शेवटी आज ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपट पाहण्याचा योग आला, अर्थात टीव्ही वर कारण थिएटर मधून तो मिस झाला होता. यात अक्षय पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मीडिया ऍडव्हायजर म्हणून काम करतांना दिसतो.
अक्षय हा खूप गुणी व ताकदवान अभिनेता असून एकूणच चांगले स्क्रिप्ट, चांगले बॅनर व ब्लॉकबॅस्टर हिट न मिळाल्याने तो तसा वंचितच राहीलाय असं माझं वैयक्तिक मत आहे.
बॉर्डर मध्ये सगळ्या मुरलेल्या चेहऱ्यांमध्ये एकदम नवी पालवी सारखे त्याचे दर्शन सुखद वाटते, आजही जेव्हा केव्हा बॉर्डर दिसतो तेव्हा त्याची ती गालावर पडणारी खळी, किंचित ओठ बाजूला घेऊन हसन, डोळ्यातील चमक फ्रेश करून जाते.
ताल मध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या समोर असतांना पण जी ग्रीप अक्षय ने पकडलीय त्याला तोड नाही. त्यावेळी त्याच्या डोक्यावर असलेली ती खास हिमालयीन टोपी व तो चेहरा नजरेसमोरून जात नाही, भलेही ऐश्वर्या कितीही आकर्षक दिसो.
आ अब लौट चले हा ऐश्वर्या सोबत असलेला अजून एक चित्रपट. आता कदाचित आवडणार नाही पण फॉरेन लोकेशन वर चित्रित करण्यात आलेली सुंदर दृश्य असणारा हा चित्रपट मी कॉलेजला असतांना आलेला व तेव्हा पाहिल्याने आवडलेला असा होता.
मोहोब्बत हा माधुरी सोबतचा चित्रपट. या वेळी चर्चा माधुरीच्या होत्या. कारण बाप विनोद खन्ना सोबत दयावान मध्ये व या मोहोबत मध्ये मुलगा अक्षय सोबत एकच हिरोईन ती म्हणजे माधुरी , याही चित्रपटात अक्षय जगला होता.
नंतर काही कॉमेडी चित्रपटात व दिल चाहता है सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका चांगल्या होत्या. अजूनही कॅरॅक्टर रोल मिळाल्यास तो उत्तम न्याय देईल.
आज ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरच्या निमित्ताने त्याची आठवण पुन्हा ताजी झाली इतकंच.
- समाधान महाजन


