हमारी मुठ्ठी में आकाश सारा

हमारी मुठ्ठी मे आकाश सारा......




हमारी मुठ्ठी में आकाश सारा......

पप्पा मला उद्या शाळेला सुट्टी दिलीय.....

का रे ?

काय माहित , दंगल बिंगल झाली असेल किंवा काही मोर्चा का काय ते असतं तसं काही असेल ....

मी अवाक् होवून त्याच्याकडे पाहत म्हटलं, नाही रे, काही वेगळं कारण असू शकतं, शाळेत विचारून तुला सांगतो ....

पण त्याचं उत्तर ऐकून क्षणभर काय बोलावं तेच कळेना मला.....

आजकालची लहान मुले हुशार आहेत अस आपण म्हणतो पण त्यांना गेल्या काही वर्षापासून एक समाज म्हणून आपण काय देतोय .....शाळा बऱ्याचदा सुरक्षेच्या कारणांवरून बंद असतात ...तेव्हा त्यांना साहजिकच प्रश्न पडतो की कोणताही सण जवळ नसतांना , शाळेत कुठलाही कार्यक्रम नसतांना वा काहीही कारण जे त्यांना नेहमी माहिती असतं ते कारण नसतांना सारखी शाळेला सुट्टी का दिली जातेय .....

मग आपण बघत असतांना ते टीव्हीच्या बातम्या पाहतात...मोडकातोडका पेपर वाचतात ...त्यांच्यातील अर्धवट माहिती असलेला मुलगा त्यांना अजून काही कारणं सांगतो ...मग घरी मुले आपल्याला प्रश्न विचारतात. वरवर ते सोपे वाटतात ..पण नीट लक्ष दिल्यास कळतं की या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या  भविष्यातील वैचारिक पाया बांधत असतात...मग दंगल म्हणजे काय? ती कोण करतं? ती माणसं अस का करतात? मग ते गाडी का जाळतात? दगड का फेकतात? त्यांना लागत नाही का?  मोर्चा म्हणजे काय ? जात म्हणजे नक्की काय ???  आपली जात कोणती? .........हे प्रश्न संपत नाहीत ....किंबहुना यांची उत्तरे देत गेलं की माणसाचा कधी अभिमन्यू होवून जातो कळत नाही ...हा प्रकार घरोघरी सुरु असतो. कधी पालक गप्प बसतात तर कधी मुलांना गप्प बसवलं जात.

एकूणच शाळेतील शिकवला जाणारा अभ्यासक्रम व आजकाल आजूबाजूला घडत जाणाऱ्या दाहक घडामोडी  याचा एखाद्या संवेदनशील शाळकरी मुलाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहिलं तर हा गुंता अधिकच जाणवतो ....

कधी नव्हे इतके आपण जातीयवादी व धार्मिक झालो आहोत. ....

कालच्या आंदोलनात चक्क एक शाळेची बस पेटवून दिली. जी मुले रोज त्या बसने प्रवास करत असतील त्यांना काय वाटत असेल बस समोर जळतांना पाहून ...कोणी दगड फेकले? कोणी आग लावली?  आमचीच बस का? आम्ही काय केलं ज्यामुळे आमची बस जाळली? हे सर्व प्रश्न व त्याची जी माहिती होतील ती उत्तरे  या मुलांच्या भावविश्वात कायमची कोरली जातील .....आंदोलन कालचेच नाही याही आधी जेव्हा जेव्हा हिसंक आंदोलनं दगडफेक जाळपोळ यांचा अनुभव लहान वयातच ज्या मुलांनी घेतला असेल त्यांच्या मनात एकूणच भारतीय समाज व आपला भारत देश याच्याबद्दल नक्कीच काही बाबी रुतून बसतील ज्या पुस्तकी शिक्षणातून केव्हाच भरून येणार नाहीत.

मला अशा वेळी माझी नवोदयची शाळा आठवते ....दहावीपर्यंत व त्यानंतर हि बरेच दिवस आम्हाला जात काय असते माहित नव्हते. आम्ही कधी कुठला फॉर्म भरला नाही ज्यात जातीचा उल्लेख असेल वा आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधी जातीबद्दल विचारले नाही वा शाळेच्या एकूणच आवारात व दैनंदिन जीवनात कधी जात हा शब्द आमच्या कानावर आला नाही न बोलण्यात आला. आम्ही एक कुटुंब होतो.. सर्व सारखे होतो.फरक असेल तर तो फक्त काही अंगभूत गुणांमध्ये बाकी सर्व सवलती सर्वांना सारख्याच ........हे स्पिरीट दिसत नाही अलीकडे कुठेच. आम्ही जुने मित्र भेटतो गेट टुगेदरच्या निमिताने तेव्हाही आमच्या कोणाच्या मनात जात येत नाही न धर्म.

पण अलीकडे भीती वाटायला लागलीय कि येणारी पुढची पिढी त्या त्या जातीची खंदी समर्थक म्हणून तर वाढत नाहीय ना ...हे धोकादायक आहे. महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते ते मुख्यतः येथील विचारधारेमुळे ...यु.पी.एस.सी. च्या मुलाखातीच्या काही दिवस आधी दिल्लीत असताना एके ठिकाणी मॉक इंटरव्हीयू  देत असतांना एका सदस्याने विचारले होते की, उत्तर प्रदेश मध्ये जितकी जिल्हे नवीन झालीत किंवा काही जुनी आहेत त्यांना व काही सामाजिक स्थळांना महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर अशी नावे का देण्यात आलीत....मग मायावती बसपा दलित कनेक्शन सांगून पाहिलं पण त्याचं समाधान झालं नाही ...त्यांचा पुढचा प्रश्न होता मग त्यांनी उत्तर भारतातील समाज सुधारकांची नावे का नाही ठेवली? प्रश्न रास्त होता ...तसं नामकरण त्या काळात घडतही होतं पण हे असच का हा विचार माझ्यासाठी नवा होता. मुलाखत नंतरच्या चर्चेत जे समजलं ते थोडक्यात अस होत की, ही जी समाजसुधारकांची व पुरोगामी विचारांची परंपरा महाराष्ट्राला आहे तितकी उत्तर भारतात नाही ...तितकं सातत्य व प्रयत्न पण इतिहासात झाले नाहीत.....दिल्लीला जावून महाराष्ट्राबद्दल हे मी नवीनच शिकत होतो जे खूपच अभिमानास्पद होत. ते मी नंतर माझ्या अनेक मित्रांजवळ व काही कार्यक्रमात बोलून दाखवले....

पण आता प्रश्न पडतोय या महापुरुषांनी केलेले काम पुढे नेण्याऐवजी आपण मागे का नेत आहोत? ...विचाराला व कृतीला उत्तर दगड व जाळपोळ नसतेच .....पुस्तक वा पुस्तकातील विषय व मुद्दे पटले नाही तर ते पुराव्यानिशी खोडून काढण्यासाठी नवीन पुस्तक लिहून त्याची जोरदार प्रसिद्धी करा...त्यासाठी वादग्रस्त पुस्तक जाळणे वा त्याच्यावर बंदी आणणे वा लेखकाला मारहाण करणे, त्याचा खून करणे हा काही पुरोगामी मार्ग नाही....हीच बाब एखादी विचार,व्यक्ती, संघटना वा चित्रपट यासाठी लागू आहे जे पटलं नाही आवडलं नाही त्यावर स्वतःचं मत मांडा....संघटन निर्माण करा....विचारधारा निर्माण करा. जे पटत नाही त्याला सकारत्मक मांडणी करून लोकांपुढे येवू द्या .....त्याचा प्रचार झाला पाहिजे ...

आताच्या प्रत्येक घरात असणाऱ्या लहान मुलांसाठी आपण कोणत भविष्य निर्माण करत आहोत ...दंगल,जाळपोळ,दगडफेक  की विचार, स्वातंत्र्य व ज्ञानाचं ...खूप गंभीर प्रश्न आहे.

                                                                                                     - समाधान महाजन                                                    -

No comments:

Post a Comment