कौन प्रवीण तांबे ?

कौन प्रवीण तांबे? ...

मस्त मूव्ही आहे . मला पण माहित नव्हते या आधी कोण प्रवीण तांबे? 

अर्थात माझी क्रिकेटची आवड यथातथा असल्याचा हा परिणाम असावा. माझ्यासारखी अनेकजन या भूतलावर असण्याची मला खात्री आहे. पण क्रिकेटच्या काही घटना माझ्या जीवनात महत्वाच्या व लक्षात राहण्याजोग्या ठरल्या आहेत. त्यासंदर्भात नंतर कधीतरी यथावकाश. पण एक आहे कि  जरी त्या घटना  थेट मैदान वा पीचशी रिलेटेड नसल्या तरी क्रिकेटशी संदर्भात आहेत हे नक्की. अनेक छोट्या घटना आपले आयुष्य समृद्ध करत असतात. कोण कोणाला कधी प्रेरणा देऊन जाईल सांगता येत नाही. 

अर्थात आताचा विषय, कौन प्रवीण तांबे? 

Pravin tambe proves that age is just a number...

पण तरी तो कोण? 

वयाच्या ४१ पर्यंत रणजी खेळण्याचे स्वप्न बघत तितकं संपूर्ण आयुष्य  पणाला लावणारा ध्येयवेड्या क्रिकेटरची गोष्ट ... जो फायनली आयपीएल साठी निवडला जातो, रणजी खेळतो. २०१४ च्या आयपीएलचं सीजन त्याने असं काही गाजवलं, की क्रिकेट विश्वातल्या प्रत्येकाला प्रविण तांबेची दखल घ्यावी लागली. या सीजनमध्ये तो राजस्थानसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. आधीच सर्वात वयस्कर(40) आयपीएल पदार्पण करण्याचा विक्रम नावावर झालेल्या प्रविण तांबेने हॅट्ट्रिक घेतली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. याच कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये धडक मारली. यानंतर अ श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीतही मुंबईचं प्रतिनिधित्व केलं.

पण हा प्रवास अत्यंत खडतर आहे.... होता.. ... 

जर अस नसत झालं तर... ?

चित्रपट पाहून झाल्यावर जरी असा विचार मनात आला, खरच राहुल द्रविडचा आयपीएल साठी आमंत्रणाचा फोन तांबेसाठी आला नसता...?जर त्याला खेळायला भेटलच नसत...? किंवा तोच जीवनाच्या संघर्षात हरला असता तर...?  

तरी चित्रपट पाहणाऱ्याला तो विचार निराशेच्या प्रचंड मोठ्या खाईत ढकलून देईल. तेथून पाहणाऱ्याला बाहेर निघणे अवघड होईल. प्रवीण तांबे तर संपलेला असेल. सुदैवाने असे झाले नाही आणि म्हणून कदाचित प्रवीण तांबेच्या जीवनातील हि नाट्यमयताच चित्रपटाचा विषय ठरली. संपूर्ण अडीच तासाच्या चित्रपटात तुम्ही आम्ही सर्व जन आपापली अपयशाची संघर्षाची जिद्दीची  स्टोरी बघत असतो. शेवटच्या वीस मिनिटात प्रवीण तांबे सेलेब्रिटी बनतो. अर्थात त्यासाठी संपूर्ण चाळीस वर्ष एकच ध्यास असतो क्रिकेट..... तो काही झाल तरी, कुठेही नोकरीला लागला तरी, कुठेही वावरत असला तरी त्याच रणजी खेळण्याचे  स्वप्न विसरत नाही.... अत्यंत प्रामाणिक पणे तो समोरच्याला विचारात असतो.. सर मेरा वो रणजी...मेरा क्रिकेट... संपूर्ण प्रवासात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. ना समोरच्यावर आरोप.   प्रवीण तांबे व सामान्य माणसात फरक असतो इथे.... काहीही झाले तरी  स्वप्न न विसरण्यात. ध्येयाशी प्रामाणिक राहण्यात. 

लाईफ हो या क्रिकेट ... You need  just a good over.. हे ऐकायला चांगलं वाटतं ... तांबेचे चाळीस वर्ष आहुती होती... 


 श्रेयस तळपदे अशा भूमिका जगतो. काही वर्षांपूर्वी आलेल्या इक्बाल मध्ये त्याने अशाच एका passionate क्रिकेटरची भूमिका दमदार पणे केली होती.  मी तो चित्रपट पाहिला होता 2008 मध्ये जेव्हा मी अभ्यास करत होतो. वरती म्हटल्याप्रमाणे क्रिकेटच्या या विषयावरील चित्रपटाने अनेक दिवस मी प्रभावित होतो. 


24 नोव्हेंबर 2007 च्या रात्री एक वाजेनंतर  चित्रपट पाहून झाल्यावर ज्या ओळी मी कागदावर खरडल्या.... त्या अशा होत्या (अर्थात जपून ठेवलेल्या आज प्रवीण तांबे मुळे शोधून काढल्या.... त्या अशा )

अब मुश्किल नही कूच भी ... आशाए...आशाए...

इक्बाल पाहत आहे. 

मेहनत करतांना – घरातूनच, जवळच्या माणसांकडून झालेला विरोध सहन करावा लागतो. 

यश असच मिळवाव लागत तेव्हा झळाळून निघत. वाटतय मेहनत घेतच राहावी. 

इक्बाल – एक स्टोरी आहे सगळ्यांची. 

घरातला विरोध. खेळाच्या सिलेक्शन कमिटीतील भार्ष्टाचार, घर व बाजूचे सामाजिक आर्थिक वातावरण. 

सिलेक्शन न झालेल्या वाया गेलेल्या अव्वल गोलंदाजाचे वाया गेलेले जीवन जो इक्बालला ट्रेन करून रणजी (आंध्र) मध्ये जागा मिळवून देतो व पुढे इंडिअन टीम मध्ये प्रवेश मिळावा म्हणून आपल्यालाच टाळणार्या गुरूला गो टू हेल म्हणतो. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर तळपून उठते इक्बालची जिद्द. 

एक अश्रू विजयाच्या यशाच्या नावाने 

डोळ्यातून ओघळतो. 


तेव्हा पार जग विरघळून जाते. 

अंधुकस अस्पष्टस दिसतं. 

सार आकाश. 


तोच क्षण असतो 

यशाचा. 


तोच क्षण असतो

सार जीवन आससून 

जगण्याचा.   


......असो, 

ते तेव्हा लिहील. हे आज लिहितोय... 

ती इक्बालची स्टोरी होती. हि तांबे ची स्टोरी आहे. 

प्रत्येक पिढीत असे कोणीतरी जन्माला येणे आवश्यक असते.  

श्रेयस तळपदे ने  पुष्पाला दिलेल्या आवाजाने अलीकडे त्याने लोकांचे  लक्ष वेधून घेतले तरी कॅलीबर असून अजुन हवं ते ग्रँड सक्सेस वाट्याला न येणाऱ्यांमध्ये श्रेयसचा नंबर अगदी वर. दिल दोस्ती etc,  इक्बाल व कौन प्रवीण तांबे या भूमिका श्रेयसच्याच होत्या. त्या ठिकाणी दुसरं कोणी आपण कल्पनू शकत नाही ...


प्रवीण तांबेला श्रेयस ने न्याय दिला कि श्रेयस ने प्रवीण तांबेला .... both knows. 


सर्वच जण तेंडुलकर, गावसकर बनत नाहीत...काही जण प्रवीण तांबे बनतात.

- समाधान महाजन 

झाशीची राणी व पारोळा (किल्ला)

पारोळा किल्ला आणि झाशीच्या राणीचे माहेर हे समीकरण मानले जाते. कदाचित हा किल्ला अजूनही प्राचीन असावा, तसा अभ्यास झालेला नाही.. पण काल खानदेश एक्सप्लोरर टीमने आणि जवळपास पाचशे सहाशे विद्यार्थ्यांनी हा किल्ला स्वच्छ केला.. टीमचे अभिनंदन काही फोटो.. स्वतः जिल्हाधिकारी यांनी दोन तास श्रमदान केले.. 

 ६६.पारोळा किल्ला

पारोळा जरी जळगाव जिल्ह्यात असले तरी ते धुळे शहरापासून जवळ आहे. धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. अंमळनेर पासून पारोळा २२ किमीवर आहे. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे. पारोळा - हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट; तर रुंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत

जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे. या परिसरात त्या काळात पेंढाऱ्यांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख 'पेंढारपुरा' म्हणून आहे. जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी भुईकोट किल्ला इ. स. १७२७ मध्ये बांधल्याची नोंद आहे किल्ल्यातील ' सात दरवाजे ' आहे

पारोळा बसस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर किल्ला असल्याने तुम्ही पायी किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतात. बाजारपेठेतूनच किल्ल्यात जाण्याचा मार्ग आहे. या मार्गातील खंदकावर पूल असून, पुढे दरवाजा. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाऱ्या मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील पूर्वेकडील दरवाजास ' दिल्ली दरवाजा ' म्हणून ओळखले जाते, तर अन्य दरवाजांची नावे वेगळी आहेत. आताच्या काळात या परिसरातीलच काही गावांची अथवा समाजाची नावे या दरवाजांना देण्यात आली आहे. त्यात धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अमळनेर दरवाजा अशी ही नावे आहेत. 

   बालेकिल्ला किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात. अन्य भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बांधणी रेखीव आहे. तो साधारण १६० मीटर लांब व १३० मीटर रुंद आहे. किल्ल्याच्या मध्यभागी मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला दिसून येतो. या बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे. किल्ल्याच्या वरच्या भागावरून पूर्ण किल्ल्याचे चोहोबाजूंनी दर्शन घेता येते. सध्या या ठिकाणाची निगा पुरातत्त्व विभाग घेत असल्याने अनेक ठिकाणी पुनर्बांधणीची कामे सुरू झाली आहेत. किल्ल्याच्या आत काही विहिरी आहेत. येथील एका भव्य बुरुजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. किल्ल्यात एका कमानीजवळ चौकोनी विहीर आहे. त्यात पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा होतो. चौफेर होते खंदक पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस एक खंदक आहे. आता त्याला येथील स्थानिक लोक तलाव म्हणतात. पूर्वीच्या काळात किल्ल्याच्या चौफेर खंदक असल्याचे सांगितले जाते. 

    पारोळा किल्ला हा झाशीच्या राणीचा किल्ला असून झाशीच्या राणीचे हे माहेर आहे. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा सुदर् असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला, तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थीतीत आहे. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणार्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.  इ.स. १८२१ मध्ये पारोळ्यात इंग्रजाविरुध्द बंड झाले, त्यावेळी कॅप्टन ब्रिग्र याला ठार मारण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला होता. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. इ.स. १८५७ च्या उठावात झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. 

      आत आल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकर्यांसाठी देवड्या दिसतात; तर समोर १५ फूट उंच तटबंदी दिसते. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच बालेकिल्ल्याचा भक्कम चौकोनी बुरुज त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे.प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी दिसतात. एकेकाळी त्र्यांच्यावर फांजी बांधलेली असावी. या कमानीं जवळच एक चौकोनी विहीर आहे. कमानीकडून पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी जिना आहे. या पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूस तलाव आहे. (पारोळाकरांनी या तलावाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे व तलावात केरकचरा टाकल्यामुळे त्याची शोभा गेली आहे) या तलावात उतरण्यासाठी तटबंदीखाली दोन ठिकाणी चोर दरवाजे आहेत. तसेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस पारोळा गावात आहेत. पूर्वेच्या तटबंदी समोर महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराजवळ भूयार असून ते ८ कि. मी. वरील नागेश्वर मंदीरात उघडते असा स्थानिकांचा दावा आहे. मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या मागे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला एक विहीर आहे.बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २५ फूटी भव्य बुरुज आहेत. या बुरुजांच्या मध्ये चार चौकानी बुरुज आहेत बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. बालेकिल्ल्यावर दक्षिणेकडील तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेर्या असाव्यात. बालेकिल्ल्यात असलेल्या दोन विहीरीतील पाणी हौदात ओतून ते या कचेर्यांपर्यंत खेळवण्यात आले होते, ते चर आजही पाहायला मिळतात. या कचेर्यांच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते, त्र्यांचे अवशेष पहायला मिळतात. कचेर्यांच्या भिंतीत जंग्र्यांची रचना केलेली आहे. कचेर्यांच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील बुरुजात दारुकोठार आहे. या कोठारालाही सर्व बाजूंनी जंग्या आहेत.गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी आहे व तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला १० फूट x १० फूट खंदक आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पूर्वीच्याकाळी प्रवेशद्वारासमोर उचलता येणारा लाकडी पूल होता.

महादेवाचे मंदिर किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते; परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणूनही या किल्ल्याकडे पाहता येईल. झाशीच्या राणीच्या वास्तव्याने हा किल्ला तिनेच बांधला, अशीही स्थानिकांची समजूत आहे. राणीच्या माहेरचे वंशच म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात.