असच एक गाव

# असच एक गाव#
शेजार-शेजारच्या बाया सिमेंटच्या पक्क्या रस्त्यावर खरडून खरडून झाडत धूळ उडवत आहेत व नजर चुकवून कचरा एकमेकांच्या अंगणात कसा लावता येईल याची संधी शोधत आहेत. रस्त्यावरून उताराने वाहणारे सांडपाणी आपल्या ऐवजी बाजुच्याच्या अंगणातून जावं यासाठी सिमेंटच्या रस्त्यावर चक्क मातीचा बांध घालून पाणी वळवण्यात आलं आहे.तो मातीचा बांध कोणी फोडू नये यासाठी त्याची दोन टकोरबाज पोरं दिवसभर कामधंदा नसल्याने येता जाता त्यावर लक्ष ठेऊन आहेत, त्यामुळे शेजारचा नेभळट गडी एकवेळ मेलो तरी चालेल पण त्या बांधा कड पाहणार अशी भीती बाळगत दिवस काढतोय.
वर्षानुवर्षे येणाऱ्या जाणाऱ्या कडे पार कपड्याच्या आतून एक्स रे नजरेने बघणाऱ्या म्हताऱ्या कोताऱ्यांच्या हाती मोबाईल च डबड आलंय सोबत पोरांना बसवून त्यांच्याकडून काही बाही समजून घेत ते आता मोबाईल मोबाईल खेळत आहेत.
तिकडूनच डबे घेऊन जाणाऱ्यांची संख्या अनेक पुचाट योजनांतरही हागणखडी कमी न होता वाढतच आहे. माथ्यावरून वेशीपर्यंत घाणच घाण झालेल्या रस्त्यावरून कसलीही लाज न वाटता फक्त तात्पुरतं तोंड वाकड तिकडं करून हे पुढील हजारो वर्षही असेच चालत राहतील इतका जबरदस्त निष्क्रिय पणा त्यांच्यात ठासून भरलाय.
सणाचं दारूने झिंगत पण तितक्याच 'भ'काळ शिव्या देत नरशा नुकतंच गावी परत आलेल्या कुणा नोकरदार पोराकडे क्वार्टर इतके पैसे मिळे पर्यंत त्याला सोडणार नाहीय.
नाथ्या म्हणला स्टॅंडवर चल, लैच गमतीजमती कळत्यात. मग टपरीवरील काही संवाद-
गुरख्याने गाव सोडलं- कारण बेन रातच्याला गावभर चालत असतांना, गावातली पोर त्याची बायको चालवत.
मागच्या गल्लीतील महिला बचत गटाला भेटायला तमाम तालुका जिल्ह्याची सायब लोक येतात व त्यांची ती आयटम हेड आठवड्यातून एकदा तमाम सायबांना भेटून येते. जमिनीच्या वादातून झालेल्या हाफ मर्डर केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी तिच्या नवऱ्यानेच तिला सात दिवस एकट राहणाऱ्या फौजदाराच्या घरी नेऊन ठेवलं होत.
मास्तराच्या पोरान त्याला जाम धुतलं.पोरगं चांगलाय, बापाला सर्वच व्यसनं पुन्हा आईला रोज येऊन मारतो , दुसऱ्या बाईला आणून ठेवलंय अन आता म्हणे वरचा तुकडा विकायचाय. गल्लीतच पोरान बापाला चपलेने धो धो धुतला

असो तर
शंभर एकरावर शेती चार, टोलेजंग माडया,तितक्याच गाड्या- गाडीच्याच बाजूला उभं राहून पाटलीन बाई ,तासभर आधी कापूस वेचण का सोडलं म्हणून काळ्या बेंदर्या परकऱ्या शाळेच्या वयातील पण शाळेत न जाणाऱ्या पोरीची शब्दश साल काढत होती.पोर गयावया करून कारण सांगत होती पण तिच्या जगण्याच्या लढाई पेक्षा बाईचा अर्धा किलो कापूस अत्यंत महत्वाचा होता.
शाम्या डोळे मिचकाऊन सांगत होता - आठवीची ती *** व दोन पोर दुपारभर पडक्या वाड्यात खाली वर काय काय करत होते ते कळलं तस पंढरपूरला गेल्यागत पोरं दिवसातून एकदा तरी तिच्या गल्लीची वारी करून येतात .
गावात शिकलेले व नोकरीवाल कोणी राहत नाही सर्व मुंबई-पुणे मोठ्या शहरात किंवा तालुक्याच्या गावी राहतात त्यांची व गावातली पोर गावातल्या शाळेत शिकत नाहीत.इंग्लिश मेडीएम च्या शाळेत जातात.संध्याकाळी परत चुलीच्या धुराने भरलेल्या घरात आल्यावर इंग्लिश ची वाय झेड करत उदासवण्या पोरांनी खेळण पण सोडून दिलंय.
मध्येच शाळा सोडून टुकार पणे हिंडणाऱ्या पोरांच्या हातात बापाच्या गुंठाभरच्या कृपेने हातात स्मार्टफोन गाडीखाली लाखोंच्या गाड्या, नजर व एक पाय कायम शहरी झगमगाकडे, एकमेकांना भेटल्यावर ते बोलण्यापेक्षा मोबाईल मधील पोर्न क्लिप शेअर करतात.
गावाला अजून पूर्ण पाणी नाही, रस्ते नाही, साधी गावाच्या नावाची पाटी पण नाही.
अंधार दाटून आलेला असतांना एक दोन मिणमिणत्या दिव्यांच्या आधाराने थांबलेल्या यष्टीतील लोक उतरून घराकडे जाणारा रस्ता शोधत असतांना , कुत्री जोरजोरात भुंकतायत. या गडबडीत जोरात ठेच लागलेला कोणी एक सरपंचा पासून पीएम पर्यंत सर्वांच्या पिढीचा उच्चारावत उद्धार करत आहे

आणि मंचावरून तारस्वरात गावाचं, मातीचं कौतुक करणारी कसली जबरदस्त छिनाल कविता कवी गळा काढून म्हणतोय.

समाधान महाजन

नोंदी दोन

# लिटररी नोंदी # दोन

दोन तीन दिवसांचा ताप उतरणीला  लागल्यानंतरची रात्र, सततच्या गोळ्यांनी  आलेला बराचसा  अशक्तपणा, सर्वांगाला घाम येऊन थंड पण येत असतांनाच आतून आद्रमय झाल्याची  जाणीव, मंद दिवे.....बाहेर आतापर्यंत काहीही नसतांना एकदमच बेमोसमी पावसाची सुरुवात झालेली, कदाचित असेल  वातावरण तसे बाहेर सकाळपासून ...पुलकित झालेल्या  मातीचा गंध जाणवतोय , मग जागेवरच बसून बाहेरच्या बाजूचे  दृश्य डोळ्यापुढे तरळत  राहत, ओलगच्च झालेले समोरच मैदान , चिंब होऊन पडलेले कोरड गवत, त्यातून भिजत  जाणारी  पायवाट , तावदांनावरून गळणार पाणी, झाडांमधून टपटपनारे चुकार थेंब ...तिसऱ्या प्रहरातील कुठलातरी प्रहर ...डोळे  सताड उघडे.
मग हळूहळू दिवस उजाडेल,रात्रभर तसा कुठलाही पाऊस पडलाच नाही अस सांगणार वातावरण,हळूहळू वर चढत जाणारा सूर्य,हलकस झालेला देह गोळा करून धडपडत उभं राहून दिवसाला सामोरा जात असलेला मी,

मग हि रात्र व त्यानंतर उगवणारा दिवस कुठलाही असेल ,

एकदम नववीतून -दहावीत गेलेल्याला एक दीड महिना झालेला असतांना ऐन उन्हाळाच्या शेवटच्या दिवसात मातीला डोळ्यासमोर पार अस्तव्यस्त करून चिरडत जाणारा रात्रभरचा निर्दयी पाऊस व सकाळी सकाळी शाळेच्या व्हऱ्यांड्यात चहाच्या लाईनीत मगा घेऊन सर्व कोलाहलात अत्यन्त एकटेपणाने उभा असलेला मी.
किंवा
कॉलेज चा प्रतिनिधी म्हणून कुठल्याशा लांबच्या गावाला डिबेटिंग कॉम्पिटिशनसाठी आलेलो असतांना ज्या मंडपात सकाळी स्पर्धा होणारेय त्या मंडपाची वादळामुळे होणारी वाताहत पाहत खिडकीत जागा असलेला मी.
किंवा
मुलाखतीची आदली रात्र व नंतरची सकाळ ...ठाणे,कल्याण,कुर्ला किंवा दादर यापैक्की कुठलेही एक स्टेशन.मुंबईच्या पावसाळा पूर्वीच्या उकाड्याची सकाळ, कधीही सुरु होईल अस तुडुंब भरलेलं आभाळ. धूर-धुकं-दमट हवा-घाम-चिकचीक-न येणारा पाऊस-कानाजवळ मध्येच घूं करणारं चिलट-गर्दीन गच्च स्टेशन व तितकीच गच्च भरलेली लोकल फलाटावर येतांना, माझ्यासकट हातातील फाइल सांभाळताना मी.
किंवा
अशाच अनेक रात्रींची पहाट

                                                                       # समाधान महाजन #
                                                               लिटररी नोंद # दोन

नोंदी एक

दैनंदिन जीवनातील अत्युच्च कोलाहल, त्रास, संकट आवश्यक, अनावश्यक ,महत्वाची ,अत्यंत बिनमहत्वाची सर्व कार्य व काम विसरायला लावून धातूच्या तप्त प्रवाहासारखा वाहत जाणारा हा मनोरस एकाच खांबावर अक्खा तंबू तोलल्यासारखा कोणतीही बाब (जी एरवी कदाचित म्हणजे कदाचित क्षुल्लक वाटावी) का इतकी डोक्यावर उचलून घेतो?
अशा वेळी चक्क वर्तमान व भूतकाळातील अनेक दिवस छेडणारी भूत चक्क गायब होऊन जातात , अन हे एकच येऊन बसते मानगुटीवर स्वतः चे उत्तर मागत तेव्हा जीवनातील सर्व कार्य जणू शून्यवत होऊन माझ्यासकट सारी सृष्टी अशे एकच उत्तर शोधण्यामागे स्वतः ला वाहून घेते काही काळ.
मग या नव्या त्रासाचे रेकॉर्ड गायब होऊन जाते कालांतराने फाईलींमधून -  मग मंगळावर ओघळ पडलेल्या रेषा या पाण्याच्याच होत्या हे सिद्ध करण्यात शास्रज्ञामध्ये अहमीका लागावी तसे कालांतराने पुन्हा दुसरा प्रश्न पडला कि स्वतः लाच हे व्रण पटवून देण्याचा पुन्हा एकदा मन आटोकाट प्रयत्न करते,पण ते प्रयत्नच असतात.
पुन्हा असा एखाद्या प्रश्नाने तापलेला मनोरस कधी स्वतः चा मनो शारीरिक उत्कलनांक बिंदू वाढवेल याची शाश्वती स्वतः ला हि नसते...

       लिटररी नोंदी # 1

अनुराग कश्यप- एक निमित्त

अनुराग कश्यप – एक निम्मित

अनुराग कश्यपच्या चित्रपटाचे आम्ही चाहते आहोत. मुंबई का किंग कौन—भिक्कू म्हात्रे अस म्हणणारा मनोज वाजपेयी व चित्रपट सुरु झाल्यावरही बराच वेळपर्यंत न बोलणारा व संपूर्ण चित्रपट भर एक प्रचंड अंतर्गत उर्जा, रग व ट्यालेंट बाळगत हिंडणारा gangstar हिरो या सत्यातील अनेक फ्रेम्सच्या मी प्रेमात होतो.अनेकदा पाहिलेली मुंबई रामगोपाल वर्माच्या सुरुवातीच्या चित्रपटातील कॅमेरातून पाहतांना काय अनुभूती येते हे त्यातील जाणकारच जाणू शकेल. मग मुंबईचा पाउस,धोबीघाट,उंच इमारतींवरून घेतलेला लॉंग शॉट, आर.सी.सी. फ्रेमवर्क झालेल्या मनोर्याच्या आसपास होणारे मारधाडसत्र, मुंबई कमिशनर ला मारण्यापर्यंत मजल गेलेलं गॅंगवार
व तरीही टिपिकल मराठी मध्यमवर्गीय स्टाईलमधील घरातील वातावरण बायका ,मुले,शॉपिंग,नाश्ता,जेवण,लग्न त्यातील नाच व ‘गोलीमार भेजे मे’ सारख पटकथेला अनुसरून असलेले गान, ‘सपने मे मिलती है’ चा उडवलेला बार,सत्या व उर्मिलातील भाऊक सिन्स व खास दिग्दर्शकीय टच असलेले दोघांमधील गाणे- ‘बादलो से काट-काट कर-काग्जो पे नाव जोडणा’, ‘तू मेरे पास भी है’, ‘गिला-गिला पानि’.मला आठवत सुरुवातीला दोनदा चित्रपट पाहिला होता तो स्टोरी प्रचंड आवडल्यामुळे व तिसऱ्यांदा परत मित्राला बळजबरीने पाहायला घेऊन गेलो होतो ते खास या गाण्यांमुळे.

तोपर्यंत वाटत होत हा सर्व कियाकराया राम गोपाल वर्माचा, पण ज्यावेळी कळल कि सत्याची स्टोरी अनुराग कश्यप ची त्यावेळी चक्क उडालोच कारण तोपर्यंत गँग्ज ऑफ वासेपूर सारख्या माईलस्टोन हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहत होतो, जो कि उत्तर भारतीय हिंदी बोलीभाषिक पट्ट्यातील आतापर्यंत मेनस्ट्रीम मध्ये न आलेल्या संस्कृती व समाजाचे पद्धतशीरपणे आपल्या पद्धतीने बिनधास्त चित्रीकरण करणारा व mind blowing movie रसिकांना सादर करणारा एक ताकदीचा दिग्दर्शक म्हणून.
वर्ष २००० लागेपर्यंत चोप्रा,बडजात्या,प्रेम(सलूमिया),राहुल(शाहरुख) या तद्दन स्वित्झर्लंडच्या फुलांच्या व बर्फाळ भूमीवर जाऊन रोम्यांटिक गाणे असणाऱ्या गुडी गुडी एन्डच्या चित्रपटांचा काळ संपत आलेला होता व रामगोपाल वर्मा,तीग्मान्सू धुलिया,अनुराग कश्यप,नीरज पांडे, दिवाकर बनर्जी,राजकुमार हिरानी,अनुराग बसू, विशाल भारद्वाज,प्रकाश झा, या अत्यंत नव्या दमाच्या व ताकदीच्या लोकांचा चित्रपट सृष्टीतील वावर वाढला होता. Romantisiam पेक्षा वास्तवतेकडे त्यांचा ओढा होता व त्यातही हे नवीन दिग्दर्शक ज्या ज्या प्रदेशातून आले होते त्या त्या ठिकाणची माती तिला लागलेल्या सर्वांगीण कलात्मकतेसह यांनी उचलून सिनेमाच्या फ्रेममध्ये इतकी तंतोतंत फिट बसवली कि, नेहमीचा प्रेक्षक तर सुरुवातीलाच बांभाऊन गेला कि, ‘what the hell running on the screen….साला क्या कर रहे है ये लोग’.
पण त्याच्या चित्रपटाकडे लोक खेचले गेले,त्याचे चाहते झाले व सुरुवातीच्या नामावलीत फक्त अनुराग कश्यपचे  नाव दिसले तरी सुद्धा त्यांच्या चित्रपटांना लोक गर्दी करू लागले.

काय करतो अनुराग, -- एका स्टोरी वर भरपूर अभ्यास करतो,विविध विषय हाताळतो अनेक शक्यता पडताळून त्याला स्व-अनुभवांची जोड देत मग ती स्टोरी खास स्वतःच्या नजरेतून प्रेक्षकापर्यंत पोहचवतो नाहीतर एरवी अत्यंत साध्याशा लंच बॉक्स(निर्मिती) सारख्या विषयावर एक अख्खा चित्रपट आणणे येराबागळ्याचे काम नाही.अर्थात नव्या कलाकारांच्या गुणांना त्याने आपल्या चित्रपटातून मोठा वाव दिला, नंतर स्वतःचे प्रोडक्शन हाउस काढून सैतान.उडण, अय्या,लंच बॉक्स,क्वीन, हंटर सारखी अफलातून चित्रपट हि त्याने दिली.

कश्यपच्या सिनेमातील गाणी हि अनोखी मेजवानी असते. एप्रिल २००९ च्या आसपास दिल्लीतील सदनातील मुक्काम्प्रसंगी एक नवी कोरी गुलाल ची डी.व्ही.डी मित्राने आणली होती.यु.पी.एस.सी.च्या मुलाखती संपल्यानंतरच्या त्या blank झालेल्या काळात बुद्धीला एक चांगले खाद्य गुलाल मुळे मिळाले होते.
‘गुलाल’ म्हणजे राजपुतानाच्या राजघराण्यातील आधुनिक काळातील संघर्ष ज्याची पाळेमुळे प्राचीन काळापासून रोवली गेली होती.कॉलेज च्या जी.एस.च्या निवडणुका १९४८ च्या जखमांना ताजे करतात व के.के.परत आझादी ची भाषा बोलतांना दिसतो.याही चित्रपटात वेगवेगळ्या रंगाचा वापर करून स्थानिक बोलीभाषा,वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती,सेक्स,स्री व अनेक पातळ्यानवर स्पर्श करून जाणाऱ्या या चित्रपटाच्या स्क्रिप्ट सोबतच अत्यंत नवीन लहेजा व बोलातील गाणी ऐकायला मिळाली.
आमचा एक मित्र तर ते गाणे ऐकून तेव्हा म्हटला होता  कि,
“आयला, यु.पी.एस.सी.च्या मुलाखतीत अंतरराष्ट्रीय संबधांच्या अभ्यासासाठी काय सॉलिड कंटेंट टाकलंय राव गाण्यात.”
अन होतही तसच तेव्हा  आंतरराष्ट्रीय वातावरणातील चर्चेतील विषय हि तेच होते , इराक,अमेरिका व अफगाण व आफ पाक पॉलिसि ई. व गुलाल ची गाणी होती तशीच,
‘राणाजी मारो---‘ या राजस्थानी स्टाईलने सुरु झालेल्या दोन ओळीनंतर त्याचे उदाहरण म्हणून जी-जी ओळ टाकली होती ती ओळ,तिची भाषा व स्थानिक घरगुती मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय संबंधांचा केलेला “क्लोन” केवळ अप्रतिम व श्रवणीय होता.
उदा- १) जैसे दूर देश के टोवर मे घूस गयो रे एरोप्लेन
        २) जैसे सरे आम इराक में जाकर बस गये अंकल सेम
         ३)जैसे बिना बात अफगाणिस्तान का बज गयो भैयो band.
याचा गीतकार व त्याला तस लिहायला सांगणारा अनुराग यांना ---केवळ सलाम.
यावरही कळस म्हणून अनुराग चा pasion म्हणून दिसलेला ‘gangs ऑफ वासेपूर’.ब्रिटीशांची रेल्वे बिहारच्या व आताच्या झारखंड च्या कोळसा खाणीतून  सुरु झाल्यावर त्याच्या अवैध्य  व्यापारावर कब्जा मिळवण्याच्या स्पर्धेतून दोन गटातील संघर्ष व नंतर नेतृत्वाच्या व वर्चस्वाच्या स्पर्धेतील संघर्ष,त्यातून मारधाड,गोळीबार,हत्या,खून,विश्वासघात,घोडे,रेल्वे, धनबाद च्या बारीक गल्ल्या, तेथील लोकांचे राहणीमान,भसाभसा गोळ्यांसारख्या तोंडातून सुटणाऱ्या शिव्या व अनेक बाबी अनुराग ने  ‘वासेपुरच्या’ दोन भागातून मांडल्या.

मनोज वाजपेयी,हुमा कुरेशी व दुसऱ्या भागात सुरुवातीलाच अगदी किरकोळ व वेंधळा वाटणारा पण नंतर सर्वाच्या उरात धडकी भरेल असे मर्डर करणारा फैजल खान साकारणारा नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या देखील जीवनातील हा  बेस्ट ऑफ द बेस्ट असेल. सुरुवातीला अख्ख मुंडक कराकरा कापून दारावर टांगणारा व शेवट स्टेनगन अर्धी बॉडीत घूसउन गोळ्या मारण्याचा सीन एरवी कुठल्याही चित्रपटात अत्यंत बटबटीत वाटला असता पण अनुराग ने या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर सुरुवातीपासून मिळवलेली कमांड व स्क्रिप्ट ला असलेली डेप्थ इतकी प्रभावी आहे कि, फैजल्चे व सर्वांचेच कृत्य स्क्रीनबाहेरील कायद्याने चुकीचे असले तरी आपण नकळत कुठल्या न कुठल्या पात्राच्या प्रेमात पडतो.मग तो परपेंडीकुलर असो कि फैजल.

म्हणून मग जेव्हा फैजल अख्या घराण्याचा राग आपल्या दुष्मानावर काढतांना जिथे एका गोळीने जीव जाईल तिथे अनेक बंदुका खाली करत एकाच बॉडीवर गोळ्यांचा पाउस पाडतो.तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील रिलॅक्स होत जाणारे भाव पाहत पाहत तिथपर्यंत नजर ताणून चित्रपट पाहत असलेला प्रेक्षकही फैजल सोबत रिलॅक्स होत जातो इतका कि मोठी लढाई नंतर शांत, थकलेला, व बेसावध असलेल्या फैजलला गोळी मारली जाते,तरी खूप मोठा धक्का बसत नाही. पटकथा,स्टोरी,अभिनय,गाणी,या सर्वांच्या एकजीवी मिश्रणावर अनुराग चा फिरलेला दिग्दर्शकीय हात  त्याचे सोने करतो.

चित्रपटातील झारखंड-बिहारी ग्रामीण मोकळी-ढाकळी शिवराळ भाषेसोबतच गुलालप्रमाने या चित्रपटातील गाणीहि अत्यंत लक्षवेधी आहेत.जेव्हा सर्जनशीलता सर्वोच्च टोकाची असते तेव्हा ज्ञानाची अनेक दालने त्यात वितळून जातात.एक मोठा धक्काच अनुराग gang २ च्या सुरुवातीला देतो.अंत्ययात्रेला चक्क बॉलीवूडची गाणे स्पीकरवर म्हटली जातात. “याद तेरी आयेगी....” किंवा “तेरी मेहरबनिया...” सारखे  .
एकीकडे प्रेत,शोकाकुल नातेवाईक, पांढरे कपडे व दुसरीकडे हे असे गाणे,असे धक्के अनुराग च देऊ जाणे.
या चित्रपटात आणखी एक विशेष म्हणजे कथा ज्या ज्या काळात घडते त्या त्या काळातील सिनेमांचा पात्रांवर व बाहेरील वातारनातील दृश्यांवर दिसून येतो. मग स्वातंत्र्यापूर्वीचे गाणे,अमिताभच्या काळातील, बाप्पिच्या संगीताचे गाणे, दिलीपकुमार,देवानंद,अमिताभ,मिथुन सलमान,शाहरुख, यांची अप्रत्यक्ष जाणीव होत राहते.या चित्रपटातील संवाद हि मस्तच. सिनेमा संदर्भात एक पात्र म्हणते,
“पता है,मै क्यू जिंदा हुं? क्युंकी  मै फिल्मे नही देखता.यहा जिसे देखो किसके जैसे बनना है,खुद्के जैसे कोई नही बनना चाहता. जबतक फिल्मे है तब तक इंडिया के लोग चुत्ये बनते रहेंगे.”
किंवा फैजल चा प्रसिद्द डायलॉग,

 “लगता था ठाकूर के घर मे बच्चन पैदा होंगा, लेकीन निकला शसी कपूर”

पार्ट१ च्या सुरुवातीला ऐकू आलेले व पार्ट२ च्या शेवटी परत ऐकवलेले एक जुने गाणे चित्रपटाची कथा पाहता त्याला एक उंचीवर घेऊन जाते. “एक बगल मे चांद होगा एक बगल मे रोटीया...हम चांद पे.....”
तसेच
छान हिंग्लिश गाणे म्हणजे –“फ्रस्ट्रेटावो नही मुरा,अपसेटाओ नही मुरा....दिलवा को सेटवा करो जी” किंवा “सैंया काला रे......”
परंपरागत बॉलीवूड गाण्यांना सणसणीत कानाखाली देण्याची परंपरा याही चित्रपटात अनुरागने राखली आहे.
त्याचा black फ्रायडे कोर्टात केस असल्याने पुढे ढकलला,वादग्रस्त ठरला पण आला तेव्हा शेवटी भाव खाऊन गेला. त्यातही शेवागर,पोलीस स्टेशन,बॉम्ब ठेवणारी पण हालचालीत साधिसी वाटणारी माणसे , पोलिसांचा खराखुरा वाटणारा पाठलाग या सर्व बाबी जितक्या ग्राउंड reality त मांडता येतील तितका अनुराग ने प्रयत्न केला आहे.कुठेही भपका नाही. त्यामुळे इतक्या वर्षानंतर अजूनही चित्रपटातील सीन डोळ्यापुढे उभे राहतात.
अलीकडे येऊन गेलेला अग्ली सारखा चित्रपट, एक लहान मुलगी अचानक गायब होते-अन तिला शोधायच्या प्रकारात ज्या एकापाठोपाठ एक उपकहान्या  दणादण येऊन आदळतात त्याने प्रेक्षक बसल्या जागी अचंभित होतो व आपन राहतो त्या जगात असेही जग असते याचा अनोखा परिचय त्याला दोन अडीच तासात होतो.
बॉम्बे talkies मधील त्याचा एक भाग हि खूप छान होता.
अलीकडील शेवटचा बॉम्बे वेल्वेट आपटल्यानंतर आम्हाला वाटल आता अनुरागचा राम गोपाल वर्मा होतो कि काय व याच्या पोतडीतील जादू संपते कि काय पण पुन्हा एकदा रामन राघवन व उडता पंजाब या दोन अत्यंत भिन्न विषयावरील कलाकृती घेऊन अनुराग परत कम back करतोय याचा आतोनात आनंद आहे.

-समाधान महाजन

भाग तीन व चार


तर झाल अस कि तेव्हा अत्यंत चर्चेत असलेला रेखाबाईंचा ‘फुल बने अंगारे’ ची व्हिडीओ कॅसेट सरांनी आणलीय व ती रात्रीच्या जेवणाच्या वेळी दाखवणार असल्याची चर्चा ऐकू आली.पेपर व इतर मित्रांकडून सिनेमा चांगला आहे अस कळल्याने आम्ही जाम खुश होतो. अर्थात अशा थोड्या थोड्या कारणांनी आम्ही खूपच खुश असण्याचे ते दिवस होते. संध्याकाळी जेवण संपण्याच्या आत वाढपी काका टेबल वैगेरे आणू लागले आम्ही टीव्ही समोरील मोकळ्या मैदानावर जमा होऊ लागलो, तसतस आमच्यातील जाणकार सिनेरसिक मित्रमंडळींकडून कळत गेल कि या सिनेमात तसली सीन आहेत व ती सीन सिनेमातील मेन आहेत त्यावरच पुढ्च सार काही आहे. झाल जस जस सिनेमा पुढे सरकू लागला आमची उत्सुकता ताणली जाऊ लागली व काही कळायच्या आतच स्क्रीनवरील दृश्य गायब झाली.चित्रपट सुरु झाला तेव्हा रेखाबाई थेट बदले कि भाषा बोलू लागल्या होत्या. काय झाल असावं याचा आम्ही लहान मंडळी अंदाज लावत असतांनाच आमच्यातील थोर सिनिअर मंडळींच्या एका ग्रुपने मैदान सोडले व ते होस्टेल कडे जातांना दिसले अर्थात त्यांना झाला हा प्रकार आवडला नाही अस वाटल.
आजच्या भाषेत सांगायचं म्हटल तर त्यांनी चक्क बहिष्कार टाकला होता.असा प्रकार आजच्या काळात झाला असता तर आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा अन्याय झाला असे समजून तिकडे JNU ला जस आंदोलन झाल तस आंदोलन या JNV मध्ये झाले असते कि काय अस आज वाटत.पण तेव्हाच आमच ते वातावरण वेगळच होत. कारण सरांची हि सेन्सॉरशिप नंतरही सुरूच होती मग तो दामिनी असो वा फुल बने अंगारे असो वा नंतर आलेले चित्रपट असो.
एकदा झाल अस कि मोहरातील ‘तू चीज बडी है मस्त...’ व हम आपके है कोन मधील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हि दोन्ही गाणी एकामागोमाग ऐकू येऊ लागली. शाळेतही येताजाता या दोन्ही चित्रपटातील कुठल ना कुठल गान कोणीतरी म्हणतांना हमखास ऐकू येऊ लागल.मित्र म्हटला कि यापैईकी कुठल गान जास्त हिट असावं. तसी दोन्ही गाणी आम्हाला आवडायची, पण मी त्याला म्हटल कि यातील ‘तू चीज.... हे गान जास्त हिट असेल तर तो म्हणायचा ‘दीदी तेरा देवर... (मुळात गाणे व चित्रपट हा आमच्या दोघातील मैत्रीचा दुवा )
आता प्रश्न असा होता कि या दोन्ही गाण्यातील नेमक कुठल गान हिट हे कस ठरवणार? मग आम्ही आईडिया काढली कि जो समोर येईल त्याला विचारायचे कि यापैईकी कुठल गान तुला आवडते आणि मग आम्ही अनेक जनांना हा प्रश्न विचारला....व बरयाच जणांनी मोहरातील रवीनाच्या त्या गाण्याला पसंती दर्शवली. (त्यावेळी नेमक मला अस का वाटल हे मी कदाचित तेव्हा सांगू शकलो नसतो पण आज एकूणच या क्षेत्राच्या व्यापक अनुभवानंतर याची कारणमीमांसा आज करू शकतो, पण असो तो आजचा विषय नाही.)
तेव्हा नुकताच खिलाडी म्हणून प्रसिध्द झालेला व पुढच्या मै खिलाडी तू अनाडी मध्ये आलेल्या अक्षय कुमार व शिल्पा चे ..चुराके दिल मेरा..च्या आम्ही आतोनात प्रेमात होतो. तो आवाज,गाण्यातील बोल,संगीत व अक्षय-शिल्पाचे नृत्य यातील एकूण एक बाब आवडत होती. त्यामुळे वाचता वाचता एकदम या गाण्याचे संगीत ऐकू आले कि पुढची काही मिनिट श्रद्धांजली दिल्यासारखे जागच्या जागी आम्ही स्तब्द व्हायचो. “........वफाये तो तुमने बहोत मुजसे कि है,किसी और से दिल लगा तो न लोगी......”या आणि पुढील ओळी ऐकतांना ऐन मे महिन्याच्या तापलेल्या मातीवर अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्यावर त्या मातीला जस वाटावं तस वाटत जायचं.
बाजीगर ची फ्रेम, दिल है कि मानता नहि ची कॅप, फुल और कांटे चा हातातील ब्यांड, संजू बाबाची हेअर स्टाइल, सुनील शेट्टी ची बॉडी(तोपर्यंत यासाठी सलमानला मान्यता मिळाली नव्हती) अशा अनेक गोष्टींचे आम्हाला अप्रूप होते. सुदैवाने नववीत असतानाच चष्मा लागल्याने बाजीगर फ्रेम ची हौस पूर्ण झाली. मग कोणी टोमणा दिऊन वा विनोदाने जरी ‘काय बाजीगर’ म्हटल तरी अख्खा दिवस चांगला जात असे रात्री स्वप्नात काजोल वा तत्सम हेरोईन येऊन डोकाउन जात पण सकाळी मोर्निंग पीटी ला जायचे इतके टेन्शन असायचे कि बिचाऱ्या कधी येत अन कधी जात काहीच कळायचे नाही.जाग यायची तेव्हा ग्राउंड वरून पालवे सरांच्या शिट्ट्या यायच्या त्यामुळे झटपट बुटांची लेस बांधून व ती बाजीगर फ्रेम डोळ्यावर सरकावून खड्डे चुकवत ग्राउंडच्या दिशेने पळायचो.
नवोदयला लागलो ते वर्ष 1990. आमच्या त्या टीव्ही वरून खाडी युद्धाचे स्कड मिसाईल ची दिवाळीच्या फटाक्यांसारखी वाटणारी दृश्य आमच्या प्रिन्सिपल सरांमुळे आम्हाला पाहायला मिळाली.म्हणजे ते दिवस तसे जागतिक व भारतीय राजकारण अर्थकारणात व एकूणच विश्वाचा आवाका बदलत जाणारे दिवस होते.बर्लिनची भिंत व त्याविशयीची माहिती सर देत ती भिंत पडली होती.खाडी युद्ध सुरु होते व सर्वात महत्वाचे भारतातील 1991 मध्ये झालेले आर्थिक बदल व स्वीकारलेले जागतिकीकरण.
या जागतिकीकरनाचा आमच्यासाठीचा सर्वात जवळील दृश्य बदल आम्ही समजत असू तो म्हणजे टीव्ही वर सुरु झालेले खाजगी च्यानेल व केबल. खर तर त्याआधी आम्ही सुरुवातीची काही वर्ष सुट्टीत घरी गेल्यावर सर्व जन आपले दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहायचो व सुट्टीत पाहिलेल्या कार्यक्रमांची चर्चा इकडे आल्यावर करायचो.मग कोणाला कोणता चित्रपट आवडलेला असो कोणाला कोणता तर पार नवीन वर्षाचे कार्यक्रम (कारण आमच्या सुट्ट्या ऐन नाताळच्या आसपास एक-दोन महिने असायच्या) अशी सर्व साग्रसंगीत चर्चा रंगायची.
फारच रडारड दिसत असल्याने डिम्पल चा रुदाली काही मी पहिला नव्हता पण ... ‘दिल हुम हुम करे...’ हे गाणे मात्र खूप आवडल होत,बाकी मित्रांनी तो पहिल्याने मला कससच होत होत व आता परत तो पाहू शकणार नाही याच वाईट वाटत होत. ‘सुरज का सातवा घोडा’ हा नावापासूनच एकदम बकवास चित्रपट असल्याचे एकजात सर्वांचे मत पडले. चित्रहार, छायागीत, सुरभी, व दूरदर्शनच्या अनेकोत्तम सिरीअली पाहून त्यावर चर्चा होत असे.
तर 1991 च्या नंतरच्या काही वर्षातच केबल टीव्ही ने तालुक्यान्पार्यंत आपले जाळे पसरवले त्यामुळे अनेक राहून गेलेले चित्रपट पाहण्याची अभूतपूर्व संधी यामुळे लोकांना मिळाली. आमच्यासाठी झालेला बदल म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकू शकत असलेलो व चित्रहार किंवा छायागीत मध्ये पाहत असलेलो सर्व गाणी तिन्ही त्रिकाळ टीव्ही मधून आदळू लागली.
पण या केबल च्या जाळ्यांमुळे सर्वांना न जाणवणारा एक मोठाच बदल मला दिसू लागला होता, कारण त्याचे फटके मलाही बसत होते तो बदल म्हणजे करमणुकीच्या क्षेत्रात सरळ सरळ विषमता निर्माण झाली होती ती विषमता म्हणजे ज्यांच्या घरी केबल आहे ते व ज्यांच्याकडे नाही ते,त्यामुळे पूर्वी सुटीहून परत आल्यावर जी एकच चर्चा सर्वांमध्ये सारखी चालायची ती विभागली गेली.तितक्या चर्चेपुरते तरी आपल्या घरी केबल नाही व आपण यांच्या चर्चेत बसू शकत नाही अस वाटून हिरमुसून बाजूला निघून जानाऱ्या मुलांमध्ये मीही होतो.मग क्लोजप अंताक्षरी कशी असेल, किंवा फिलिप्स टोप टेन कस असेल याचा अंदाज बांधून बांधून बोर व्हायचं.
पुढ मला अस जाणवल कि ज्या वेळी आम्ही दूरदर्शनच्या कार्यक्रमांची चर्चा करायचो तेव्हाही मुलांचा एक घटक होताच ज्यांच्याकडे मुळात टीव्हीच काय पण लाईट हि नव्हती..तमाम सातपुड्यात राहणाऱ्या वळवी,गावित,पावरा,भिल,धानका,तडवी यांच्यातील बहुतांश जन यापासून अलिप्त दिसायचे पण हि मंडळी मैदानावर उतरली कि आमच्या तोंडाचा आ मिटता मिटायाचा नाही...
-समाधान महाजन

भाग दोन


तर झाल अस कि एकाचवेळी आम्ही शाहरुख व बजाज गुरुजींच्या प्रेमात पडलो होतो.फिल्मी प्रेमापायी बराच मार व शाळा सोडायची कारवाई झाल्यामुळे ती मुले किती सुधारली याची माहिती नाही पण शाळेसाठी असलेला टिवी त्यानंतर मुलांसाठी उपलब्ध होऊ लागला मग कधी शनिवार रविवार चे दूरदर्शन वरून दाखवले जाणारे चित्रपट वा सुरभी सारखी मालिका पाहायला मिळू लागली.पुढे पुढे तर विडीओ कसेट आणून सिनेमा पाहण्याचे भाग्य हि याची देही याची डोळा आम्हास प्राप्त झाले.
पण त्या कॅसेट मधील सर्वच्या सर्व दृश्य अबाधित पणे पाहण्याचे भाग्य आमच्या नशिबी नव्हते.कारण चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने मान्यता प्राप्त असला तरी असली सेन्सॉर आमच्या शाळेत होता.शाळेचे आमचे सर्वांचे आवडीचे आदरणीय व प्रचंड धाक व जरब असलेले (हे सर्व गुण व याहीपेक्षा अनेक गुण त्यांच्यात असल्याने तेव्हाची विद्यार्थी , जी आज मोठी असून अनेक क्षेत्रात काम करत असली तरी प्रिन्सिपल सरांचे नाव निघाले कि अत्यंत भाउक होऊन बोलायला लागतात.कारण असा शिक्षक पुन्हा होणे नाही अस सर्वांच मत आहे......पण असो त्यांच्याविषयी नंतर कधी.तर आता ज्या वयात तिथे आम्ही होतो तेव्हा इतकी समज नव्हतीच त्यामुळे त्यांच्या काही बाबी आवडायच्या नाहीत म्हणजे नाहीच.)
तर एखादा चित्रपट मुलांना दाखवायचे ठरले कि आधी सर स्वतः घरी पहायचे व त्यांना जो जो भाग आक्षेपार्ह वाटायचा तो तो भाग ते खूपच फास्ट फोरवर्ड करून ठेवायचे त्यामुळे चित्रपट पाहतांना तीन चारदा तरी स्क्रीन वर काहीच दिसायचे नाही फक्त उभ्या आडव्या रेषा जोरात पळत जायच्या व त्यांना नको असलेला भाग संपला कि मग चित्रपट दिसू लागायचा,यासाठी ते कोणत टेक्निक वापरतात याविषयी आमच्यात प्रचंड कुतूहल होत.(आजकाल लहान मुलांच्या डोळ्यावर टीव्ही तून काय काय येऊन आदळते याचा विचार केला कि मला सर हमखास आठवतात व आमचे डोळे व मानसिकता जपण्यासाठी त्यांनी काय काय केल याचा विचार केला कि त्यांचे अतोनात कौतुक करावेसे वाटते.त्यांनी जे तेव्हा केल ते आम्ही आजही आमच्या मुलांसाठी करत नाही)
तर व्हायचं अस कि पाहता पाहता सर्वजण ऐन रंगात आले कि एकदम स्क्रीनवर उभ्या-आडव्या पट्ट्या सुरु व्ह्याच्या व सगळ्यांचा रसभंग व्हायचा.
एकदा याविषयी मी आमच्या सिनिअर्स च्या गप्पा ऐकत होतो त्यातील एक-दोघांचे मत होत कि, ' आपल्यावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून सर अस करतात, काहीजण म्हणत होते कि जे जस आहे तस दाखवायला काय हरकत आहे,शेवटी एकाने चर्चेचा शेवट करत म्हटल कि,
'' ठीक आहे आपल्यावर चांगले संस्कार होण्यासाठी सर अस करतात पण मग ते पाहत असतांना व कट करतांना सरांवर जे संस्कार होतात त्याच काय??.."
अर्थात मुद्दा अगदीच बिनतोड वाटल्याने चर्चा थांबली.पण त्याच उत्तर काही डोक्यातून जाईना.मग जेव्हा केव्हा चित्रपट पाहतांना असे कट केलेले सीन दिसायला लागले कि मी हळूच मागे वळून सरांच्या तोंडाकडे पाहून घेत असे पण त्यांच्या त्या करारी व कडक चेहऱ्यावरून असे सीन पाहून त्यांच्यवर नेमके कोणते संस्कार झालेयत याचा काहीच अंदाज मला येत नसे.
मग मी आमच्या त्या सिनिअर मंडळींच्या ग्रुपकडे पाहत असे,अशावेळी ते एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत. स्क्रीनवर हिरो-हेरोईन जवळ आले कि त्यांचे ओठाला ओठ लागण्याआधी आमच्या टीव्ही वर चित्र गायब होत असे. या प्रकारामुळे मि.इंडिया सारखा सिनेमा पाहतांना त्यात असलेले (कु)प्रसिध्द गाणे ‘काटे नाही कटते हैं....’ हे आम्ही पाहू शकलो नाही याचे शल्य अनेक दिवस आम्ही उराशी बाळगून जगत होतो. याची इतकी सवय झाली कि पुढे मोठा झाल्यावर ती शाळा सुटली व दुसरीकडे कुठे चित्रपट पाहत असलो कि हिरो-हिरोईन जवळ आले कि वाटे आता चित्र गायब व्हइल पण ते सुरूच राहायचे मग मी डोळे बंद करून घ्यायचो. डोळे पूर्ण उघडे ठेऊन अशी दृश्य पाहिपर्यंत बराच मोठा झालो होतो.
-समाधान महाजन

भाग एक

नवोदयचे दिवस
------------------
नाईनटीज मेलडी म्हणून आजकाल ऐकले जाणारे गाणे आम्हाला सदा सर्वकाळ कुठूनही ऐकू यायचे काळी-पिली, हॉटेली, पान टपरी, लग्नकार्य, सर्कस कोणत्याही माध्यमातून ते आम्हाला पोहचायचे त्यात धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना...., प्यार के कागज पे दिल कि कलम से .....,धीरे धीरे प्यार को बढाना है ... अथवा तू चीज बडी है मस्त.... वा बाजीगर ओ बाजीगर...... वा चुरा के दिल मेरा गोरिया चली.......
यांच्यापैकी कोणतेही वा यासारखे कोणतेही गाणे आम्हाला बसल्या जागेवरून आकर्षून घेत असत, त्या गाण्याच्या आवाजाकडे अक्षरशः कानात प्राण आणून ऐकायचो, तसे ते दिवस वेगळेच होते प्रत्येक दिवस वेगळाच येऊन उगवायचा क्षण क्षण कणभर मोठं झाल्याचा भास व्हायचा,आज या गावावर उगवलेले आभाळ दुसरीकडे नसणारच असा दांडगा आत्मविश्वास घेऊन वावरायचो तरी हि असली गाणी म्हणजे आमचा कॉमन विकपॉईंट
नवोदयच्या त्या मोकळ्या मैदानात सकाळचा वर्ग बाहेरील गवतावर भरला कि अभ्यास होवो कि नको पण एक नक्की व्हायचं कि असल कुठलतरी गाणं हमखास कानी पडायचं अन मन खुश होऊन जायचं,आमचे टीचर लोक कोणास ठाऊक सातवी आठवी नववी म्हणजे लहान समजत असत.
पण आपल्या शाळेच्या तमाम मुलींना मग ती ज्यु. असो कि सिनियर तिला दीदीच म्हणायचे या जगावेगळ्या प्रिंसिपली फतव्याने आम्हाला कोण वेदना व दुःख होत असतील ते आमचे आम्हीच जाणोत.
तर या अतीव फिल्म प्रेमापायी शाळेचं व होस्टेलच कम्पऊंड ओलंडण्याची परवानगी नसतांनाही भिंतीवर उड्या मारून गावातील पलीकडील विडिओ पार्लर वर जाऊन चित्रपट पाहण्याच्या भयानक गुन्हयामुळे फस्ट बॅच च्या चार पाच सिनिअर भैया लोकांना भरे असेम्बली बेइज्जत होऊन पुन्हा देशमुख व अहमद गुरुजींच्या काठीचे फटके खाऊन मग शाळा सोडावी लागल्याचं दृश्य पहिल्याच वर्षी पाहिल्याने आपण कधी स्वतः जाऊन बाजारातील विडिओ पार्लर वर चित्रपट पाहत असल्याचं स्वप्नातही कधी आलं नाही.
पण मग गावातील सालाबादप्रमाणे भरणारी यात्रा आली कि तिथे येणारे ओपन थेटर व त्यातून संध्याकाळ पासून येणारा गाण्यांचा आवाज फुल बिजी शेड्युल मधून हि मनात येऊन तरंग उमटवून जायचा, मग गुरुजी लोकांच्या शिस्तीत जत्रेतील सर्कस पाहायला इन टू वा इन थ्री या अस्सल नवोदयीन कडक लाईनीत जातांना आपसूकच नजर सिनेमाच्या पोस्टर वर जाई व मग पोटात एकदम कायच्या काय होऊन जाई.
तेव्हा एकदम कळलं तेव्हा अक्षय कुमार,सुनील शेट्टी,सैफ अली खान,हि मंडळी जोरात होती सलमान ला मैंने प्यार किया नंतर थेट साजन मध्येच पाहिला होता,
एकदा मी व माझा मित्र गावात एका दुकानावर पेन घ्यायला गेलो होतो,बाजूलाच कॅसेट चे दुकान होते तेव्हा कॅसेट चे दुकान म्हणजे जणू मुंबईच्या फिल्म इंडस्ट्री ने गावोगावी त्यांची उघडलेली आउटलेट च जणू इतका त्यांना मान होता.त्यामुळे टिप्स व्हीनस सारख्या कॅसेट च्या मोठमोठ्या कव्हर वरील पोस्टर दुकानाच्या बाहेरील बाजूस हमखास येणाऱ्या जाणाऱ्याला दिसावीत अशी ठेवली जात.तर असेच एक मोठ्या पोस्टरवरील फिल्म च नाव आम्ही बराच वेळ वाचायचा प्रयत्न करत होतो पण ते जमत नव्हत.DARR या नावाचे आम्ही अनेक उच्चार करून पहिले दार,ड्ररर, दरर, पण ते बोलून आमचे आम्हीच हसत होतो,इतक्यात आमचं लक्ष एकदम बजाज गुरुजींवर गेले बजाज आडनावाचे हे नवीनच आलेले गुरुजी एकदमच उत्साही होते,त्यांना आम्ही हिम्मत करून विचारूनच टाकले कि हे नाव काय आहे, त्यांनी नुस्ते नावच वाचून सांगितलं नाही तर त्यात शाहरुख खान नावाचा हिरो आहे व तो सिनेमा अमक्या तमक्या तारखेला रिलीज होत आहे इतकी सविस्तर माहिती पुरवल्यामुळे आम्ही जाम खुश झालो त्या गुरुजींचे एखादी सायन्स चे चाप्टर संपूर्ण समजून जितका आनंद झाला नसता तितका आनंद डर नामक सिनेमाच्या बहुमोल माहितीमुळे आम्हाला झाला, अर्थात यानंतर हळू हळू आम्ही शाहरुखच्या जवळ व बजाज गुरुजींपासून दूर जायला लागलो अर्थात त्यालाही कारण होतच.

समाधान महाजन