लहानपणी एका मित्राकडे गेलो होतो. तो राहायचा दुसऱ्या गावाला त्यामुळे त्याने मुक्कामाचा आग्रह केला. तिथे थांबलो. तेव्हा त्यांच्या सर्व घरातल्या लोकांना माहिती होते कि मी एक पुस्तकप्रेमी माणूस आहे. तेव्हा त्याच्या बहिणीने ताईने दुसऱ्या दिवशी निघतांना मला एक पुस्तक दिले. ती म्हटली खूप दिवसांपासून आमच्या घरी पडून आहे. तू वाचशील आणि तुला आवडेल. भले मोठे पुस्तक होते ते. त्याचे सुरुवातीचे पेजेस निघून गेले होते. उर्वरित पेजेस पूर्ण पिवळे पडले होते. बांधणी सैल झालेली होती. घरी आणले. बरेच दिवस ते तसेच पाडून होते. दोन तीन वेळा ते चाळण्याचा प्रयत्न केला पण पकड, बैठक, स्थिरता काहीच न जमल्याने त्या पुस्तकाचा नाद मी सोडला. नंतर काही वर्ष सुट्टीचे गावी गेलो कि मला ते पुस्तक घरातील ओपन सेल्फ मध्ये दिसत असे. हळूहळू तेही दिसेनासे झाले. आणि पुस्तकापुरता तो विषय संपला. ते पुस्तक होते तुंबाडचे खोत.
नंतर वाचतांना काही मासिकातून, कादंबरी विषयक लिखाणातून त्या पुस्तकाचे संदर्भ येत होते. श्री.ना.पेंडसे एव्हाना इतर पुस्तकातून घरात आलेले होते. गारंबीची राधा, गारंबीचा बापू, ऑक्टोपस हे पुस्तक घरातल्या संग्रहात आले होते. आणि विशेष म्हणजे मी जेव्हा माझे महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक लिहित होतो तेव्हा संदर्भ म्हणून लोकमान्य ते महात्मा हे डॉ.सदानंद मोरे यांचे दोन्ही पुस्तक वाचनात आली. त्यात एक संपूर्ण प्रकरण या कादंबरीवर आहे. (तो तसा तेव्हा मला खटकला होता. इतिहास वस्तुनिष्ठ लिहितांना कादंबरीचे संदर्भ का वापरले असावेत असे वाटत होते. त्यामुळे आता हि कादंबरी वाचत असतांना मी पुन्हा ते प्रकरण वाचून काढले).
वर्तमानातील घटना घडत असतांना त्याचे परिणाम व प्रभाव आजूबाजूला होत असतात. म्हणून काही लोकगीते लोककला यांच्यात पूर्वीच्या काळातील संदर्भ सापडतात. लोककथा काही आपल्याला सांगून जातात. त्यामुळे एखादी कादंबरी सव्वाशे वर्षांचा कालपट जेव्हा मांडत असते तेव्हा तत्कालीन वर्तमानातील अर्थात आताच्या इतिहासातील संदर्भ त्यात येतातच.
मला हि कादंबरी वाचतांना प्रकर्षाने जाणीव झाली हिंदू, ताम्रपट आणि सातपाटील कुलवृत्तांत या पुस्तकांची. यांच्या रचनेत पूर्ण साम्य नाही पण मोठा कालखंड आहे. पिढ्यांचा इतिहास आहे. त्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्था, राजकारण इतिहास यांचे अनेक अस्सल संदर्भ या कादंबऱ्यांमध्ये येतात.
असो, तर महत्वाचे म्हणजे अनेक दिवस नव्हे तर अनेक वर्ष मनात होते पण तशा सगळ्या गोष्टी जमून येत नव्हत्या. त्यामुळे हे पुस्तक वाचायचे राहिले होते. या दिवाळीत मात्र ठरवून तुंबाडचे खोतचे दोन्ही भाग विकत आणले आणि वाचण्यास सुरुवात केली.
हे महाकथानक आहे. दीडशे वर्षांचा पिढ्यांचा इतिहास आहे पण रंजक आहे. अनेक बाबी कळतात. कोकणातील काही प्रदेशात हे कथानक फिरत राहते. मुंबई आहेच पण मूळ कथा घडते ते तुंबाड गाव. दाभोळची खाडी, जगबुडी नदी, बांडेवाडी, कोळमांजरा, बांडेराम, बोरपाडी, हरणटेंभा. अंजनवेल, गोपाळगड, इत्यादी उल्लेख येत राहतात.
यात कुटुंब, पिढ्या त्यातील विविधरंगी माणसे, गाव, कोकण, तिथला निसर्ग, मनुष्यस्वभाव याप्रमाणे काही वेगळ्या बाबी देखील येतात. साधारण १८५७ च्या उठाव, पेशवाई, पुणे, तत्कालीन मुंबई, टोपीवाल्यांचे सरकार आदि उल्लेख येतात. सशस्र क्रांतीकारी चळवळीत सहभागी झालेला विश्राम हि एक व्यक्तीरेखा आहेच पण त्यातील संदर्भ धूसर आहेत. परंतु टिळक व त्यानंतर आलेले गांधी यातील राजकारण त्याबाबतच्या घडामोडी तत्कालीन विचारसरणी यात कादंबरीतील पात्रांचा सबंध अगदी सरळ आलेला आहे. नरसू व वकील बापू हे गांधी वादी दाखवतांना व काही जन सावरकरवादी दाखवतांना राष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या घडामोडींचा प्रभाव खेड्यातील गावातील लोकांवर कसा पडत गेला. त्यामुळे त्यांच्यातील नातेसंबंधात किंवा मित्रत्वात कशी जवळीक किंवा दुरावा आला हा खरे तर वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे.
पण खरच हि कादंबरी वाचणे तिच्या त्या विश्वात डुबून जाणे हे अनुभवण्यासारखे आहे. तो परिसर त्या व्यक्तिरेखा आपल्या मनोविश्वात जिवंत होतात. खरच खूप छान फील आहे हे वाचणे, यातील खोत मंडळी कधी एकमेकांना मदत करतील आणि केव्हा एकमेकांच्या जीवावावर उठतील काही सांगता येत नाही. जनाबा-जुलाली, नरसू, ताई, दादा खोत, मधु खोत, चीमापा, भिकापा, बापू वकील, बांडेवाडी, गणेशशास्री या व्यक्तिरेखा बराच काळ मेंदूचा ताबा घेतात.
त्यातील काही आवडलेली वाक्य -
“नरसुने आयुष्यात अनेक धोके घेतले. त्यात त्याच एक आवडत पालपुद होते- आयुष्य म्हणजे ढोर कष्ट, जबर हिम्मत, हिशोबी धोके-पण शेवटी नशीब. तेच गांडू असेल तर सार वाया जात. नशिबावर सत्ता नाही म्हणून ते जमेत धरायचे नाही एवढंच. “
“व्यवहारशास्र हे फक्त खर. सर्वात श्रेष्ठ. ओल्या आयुष्यात असा पेच आला कि महाभारताकडे धाव घ्यावी. व्यवहारशस्र सर्वशेष्ठ हे साक्षात भगवंतांनी आपल्या बोलण्यावागण्याने सांगून ठेवलेय. “
“माणस आपल्या परीने धडपडतात पण त्यांच्या पदरात यश केव्हा टाकायचे ती कळ वरती आहे. तिच्यावर कोणाचा ताबा नाही. आपला ताबा फक्त प्रय्त्नानावर. “
“संसार हा ढगासारखा असतो. काही पांढरे, काही काळे, पांढराच का? काळाच का? हा प्रश्न त्यांना कोण विचारणार ? त्यांना आकार देणसुद्धा आपल्या हाती नसत. मुळात त्याला आकारच नसतो. जो असतो तो घडीघडीला बदलत असतो.”
- समाधान महाजन
