मोठे झाल्यानंतर स्वानुभवातून, वाचनातून, कार्यालयीन प्रोटोकोल
म्हणून वा मित्रांचा प्रभाव म्हणून आपल्याला खेळाचे महत्व पटत जाते. आयुष्यातील
स्ट्रगल पिरिअड संपत जातो व मनुष्य जसजसा सेटल्ड होत जातो तस तो आपल्या
आरोग्याबाबत जास्त जागरूक होत जातो. मग तो सकाळी मैदानावर फिरायला जातो, जॉगिंग
ग्रुप, लाफ्टर ग्रुप जॉईन करतो, ट्रेकिंग ग्रुप जॉईन करतो , या ना त्या मार्गाने
फिटनेस कडे लक्ष देतो. मुलांना लहानपणापासून खेळाबाबत सजग करतो, विविध खेळांची
शिबीर अलीकडे सुट्टीत व वर्षभर सुरु असतात. त्या ठिकाणी आलीकडे खूप गर्दी दिसते.
आम्ही कार्यालयीन कामात जास्त व्यस्त झालो कि स्ट्रेस वाढतो अशा वेळी कोणताही खेळ
किंवा व्यायाम आम्हाला रील्याक्स करतो. अलीकडे तर मी ट्रेकिंग ग्रुप तयार करून
बरेच किल्ले, डोंगर चढून गेलो, गेल्या दोन वर्षापासून जिम सुरु आहे त्याचा कामावर होणारा परिणाम खूप सकारात्मक
होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे घरी आल्यावर
मुलांसोबत खेळन्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी उर्जा टिकून राहते.
पण जस मला आठवते तस लहानपणी खेळाची मला इतकी आवड नव्हती. कदाचित
त्याचे कारण असेल कि वडिलांची सतत बदली व्हायची मग गाव बदलले कि माझी शाळा माझा
वर्ग सर्व बदलायचे त्यामुळे सर्वात मोठा परिणाम व्हायचा तो म्हणजे खेळायसाठी मित्र
भेटायचे नाहीत, जेमतेम ओळख होऊन खेळणे
सुरु झाले कि बदली व्हायची त्यामुळे ग्रुप टिकायचा नाही मग परत दुसऱ्या ठिकाणी
जावून त्यांच्याशी लगेच ओळख करून घेण्याइतपत माझा बोलका स्वभाव पण नव्हता. त्यामुळे कुठ गेले कि खेळणारे मुल दिसले कि मला
जुने मित्र आठवायचे. मला आजपण वाटत कि जी मुले लहानपनापासून एकाच ठिकाणी राहतात
त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना गोतावळा मोठा भेटत जातो. शेवटी काही
इनडोअर गेम सोडले तर मुळात खेळ हा सांघिक पणे खेळण्याचा प्रकार आहे. अशा वेळी
शाळेतील खेळाच्या तासिका सोडल्या तर सुट्टीच्या काळात मुलांना खेळायला मित्र हवेत.
आजकाल ज्या शाळा खेळांकडे लक्ष देतात त्या सोडल्या तर बाकी ठिकाणी
अधिक मार्क्स च्या ‘मार्क्सवादात’ मुलांचे बालपण खुरटले जाते. शाळा सुटली कि काही
वेळातच पुन्हा पाठीवर दप्तर घेवून शिकवणी वर्गाला पळणारी पोर दिसली कि ती काही तरी
गमावत आहेत अस वाटत राहत. आलीकडे थोड्याफार प्रमाणात खेळांना ग्ल्यामार आलय पण
त्याची कारणे वेगळी आहेत. नेहमीप्रमाणे क्रिकेट मध्ये येणारा अफाट पैसा सोबत
प्रसिद्धी हे तर आहेच शिवाय मेरी कोम, चक दे इंडिया, दंगल , गोल्ड, भाग मिल्खा
भाग, सारख्या चित्रपतांमुळे खेळूडांना मिळणारी प्रसिद्धी पाहून पालकांना आपल्या
मुलांनी पण अस काही केल पाहिजे अस वाटण्यातून पण खेळाकडे लोकांचा ओढा वाढला आहे.
शिवाय सरकारी प्रोत्साहानातून अनेक बाबी सुरु आहेत, एशियाड, कॉमोनवेल्थ, ऑलम्पिक
सारख्या अंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून जिंकणाऱ्या खेळाडूंवर होणारा बक्षिसांचा
वर्षाव व प्रसिद्धी पण काही जणांना या कडे आकर्षित करते पण त्या साठी त्यांनी
घेतलेली मेहनत व त्रास पण पाहिला गेला पाहिजे. एक एक खेळाडू त्याचे सर्वोत्तम देण्यासाठी
व ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र किती कष्ट करतो ते महत्वाचे आहे.
खेळाचे व माझे तसे सुरुवातीपासूनच कधी जमले नाही. अधिकृतपणे खेळ व
मैदान या प्रकाराशी माझा सबंध आला तो
सहावीला नवोदय विद्यालय मध्ये गेलो त्या वेळी. तिथे आमचा सकाळचा दिनक्रमच सुरु व्हायचा
"मॉर्निंग पी टि" या कम्पल्सरी व जीवघेण्या प्रकाराने, सकाळी
पाच साडेपाच ला ऐन गाढ झोपेत असतांना जाणीव पूर्वक टेपरेकॉर्डर वर मोठ्या आवाजात
देश भक्तिपर गीते , सोबत मुलांच्या हालचालींचे आवाज, ग्राऊंड वर पालवे सरांची वाजणारी जोरदार व्हिसल, सकाळच्या निरव शांततेत 'गिनती कर' म्हणून घुमणारा सरांचा आवाज
, पाठोपाठ"एक
दो तीन ...." गिणती चा होणारा आवाज व लगेचच राउंड मारतांना येणाऱ्या
सर्वांच्या बुटांचे एका तालासुरात होणारे टप टप आवाज ...या क्रमाने हळूहळू आमची
झोप उडत जायची व दिवस
सुरु व्हायाचा. संपूर्ण झोप उडून स्वतःच्या देहासकट आजूबाजूच्या स्थल काल
परिस्थितीचे आकलन होईस्तवर एक तर मोठ्या मुलांची क्रॉस कंट्री स्पर्धा सुरु होऊन
संपयाच्याच बेतात आली असे, वा
क्लस्टर किंवा रिजनल साठी मुलांचे सिलेक्शन सुरु असे. किंवा आम्ही फार फार तर
परतिच्या मार्गाने राहत असो.
नवोदयची हि पाच वर्ष व त्यातही तिथली सकाळ ही स्मरणीयच राहीली आहे.
सकाळी मॉर्निंग पी टि साठी जाग
यावी म्हणून लाउडस्पीकरवर मोठ मोठ्या आवाजात गाणी लावली जात. 'अब तुम्हारे हवाले वतन
साथियो', 'ए मेरे
वतन के लोगो' , ए देश है
वीर जवांनो का' अशा
प्रकारची. त्यामुळे पी.टी. साठी तयार होणे
म्हणजे एक प्रकारे युद्धासाठी तयार होतोय कि काय असला फील यायचा. त्यातही अगदी
सहावीलाच सर्व जन घर सोडून होस्टेल मध्ये आलेले, त्यामुळे घरची सकाळ ज्या निरव शांततेत व्हायची तस
काही इथे नसायचे त्यामुळे सकाळी सकाळी बुटांच्या लेस बांधून ग्राउंड वर पळत
जाण्यात एक मिशन चे
स्वरूप यायचे.
या पी.टी. चे सर्वसाधारण स्वरूप म्हणजे सुरुवातीला 'हाउस' नुसार गिनती, नंतर मोठ्या मैदानावर राउंड
मारणे, मग
वार्मअप साठीचे व्यायाम करणे, नंतर
काही स्पर्धा असतील तर त्यांची तयारी थोडा वेळ व मग नंतर डीस्बर्स. पण यात बऱ्याचदा
पी.टी च्या सरांचा मूड, बाहेरचे
पावसाळी वातावरण किंवा शाळेतील कार्यक्रम यानुसार बदल होत असत. मग सकाळी ग्राउंड
वर जमलो, गिनती
झाली कि 'इनथ्रीज'मध्ये (म्हणजे मुलांच्या
तीन मिळून जोड्या) गाव जागे
व्हायाच्या आधी सकाळी साडेपाच पावणेसहाच्या आसपास आम्ही गावातील एकमेव मुख्य
रस्त्यावर लागायचो
अर्थात पळत. हळूहळू गार वारे अंगाला झोंबू
लागले व पळन्यामुळे अंगाला घाम येवू लागला कि झोप उडून जायची. हे सकाळी बाहेर पडणे
म्हणजे सरळ निसर्गाच्या अंगणात जाणे होते. अजूनही ते गवतावर पडलेले दवबिंदू, झाडे,
जंगली फुले व गवताचा वास जसच्या तस आठवत.
काही अंतर पळत गेलो कि केव्हा केव्हा
पालवे सर क्रॉस कंट्री स्पर्धा घ्यायचे. एकदम सुरुवातीची काही दिवस हा शब्द
समजण्यातच गेला. अर्थात सहावीची मुले लहान म्हणून आम्हाला त्यात भाग घेता येत नसे.
पण थोडे मोठे झाल्यानंतर आम्ही पण सहभागी होऊ लागलो. आमची हि क्रॉसकंट्री स्पर्धा
मजेशीर असे शेतातून, बांधावरून, कच्च्या रस्त्याने अशी वेडीवाकडी बरीच अंतर
गेल्यावर एंड पौईट येत असे. अशा वेळी पांढरे बूट व पांढऱ्या कपड्यांची वाट लागत
असे, पण अर्थात मजा येई. मोठमोठ्या गवतामधून, चिखलाने घसरड्या झालेल्या बांधावरून
पळण्यात भीती सोडा वेगळेच थ्रील यायचे. आजकाल स्वतः ची मुल अस काही वेगळे करू
लागली कि पटकन त्यांना घरात बोलवण्याचा आमचा कल असतो. नको कुठे काही हातापायाला लागेल,
गवतामधून काही निघेल, चिखलात कपडे भरतील, आजारी पडतील एक ना दोन हजार शंका. आमच्या
सर्वांच्या आई वडिलांनी मनात कुठलीही शंका मनात न ठेवता आम्हाला नवोदयच्या हवाली
केले तस आजही आम्ही आमच्या मुलांसाठी करू कि नाही यात शंका आहे.
पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पाउस पडत
असला कि आम्ही राहत असलेल्या एम.पी हॉल मध्ये किंवा गोडाऊनमध्ये सर योगासन करायला
म्हणून सर्वांना बोलवत. अर्थात सर्व कॉट टाकलेली जागा सोडली तर मध्ये असलेली
रिकामी जागा कमी होती त्यात काही जन बसत व बाकीच्यांना कॉटवर बसून योगासन करण्याची
मुभा असे. सर अधून मधून आतील भागात फिरत असत पण पाउस जास्त सुरु झाला व सरांचे
लक्ष नसले कि आहे तिथेच सरळ झोपून जाण्यात मजा असे. योगासनात सर्वांचे सर्वात आवडत
आसन म्हणजे शवासन. एकदा कॉटवर पडल कि केव्हा झोप लागयाची कळायचं नाही. पण मुळात
असा दिवस उगवला कि बाहेर उठून न जाण्याचा आनंद मोठा आसायचा. कारण सकाळी उठण्याचा
खूप कंटाळा यायचा. नको नको वाटायचं. कधी एकदा नवोदय मधून बाहेर पडतो व सकाळी खूप
वेळ आरामात गोधडी पांघरून पडून राहायला मिळेल
असं वाटायचं. आमच्याच आजूबाजूच्या शाळेतील मुलांना असं सकाळी लवकर उठण्याची
सक्ती नव्हती त्यामुळे ते आरामात उठून मग
शाळेत यायचे. त्यामुळे ती मुले खूप नशीबवान वाटायची.
अर्थात त्या वयात ते साहजिकच होते पण
नंतर कळत गेल कि खरे नशीबवान तर आम्ही होतो ज्यांना खूप चांगली सवय लावली जात होती
अर्थात तेव्हा ती मनाविरुद्ध का असेना पण अंतिमतः आमच्या फायद्याची सवय होती. तिथे
शिकवलेले सर्व व्यायामाचे व जॉगिंग चे प्रकार नंतरच्या आयुष्यात खूप कामी आले.
वार्म अप करतांना कसा करावा त्याचा एक क्रम असतो, शरीराचा रक्तपुरवठा व्यवस्थित
होण्यासाठी एक तर खालून वर किंवा वरून खाली अशा पद्धतीने व्यायामाची सुरुवात
करायची असते हे कळले. शास्रीय पद्धतीने सूर्यनमस्कार कसा करावा हे प्रथम तिथल्या
शिक्षकांनी शिकवले.
थोडा पाउस कमी असला कि आम्हाला
शाळेच्या व्हरांड्यात बसवत व वेगवेळ्या पार्थना गाणी आमच्याकडून म्हणून घेत असत.
सकाळची ती शांत वेळ, अंधार कमी होत पूर्वेकडे दिशा उजाळत चाललेल्या व एकाच सुरात
आम्ही ‘अधरम मधुरम वदनम मधुरं’ अस मधुराष्टकम म्हणतोय, गीतेचे श्लोक म्हणतोय किंवा
अजून काही प्रार्थना म्हणतोय हे फारच सुंदर चित्र असायचं. काहीतरी वेगळी उर्जा
अंगात यायची आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिवसाची सुरुवात करतोय व त्या मुळे
संपूर्ण दिवस प्रसन्न चित्त जायचा.
सकाळची पी.टी. व संध्याकाळचे गेम्स
यात फरक राहायचा. सकाळची पी.टी हि व्यायाम, वार्म अप, रनिंग वर भर देणारी आसायची.
तर गेम्स मध्ये संध्याकाळी खेळायला मिळायचे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बास्केट बॉल
यासोबतच खो-खो, कबड्डी असे आपले देशी खेळ पण भरपूर खेळायला मिळायचे.
आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा खच्चून भरलेल्या असत, विविध प्रकारात व सातत्याने त्या होत असत. शाळेत मुलांचे हाउस
पाडलेले असत, त्याचे साधारण स्वरूप असे कि जवळपास प्रत्येक वर्गातील सात आठ ते दहा
मुले एका हाउस मध्ये येतील. मुलांना कोणता हाउस भेटेल ते निश्चित नसे अन त्याचे
वाटप सहावीला अडमिशन घ्यायच्या वेळेसच व्हयाचे. आपला हाउस व आपला रोल नंबर सहावीला
एकदा मिळाला कि तो कायमसाठी राहत असे. आज अगदी वीस बावीस वर्ष झालेत तरी आम्हाला
सर्वांना आमचे रोल नंबर व हाउस लक्षात आहेत म्हणजे फक्त आमचेच नाहीत सर्व bachchya
मुलांचे लक्षात आहेत. तर असे हे हाउस विविध नावांनी असत. हिमालय,सातपुडा,
सह्याद्री, विन्ध्य, अरवली अशी मुलांच्या हाउस ची नावे होती. मुलींची निलगिरी
कांचनगंगा अशी नावे असली तरी ज्या विविध स्पर्धा होत त्या साठी त्या आमच्या हाउस
लाच aatach राहत.
तर अशा या विविध हाउस मध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असत त्यात
बरीच चढाओढ राहत असे. प्रत्येक हाउसच्या मुलांना वाटायचे कि आपले हाउस एक नंबर आले
पाहिजे. वर्षाच्या शेवटी सर्व क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे मिळून मार्क्स
लक्षात घेवून हाउसेस ला विनर घोषित करण्यात येत असे. पण यात स्पोर्ट स्पर्धांकडे मार्क्स चे पारडे झुकलेले
असायचे. म्हणून मग ग्राउंड वर जास्त मार्क्स असणारा हाउस ट्रॉफी घेवून जाणार हे
निश्चित असे.
नवोदय विद्यालय हे ग्रामीण talentला वाव देणारे नाव. या ठिकाणी
ग्रामीण पण हुशार व मजबूत काटक विद्यार्थी येत. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येला
काही तोटा नसे. त्यातही आमचे अक्कलकुवा नवोदय म्हणजे सातपुड्याच्या अगदी कुशीत अक्कलकुवा
येथे. त्यामुळे सातपुड्यातील आमचे आदिवासी बंधू बऱ्याच संख्येने येथे राहत.
त्यातील काही जन अव्वल नंबरचे खेळाडू होते. खो-खो व कबड्डीतील त्यांच्या अंगाचे
चापल्य, वेगवान हालचाली अतिशय देखण्या व विजय मिळवून देणाऱ्या असत. भाला फेक, थाळी फेक, फुटबॉल व विशेषतः रनिंग मध्ये हि पोर
एक नंबर असत. त्यांचा stamina व कौशल्य जबरदस्त असे. आजही त्यातील काही जन अक्षरश
त्यांच्या खेळासह डोळ्यापुढे उभे राहतात. एक जन जो आम्हाला सिनिअर होता, त्याचा
खो-खो मधील खेळ पाहणे म्हणजे एक सुंदर अनुभव असे. पाठलाग करणाऱ्या स्पर्धकांना
चुक्वतांना तो एक प्रकारे नृत्यच करत असे.
त्याच्या हालचाली फार चपळ असत कधी कधी वेळ संपून जायची पण तो बाद होत नसे. त्याचे ते मैदानभर वावरणे
डोळ्याचे पारणे फिटणारे असे. जालमसिंग पावरा नावाचा आमचा एक सोबती होता तो जेव्हा
भाला घेवून मैदानात उतरायचा तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स बघण्यासारखा असायचा. दमदार
पावलांनी पायात योग्य ते अंतर घेवून समोरून धावत येणाऱ्या जालमसिंग ला पाहतांना हा
जणू शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक तडफदार मावळा स्वराज्यासाठी शत्रूवर तुटून
पडतोय कि काय असला त्याचा आवेश असायचा व त्याच वेळी त्याने फेकलेला भाला समोर
चुन्याने मारलेल्या सीमारेषेच्या पलीकडे जावून जमिनीवर सरळ उभा रोवलेला असायचा.
तसाच तो गोळाफेकेतही तरबेज होता. अनेक जन रनिंग मध्ये चाम्पियान होते, १०० मीटर
असो ८०० मीटर असो वा रिले असो वा क्रॉस कंट्री असो हि मुले कायम एक नंबर अगदी
रेकॉर्ड वेळेत पूर्ण करत. त्यांची क्षमता हि आम्हा नोकरदार घरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील
मुलांच्या तुलनेत खूप जास्त होती.
तेव्हाही, त्यानंतरही व आताही मला वाटत कि भारताला ऑलम्पिक सारख्या
खेळात सुवर्णपदक हवे असेल तर असे आदिवासी talent लहानपणीच हेरून त्यांना त्या
angle ने प्रशिक्षण दिले गेले तर nationalच काय अनेक अंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक
रेकॉर्ड तोडण्याचे सामर्थ्य या युवकांमध्ये आहे. पण दुर्दैवाने अजूनही तस होतांना
दिसत नाही. नवोदयला असतांना आमच्या क्लस्टर, रिजनल व अगदी national पर्यंत हे
खेळाडू चमकायचे पण पुढे काय? सर्व अंधार. आधीच सातपुड्याच्या आदिवासी पाड्यातील
कुठल्यातरी पाड्यातील किंवा वस्तीतील घर, घरी आठराविश्व दारिद्र्य व शिक्षण म्हणजे नोकरी मिळेलच समजून कसतरी शिक्षण
झाल कि कुठतरी नोकरीवर चीटकायाचे इतकी माफक अपेक्षा व दुर्दैवाने तस नाहीच झाले तर
काही तरी पोट भरण्यासाठी करणे इतकच. या सर्व प्रकारात अनेक दर्जेदार खेळाडूनी आपला
खेळ सोडून दिला. मग मैदानावर राजासारख्या वावरणाऱ्या अशा दर्जेदार खेळाडूंना
कुठेतरी वर्ग तीन चार च्या कारकुनी प्रकारची कामे करतांना पाहिले कि त्रास होतो. जर
काही वेगळ घडल असत तर आज अनेक रेकॉर्ड नावावर असलेले ते स्टार खेळाडू राहिले असते.
मी स्वतः मात्र नवोदयला असतांना खेळात खूप मागे असायचो. जेव्हा क्रीडांगनावर
जाण्याचा प्रसंग यायचा तेव्हा तेव्हा मी व् माझे एक दोन मित्र आम्ही मागे राहून टाईमपास कसा करता येईल
ते बघायचो. आमचे काही batchmets अजूनही आम्हाला बांधावरचे म्हणून चिडवतात. कारण
आमच्या शाळेचे जे मैदान होते ते पूर्वी शेती होती मध्ये सर्व आखून रेखून मैदान
झाले असले तरी त्या शेतीचे जुने बांध तसेच होते. त्यामुळे खेळ सुरु झाले कि नजर
चुकवून त्या बांधावर जावून आम्ही बसायचो किंवा त्यावरून पिरीयड संपेपर्यंत फिरत
तरी बसायचो.
विविध क्रीडा स्पर्धांसाठीची निवड सुरु झाली कि मनात धडकी भरायची.
इतके सगळे रथी महारथी बघितले कि आपण कशात काय म्हणून अजूनच कमीपना वाटायचा पण
त्यातल्या त्यात मी अभ्यासात चांगला असल्या कारणाने (म्हणजे किमान मला तरी तस
वाटायचं) किमान न्यूनगंडापासून स्वतःला
वाचवू शकत होतो.
या ठिकाणी सर्वात महत्वाच म्हणजे मला खेळांविषयी अनेक बाबी समजल्या.
खेळातील बऱ्याच बाबतीत मुलांना पण समाविष्ट करून घेतल्यामुळे त्यांचे या बाबतीचे
ज्ञान चांगले होते. खेळांचे ग्राउंड कसे आखायचे. खो-खो, कबड्डी, फुटबॉल पासून तर
पार रनिंग track आखण्यापर्यंत विद्यार्थी सोबत असल्याने त्यांना मैदानाची माहिती
असायची. वरच्या स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड झाली कि त्यांना थोडे विशेष प्रशिक्षण
देण्यात येई. आमची रेग्युलर पी.टी सुरु होण्या आधी व नंतर पण त्यांचा सराव सुरु
असायचा. दुध सोबत अंडी दिले जायचे. किमान ते मिळण्यासाठी तरी आपल्याला काही खेळता
यायला हव होते अस वाटायचं. त्यांना रनिंग साठी विशेष ते खिळ्यांचे बूट मिळायचे.
संध्याकाळी पण बराच वेळ त्यांचा सराव सुरु असायचा. स्पर्धा सुरु झाल्या कि माहोल
अजून रंगतदार व्हायचा. जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षिसे व कप मिळायचे ते बघायला खूप
छान वाटायचे. एकूणच खेळ सर्वांच्या अंगात भिनायचा. अर्थात याचे श्रेय त्या काळात
असलेले आमचे क्रीडा शिक्षक पालवे सर, मुदलियार madam, राव सर व अर्थातच त्यांच्या
कडून हे सर्व काम करवून घेणारे आमचे प्राचार्य वाळिंबे सरांना जाते. जागतिक
स्तरावर घेतल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धांचा कार्यक्रम टी. व्ही वर सरांनी आम्हाला दाखवला. त्या विषयीची भरपूर माहिती दिली, त्यामुळे इतक्या लहान वयात
अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांबाबत काय सुरुय हे कळायचे. त्याचा आवाका कळायचा. आमचे
सर खेळणाऱ्या मुलांसोबत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील रेकॉर्ड बाबत चर्चा
करायचे हे एक प्रकारचे त्यांना त्यांच्या क्षेत्रात मिळणारे वैश्विक भानच होते.
असा पाया जोपासला गेल्यामुळे आयुष्यभर सजग राहण्याइतपत भान मिळाले.
असेच शिक्षक व अशाच शाळा मुलांना मिळाल्या तर आजच्या काळात खेळातील एखाद्या
प्रकारात अव्वल दर्जाचे खेळाडू निर्माण होणे अशक्य नाही.
समाधान महाजन
