जव्हार

 काही जागा, काही शहर, गावं, किंवा अगदी काहीही जे आपल्या मनात खोलवर रुजलेले असते. पण कदाचित सबकॉन्सियस माइंडचा पार्ट बनलेले असते. अस सर्व आपल्या भावनिक व मानसिक nostalgia असतात. अशा ठिकाणी परत गेले किंवा अगदी अनपेक्षित समोर आले तर त्या मेमरीज जाग्या होतात....

काही दिवसांपूर्वी जव्हारला जाणे झाले. खूप वर्षांनी. हा फोटो तेथील राजवाड्यासमोरचा.

लहानपणी अगदी वडिलांचा हात धरून इथे आलेलो... फक्त इथेच नाही जव्हारचा बाजार...दुकाने..घरे...अस सर्व आई वडिलांसोबत फिरलेलो. तेव्हाच कौलारू जव्हार आता बरच बदललंय..... नव्या युगाची चिन्हे इथे सुस्थापित झाले आहेत. होतायत...

पण माझ्या मनात अजूनही ते ८० च्या दशकातील गाव तसेच आहे. तेव्हा जव्हारला येणे म्हणजे मुंबईला आल्यासारखे वाटायचे. कारण आम्ही राहायचो तेथून थोडं लांब असलेल्या आदिवासी पाड्यावर. जिथे थोडी घर सोडली तर काहीही नव्हते.ती घर कुडाची. शेणाने सारवलेली. कौलारू. एक रस्ता ज्यावरून दिवसातून तीन वेळा एस.टी यायची.   मग  काही आणायचे असल्यास जव्हारला जावे लागायचे.

तिथला पाउस, नाशिक-मोखाडा- जव्हार हा घाटरस्ता, डोंगररांगा, सागाची मोठ मोठी झाडे....त्यावरून कोसळणारा पाउस... त्यातून मार्ग काढत जाणारी चिंब भिजलेली एस टी बस..अशा अनेक फ्रेम्स पुन्हा ताज्या होत जातात.

जव्हार येथील मुकणे राजघराणे व त्यांचे संस्थान प्रसिद्ध आहे. हे एक आदिवासी संस्थान होते. या संस्थानाची स्थापना १३०६ मध्ये महाराजा जयदेव राव मुकणे उर्फ जयाबा मुकणे यांनी केली. तेच येथील पहिले राजे होते. जायबा महाराज हे मुळचे इगतपुरी तालुक्यातील मुकणे या गावाचे होते. सन १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व तेव्हाचे जव्हारचे राजे महाराजा विक्रम शाह यांची भेट झाली होती. जव्हार नगरपरिषदेची स्थापना मार्तंडराव मुकणे (पाचवे विक्रमशाह) यांनी १९१८ मध्ये केली. शहरातील महालक्ष्मी माता मंदिर व खंडेराव महाराज मंदिर हे दोन्ही मंदिरे संस्थानची आहेत. 

येथील राजवाड्याचे नाव जयविलास palace आहे. या राजवाड्याचे बांधकाम १९४१ च्या आसपास करण्यात आले. फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत महाराज यशवंत मार्तंडराव मुकणे (पाचवे पतंगशाह) यांनी इंग्लंडहून परतल्यावर याचे बांधकाम केले. हा राजवाडा दोन एकर जागेत असून भोवतालचा परिसर १४५ एकर इतका आहे.