादी,चादर काही विचारण्यात अर्थच नव्हता. सर्वच भिजलं असेल ते आता सापडवून पण उपयोग नव्हता. काकाने दिलेली सतरंजी घेवून वर गेलो तिथे आधीच सर्व जन आलेले दिसले जिन्यातून खाली उतरतांना थोडी जागा दिसली तिथे टाकून झोपलो.....झोपलो म्हणजे पाठ टेकवली झोपच येईना काय झाल असेल माझ्या सामानाच?, माझ्या पुस्तकाचं?
- समाधान महाजन

बदल

दिवस जातात तस आपण हळूहळू काही गोष्टी मिस करतो का स्वतःच्याच? जस आपण आपल्याला चांगलं ओळखतो किंवा ओळखायला लागण्याची सुरुवात होते तेव्हा  आपल्या व्यक्तिमतवातील अनेक बाबी आपल्याला खटकत असतात, हे सुधारल पाहिजे असे वाटू लागत किंबहुना हे नाही सुधारल तर अमुक अमुक ठिकाणी आपल काही खर नाही अशी टोचणी व फेल्युयर मनात घोळत असत....
कालांतराने आपण स्थिर होतो. स्थावर पन होतो. मग आपण हळूहळू विसरत जात असू का?  की आपल्याला काय सुधारायचे  होते?  की आपण त्या सोबत अॅडजस्ट करून घेतो. पण आपण आपल्याला स्वीकारल असलं तरी प्रथमच भेटणारी व्यक्ति नाही न पचवू शकत असल काही. 
मग अशा भेटी नंतर काहीतरी मनाला खात...आपण सोडून दिलय बदलण की काय आस वाटत राहत. हे एक सर्जनशील मनासाठी फारच भयंकर आहे. अस होऊ नये. 
                                                                       - समाधान महाजन 

शांतता

लोक खूप बिनधास्त असतात व बोलतात पण. एखाद्या हॉटेलवर थांबणे असो वा जेवणे असो सल्ला देतांना इतक्या कन्फर्म सांगता की मला त्यांचे कौतुक वाटते. सोबतच स्वतःबद्दल विचार केला तर कोणाला अस काही सांगण्याची हिम्मतच होत नाही, न जाणो आपण सांगितलेल्या जागी जाऊन यांनी जेवण केलं व ते त्यांना आवडलं नाही तर. तसच मुक्कामी राहण्याबद्दल असो आपण सांगावं अन समोरच्याला ते आवडू नये म्हणजे किती मोठी आपली नामुष्की अस उगाचच स्वतः ला वाटत
पेक्षा अशी चर्चा कुठे सुरू असेल तर मी शांत राहणे पसंत करतो किंबहुना माझी ती शांतता किती बोलकी आहे हे माझे मलाच माहिती असते.
                                                                 - समाधान महाजन