आज पद्मावत पाहिला ....अन का इतकं वातावरण पेटलं होत काही कळाल नाही ......मुळात राजस्थानी घुमर नृत्य व एकूणच राजपुताना तील राजवंशाच्या वातावरणाचे भव्यदिव्य चित्रण, जोहार व युद्धातील वीरांचा पराक्रम अस सर्व एकूणच खूप छान आहे.....बऱ्याच वृत्तपत्रीय समीक्षणातून पण चित्रपटाच्या शेवट दाखवण्यात आलेल्या जोहारच्या प्रसंगाने चित्रपट उंचीवर पोहोचतो अस म्हटल आहे..... पद्मावती च्या एकूणच चरित्र व आख्यायिकेला कुठे बाधा पोहचेल अस वाटल नाही...
मुळात यात दाखवण्यात आलेल्या सर्वच घटना जशाच्या तशा शंभर टक्के घडल्या असण्याची शक्यता कमी आहे .....एक प्रवाद असाही वाचण्यात आलाय कि या घटना घडल्या नंतरच्या काही वर्षांनी मलिक मोहोम्मद जायसी ने जे पद्मावत नावाचे दीर्घकाव्य लिहिले त्यातून या कहाणीचा जन्म झाला अस म्हणतात....चितोड व खिलजी ची लढाई झाली होतीच पण त्यातील पद्मावतीशी सबंधित या सर्व कहाण्या जायशी व इतर समकालीन दरबारी लेखकांच्या लिखाणातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असो ...इतिहास ... लहान मोठे क्षण आपल्या सोबत घेवून जातो जे काळाच्या उदरात सामावून जातात......कुठल्याही पुराव्याविना....
मुळात संजय लीला भन्साळी चे चित्रपट पाहतांना अस सारख वाटत राहत कि इतिहासातील तो फक्त एक घटना घेतो त्याचा अभ्यास करतो त्यातील पात्र व घटनांचा क्रम तोच ठेवतो पण ते कस दाखवायचं त्याच पूर्ण स्वातंत्र्य तो घेतो ...त्यामुळे त्याचे चित्रपट पाहतांना जरी घटना व तपशील माहिती असले तरी सतत त्या सर्व परीघावर संजय लीला भन्साळी चा ठसा उमटलेला दिसतो त्याच स्वतःच अस्तित्व जाणवत राहत....ही सर्व प्रक्रिया आपल्या मनःपटलावर घडत असते .....
मग तो चित्रपट बाजीराव-मस्तानी असो वा पद्मावत असो...
त्याच्या चित्रपटाची काही वैशिष्ट्य मला जाणवतात जी कमी अधिक पणे त्याच्या बहुतांश चित्रपटातून दिसून येतात.....सर्वात प्रथम म्हणजे पहिल्या फ्रेम पासून वेगळेपण दिसते ते कलर मध्ये. एक विशिष्ट रंगात वा काही विशिष्ट रंग संपूर्ण चित्रपटभर पसरलेले असतात.....देवदास ...हम दिल दे चुके सनम, रामलीला, पद्मावत वा बाजीराव .....रंग त्यातही लाल रंगाच्या विविध छटा एकाच वेळी पडद्यावर दिसतात....हा शेड त्या पात्रांचे वेगळेपण तर दर्शवतो पण पाहणाऱ्याला पण तो त्या मोड व मूड मध्ये घेवून जातो जी एक वेगळीच अनुभूती असते.... त्यातही क्लायमेक्स च्या टप्प्यावर चित्रपटातील रंग अधिकच गडद होत जातात...(आठवा देवदास मधील ..रामलीला मधील ...बाजीराव मधील व आता पद्मावत मधील क्लायमेक्स चे क्षण).
भन्साळी च्या चित्रपटाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यात त्याच्या संपूर्ण कथावस्तुमध्ये पाया असतो दुःखाचा....बेदम, प्रचंड वा आत्यंतिक दुःख कथेचा आत्मा असते व त्या बिजाभोवती संपूर्ण चित्रपटाचे कथानक उभे असते ......खामोशी हा त्याचा सुरुवातीचा चित्रपट.....देवदास वा ब्लक .....यात तर दुःख आत्मा आहे....हम दिल दे चुके सनम मध्ये तर इतर कुठल्याही गाण्यापेक्षा तडप तडप के इस दिल से .....हे गाण विशेषतः तरुणांनी डोक्यावर घेण्याच कारण त्या गाण्यातील सर्वच प्रकारचे परफेक्शन .....बाजीराव मधील बाजीराव च्या मृत्यूच्या क्षणांना आठवा वा देवदास मधील देवचे शेवटचे क्षण आठवा वा पद्मावत मधील अल्लाउद्दिन व पद्मावतीचे शेवटचे क्षण पहा ....दुःख ठासून भरलंय.
तिसरे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी च्या चित्रपटातील मुख्य पात्र कुठल्याशा उद्देशाने झपाटलेली असतात....व त्या उद्दिष्टपूर्ती साठी ते त्यांचे आयुष्य पणाला लावताना दिसतात.....खामोशी..black...रामलीला ...हम दिल दे चुके ....देवदास...आठवा इतकेच नव्हे तर बाजीराव वा पद्मावत या ऐतिहासिक चित्रपटात स्टोरी आधी जरी माहिती असली तरी तीच पात्र नायक वा नायिका म्हणून त्याने चित्रपटासाठी निवडली जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झपाटलेली होती.
इतिहासात अशी अनेक चरित्र लपलेली असतील जी भन्साळीतील दिग्दर्शकाला खुणावत असतील.....पण पद्मावत चा अनुभव पाहता भन्साळी अजूनहि एखादे ऐतिहासिक चरित्र आपल्या पुढच्या चित्रपटासाठी निवडतो कि काय हे पाहणे कुतुहलाचे व उत्सुकतेचे ठरणार आहे.
-समाधान महाजन
