भाग एक

नवोदयचे दिवस
------------------
नाईनटीज मेलडी म्हणून आजकाल ऐकले जाणारे गाणे आम्हाला सदा सर्वकाळ कुठूनही ऐकू यायचे काळी-पिली, हॉटेली, पान टपरी, लग्नकार्य, सर्कस कोणत्याही माध्यमातून ते आम्हाला पोहचायचे त्यात धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना...., प्यार के कागज पे दिल कि कलम से .....,धीरे धीरे प्यार को बढाना है ... अथवा तू चीज बडी है मस्त.... वा बाजीगर ओ बाजीगर...... वा चुरा के दिल मेरा गोरिया चली.......
यांच्यापैकी कोणतेही वा यासारखे कोणतेही गाणे आम्हाला बसल्या जागेवरून आकर्षून घेत असत, त्या गाण्याच्या आवाजाकडे अक्षरशः कानात प्राण आणून ऐकायचो, तसे ते दिवस वेगळेच होते प्रत्येक दिवस वेगळाच येऊन उगवायचा क्षण क्षण कणभर मोठं झाल्याचा भास व्हायचा,आज या गावावर उगवलेले आभाळ दुसरीकडे नसणारच असा दांडगा आत्मविश्वास घेऊन वावरायचो तरी हि असली गाणी म्हणजे आमचा कॉमन विकपॉईंट
नवोदयच्या त्या मोकळ्या मैदानात सकाळचा वर्ग बाहेरील गवतावर भरला कि अभ्यास होवो कि नको पण एक नक्की व्हायचं कि असल कुठलतरी गाणं हमखास कानी पडायचं अन मन खुश होऊन जायचं,आमचे टीचर लोक कोणास ठाऊक सातवी आठवी नववी म्हणजे लहान समजत असत.
पण आपल्या शाळेच्या तमाम मुलींना मग ती ज्यु. असो कि सिनियर तिला दीदीच म्हणायचे या जगावेगळ्या प्रिंसिपली फतव्याने आम्हाला कोण वेदना व दुःख होत असतील ते आमचे आम्हीच जाणोत.
तर या अतीव फिल्म प्रेमापायी शाळेचं व होस्टेलच कम्पऊंड ओलंडण्याची परवानगी नसतांनाही भिंतीवर उड्या मारून गावातील पलीकडील विडिओ पार्लर वर जाऊन चित्रपट पाहण्याच्या भयानक गुन्हयामुळे फस्ट बॅच च्या चार पाच सिनिअर भैया लोकांना भरे असेम्बली बेइज्जत होऊन पुन्हा देशमुख व अहमद गुरुजींच्या काठीचे फटके खाऊन मग शाळा सोडावी लागल्याचं दृश्य पहिल्याच वर्षी पाहिल्याने आपण कधी स्वतः जाऊन बाजारातील विडिओ पार्लर वर चित्रपट पाहत असल्याचं स्वप्नातही कधी आलं नाही.
पण मग गावातील सालाबादप्रमाणे भरणारी यात्रा आली कि तिथे येणारे ओपन थेटर व त्यातून संध्याकाळ पासून येणारा गाण्यांचा आवाज फुल बिजी शेड्युल मधून हि मनात येऊन तरंग उमटवून जायचा, मग गुरुजी लोकांच्या शिस्तीत जत्रेतील सर्कस पाहायला इन टू वा इन थ्री या अस्सल नवोदयीन कडक लाईनीत जातांना आपसूकच नजर सिनेमाच्या पोस्टर वर जाई व मग पोटात एकदम कायच्या काय होऊन जाई.
तेव्हा एकदम कळलं तेव्हा अक्षय कुमार,सुनील शेट्टी,सैफ अली खान,हि मंडळी जोरात होती सलमान ला मैंने प्यार किया नंतर थेट साजन मध्येच पाहिला होता,
एकदा मी व माझा मित्र गावात एका दुकानावर पेन घ्यायला गेलो होतो,बाजूलाच कॅसेट चे दुकान होते तेव्हा कॅसेट चे दुकान म्हणजे जणू मुंबईच्या फिल्म इंडस्ट्री ने गावोगावी त्यांची उघडलेली आउटलेट च जणू इतका त्यांना मान होता.त्यामुळे टिप्स व्हीनस सारख्या कॅसेट च्या मोठमोठ्या कव्हर वरील पोस्टर दुकानाच्या बाहेरील बाजूस हमखास येणाऱ्या जाणाऱ्याला दिसावीत अशी ठेवली जात.तर असेच एक मोठ्या पोस्टरवरील फिल्म च नाव आम्ही बराच वेळ वाचायचा प्रयत्न करत होतो पण ते जमत नव्हत.DARR या नावाचे आम्ही अनेक उच्चार करून पहिले दार,ड्ररर, दरर, पण ते बोलून आमचे आम्हीच हसत होतो,इतक्यात आमचं लक्ष एकदम बजाज गुरुजींवर गेले बजाज आडनावाचे हे नवीनच आलेले गुरुजी एकदमच उत्साही होते,त्यांना आम्ही हिम्मत करून विचारूनच टाकले कि हे नाव काय आहे, त्यांनी नुस्ते नावच वाचून सांगितलं नाही तर त्यात शाहरुख खान नावाचा हिरो आहे व तो सिनेमा अमक्या तमक्या तारखेला रिलीज होत आहे इतकी सविस्तर माहिती पुरवल्यामुळे आम्ही जाम खुश झालो त्या गुरुजींचे एखादी सायन्स चे चाप्टर संपूर्ण समजून जितका आनंद झाला नसता तितका आनंद डर नामक सिनेमाच्या बहुमोल माहितीमुळे आम्हाला झाला, अर्थात यानंतर हळू हळू आम्ही शाहरुखच्या जवळ व बजाज गुरुजींपासून दूर जायला लागलो अर्थात त्यालाही कारण होतच.

समाधान महाजन 

No comments:

Post a Comment