ही एक लाईन वाचायला फार वेळ लागत नाही पण भुरा अर्थात शरद बाविस्करने आयुष्याची चाळीस वर्ष त्यासाठी संघर्ष केला. हा प्रवास कोणत्याच टप्प्यावर लिनिएअर पद्धतीचा नाही यात अनेक वळणे, खाचा, खळगे, चाली, अपमान, सन्मान, आनंद आणि तितकेच दु:ख देखील आहे.
भुरा अर्थात शरदचे गाव व माझ्या गावात फार फार तर पंचवीस तीस किलोमीटरचे अंतर आहे. तालुका धुळे. अर्थात जिल्हा धुळे. धुळ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या आमच्या गावांचे अर्धे आयुष्य धुळ्यात जाते. त्याला आम्ही कोन्ही अपवाद नाही. आमच्या गावातील एकूणच भौगोलिक, सामाजिक व राजकीय स्तर- माणसांचे व गावाचे नाव बदलले कि एकच. त्यामुळे त्याने साकारलेले, अनुभवलेले व भोगलेले गावातील क्षण व त्यांचा सल त्याला अजूनही न भेटता त्याच्या शब्दातूनच जिवंत भेटला. म्हणून शरद जेव्हा लिहितो,
"आमच्या गावात कुणी नुसतं कुस्तीसुद्धा जिंकून आलं तरी गावात मिरवणूक निघत असे: पण त्यासाठी प्रस्थापितांच्या घरात जन्माला येणे गरजेचे होते. प्रस्थापित आणि विस्थापित या फार सापेक्ष गोष्टी असतात."
तेव्हा फ्रान्सला व ब्रिटनला शिष्यवृत्ती वर शिकायला जाणाऱ्या व तरीही दखलपात्र नसणाऱ्या भूराचे हे स्वगतपर वाक्य नुसतच ग्लोबल न राहता अत्यंत लोकली रोज भोगावे लागनारे त्रिकालाबाधित सत्य होते.
मग पुढे फ्रांसला गेल्यावर मराठी मंडळाच्या एका कार्यक्रमात असेच उपर उपर वाटत असतांना फ्रेंच मित्र जवळचा वाटतो .... हि विचारांची एक वैश्विक नाळ आहे. स्वीकारलं व नाकारलं जाण्याची प्रक्रिया आहे. जी संवेदनशील मनाला न कळत्या वयात उद्वस्थ करू शकते.
तसेच भूराची आई आहे ती परिस्थिती स्वीकारत आपल्या कुटुंबाचा गाडा एक हाती ओढत नेते व आमच्या आहिरानी भाषेतून अनेकदा जे जीवनविषयक तत्वज्ञान मांडते त्या तिच्या वाक्यावाक्यात मला माझी आईच दिसते.
'देव काय एक जत्रमा म्हातारा नही व्हस'
'हालकी वडांग दखीसन कोनी भी पाय ठेवस, भाऊ. मोठा बाप म्हनीसन नमत लेवो'
एकाच वाक्यात आहे ते व काय कराव ते सांगायला तत्वज्ञानाच्या पदवीची गरज कोणत्याच आईला नसते.
----
काही दिवसांपूर्वी भूराच्या रावेर मार्गे धुळ्याकडे निघालो होतो. तेव्हा हे माहित नव्हते कि हे त्याचे गाव आहे. त्या उतारावर मी सहज थांबलो. उंचीवरच्या जागा जेथून एक भव्य कॅनव्हास नजरेत येतो तशी जागा मला आवडते. लळिंगच्या किल्ल्यानंतर पुन्हा एकदा धुळ्याचा परिसर उंचीवरून पाहायचा असल्यास शरदच्या गावाजवळील ही जागा मस्त आहे.
पुस्तक वाचत असतांना समजल भूराच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्या रस्त्याला जेथून तो चढावावर रोज सायकल मारत यायचा व अनेकदा घामाघूम होऊन रात्रीच्या अंधारात एखाद्या दगडावर बसून धुळ्याचा लांबवर पसरलेला परीघ बघत आयुष्याची त्रिज्या मोजत बसायचा. मी पण नेमके त्याच ठिकाणी कसा थांबलो असेल?
दहावीला इंग्रजीत नापास झाल्यावर तशा असलेल्या परिस्थितीत एखाद्याने शिक्षण जरी सोडले असते तरी आमच्या गावाकडे त्याला फार काही मोठी बाब मानली गेली नसती. पण शंभर पैकी नव्यान्नव असणार्यात शरद नव्हता. प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची प्रेरणा जास्त मिळत असली तरी मुळात ठिणगी आत असावी लागते. ती नसेल तर आहे तेच जीवन व भोग समजून आयुष्य काढणारे अनेक असतात. भुरा एखादाच बनतो.
मग त्यासाठी गरेज वर काम करणे असो, क्रेन सर्विस वर काम करणे असो, एक निसटत्या क्षणाला सर्व सोडून एका ट्रक मध्ये बसून लांब कुठेतरी निघून जाण्याचा घेतलेला निर्णय असो वा धरणाच्या पाण्यात पोहत असतांना एकदमच जीवनाच्या सुटलेल्या अशा असो .... भुरा प्रत्येक वेळी त्याच्या भाषेत सांगायचे म्हटले तर एक वर्तुळ ब्रेक करून दुसऱ्या वर्तुळात प्रवेश करता झाला पण मनाने कधी हरला नाही.
--------
शरदला मी एकेरी शरद म्हणण्याचे कारण म्हणजे आम्ही एक तालुक्याचे, शिवारातले, समवयस्क असणे हे तर आहेच त्याशिवाय अजून एक म्हणजे शरदला जय हिंद कॉलेजला पहिल्याच दिवशी भेटलेला व नंतर त्याचा चांगला मित्र झालेला ज्यावर त्याने किमान चार-पाच पेजेस लिहिले असतील तो नितीन/ नितेन्द्र चौधरी हा majha चांगला शिक्षक मित्र... जिंतूर परभणीला असतांना नितीनच्या बोरीच्या रूमवर मी अनेकदा अभ्यासाला जायचो. त्या काळात नितीन सांगायचा त्याच्या या मित्राबद्दल त्याच्या लखनौ व jnu च्या प्रवेशाबद्दल .... पण तो हाच हे आज समजल. पृथ्वी गोल असते.
भुरा खरच खूप छान पुस्तक आहे. समकालीन आत्मकथनामध्ये उल्लेखनीय वेगळे व आपलं वाटणार असे हे आत्मकथन आहे. पुस्तकाचा पहिला अर्धा भाग अत्यंत रोचक उत्कंठावर्धक आहे. नंतरच्या अर्ध्या भागात थोड लांबल्यासारखे वाटते. विदेशातील तो भाग थोडा तासून धारदार बनवता आला असता.
बाकी भूराची संपूर्ण डिक्शनरी पाठ करण्याची बाब बिलकुल काल्पनिक नाही. त्याच्या दिलीप चव्हाण या सरांकडून वा त्याच्या मित्रांकडून तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता.😂 (अर्थात मी पण नितीनला विचारून खात्री केली...😋 तो म्हटला आम्ही शरदला डिक्शनरी म्हणायचो.....)
हे काही पुस्तकाचे समीक्षण नाही. जे वाटल... आवडलं ते लिहील. कमी मार्क पडल्यामुळे आयुष्य संपल्यासारखे वाटणाऱ्या मुलांना नक्की हे पुस्तक वाचायला द्या.
- समाधान महाजन
