The Empire (द एम्पायर)

The Empire (द एम्पायर) ही वेब सिरिज जबरदस्त आहे. सध्या एक सीझन रिलीज झालाय. जर पुढील सीझनमध्ये अशाच प्रकारचे निर्मितीमूल्य कायम ठेवले तर ही सिरिज इंडियन गेम ऑफ थ्रोन होईल असे वाटते. ही सिरिज आलेक्स रुदरफोर्डच्या 'द एंपायर ऑफ मुघल' या fiction नॉवेल वर आधारित आहे. मुळात या नॉवेलचेच सहा खंड आहेत. त्यातील पहिल्या खंडाचे नाव आहे 'रायडर्स फ्रॉम द नॉर्थ' याच नावाने वेब सिरिजचा पहिला सीझन आहे. याचा अर्थ पुढील खंडावर आधारित पुढील पाच किंवा त्यापेक्षा जास्त सीझन निघू शकतात. 

सिरिज पाहायला सुरू केली तेव्हा काही मिनिट असे वाटले की, एखाद्या हॉलीवूडच्या सिरीजचा हिन्दी रिमेक बघतोय की काय असे वाटत होते.  आतापर्यंत ऐतिहासिक सिनेमे वा सिरिज बघतांना एक तर डोक गहाण ठेऊन बघणे किंवा कान बंद करून फक्त दृश्य बघणे किंवा डोळे बंद करून फक्त कानाने ऐकणे असे काहीतरी करावे लागत होते. ही सिरिज बघतांना आपोआप पूर्ण एकाग्र होऊन तुम्ही बघायला लागतात व फील करायला लागतात की भारतात पण असे काहीतरी भन्नाट बनू शकते. 

अप्रतिम सिनेमेटोग्राफी, अप्रतिम संवाद, अचूक दिग्दर्शकीय पकड.... आणि बरेच काही. यातील कुठलीही फ्रेम अनावश्यक वाटत नाही. किंबहुना काही वेळा काही दृश्य अजून काही सेकंद हवी होती असे वाटत असतांनाच असा काही टर्न बसतो की ते विसरून आपण नवीन visuals बघायला लागतो.  इतके प्रोफेशनली भारतात फार क्वचितच निर्मिती होती.  

एखादा सुंदर स्टोरी प्लॉट जर त्याचे मूल्य ओळखणार्‍या  जाणकार लोकांच्या हाती पडला तर त्यातून अशी दर्जेदार निर्मिती होऊ शकते. ...आणि मग बटबटीत हिंसा व सेक्स सिन नसतांना देखील देखील लोक आवडीने  सिरीज बघतात.

द एंपायर ही सिरिज आहे भारतातील पहिला मुघल बादशाह बाबर याच्यावर. पण मुळात सिरिजचे वैशिष्ठ्य असे की यात बाबर रेडिमेड सम्राट दाखवला नाहीय....  तर सम्राट बनण्याच्या त्याच्या प्रवासावर आहे. त्या प्रवासातील युद्धावर आहे, मित्र व शत्रूवर आहे. सम्राट झाल्यावर देखील त्याच्यातील आंतरिक कलाहावर आहे. घरातील नातेसबंधवार आहे. सत्तेच्या स्पर्धेवर आहे.  म्हणून एक प्रसंगी बाबर जे म्हणतो की,   'मौत और  जीत मेहबूबा है हमारी, दोनो हमारे साथ खेलती रहती है.... पास आती है फिर दूर चली जाती है'  हे शब्द व अर्थश आपल्याला स्क्रीनवर दिसते. 

जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. त्याच्या वडिलांचे नाव होते उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम.  वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना (कझाकस्तान) येथे झाला. सिरिज बघतांना जाणवते की हळूहळू चंगीज खानचे जीन्स त्याच्या आजीमार्फत प्रभावी होत जातात.  वडिलांनंतर  चौदा वर्षांचा असतानाच तो फर्घाना प्रांताचा राजा होतो व तेथून सुरू होतो त्याचा प्रवास जो भारतात येऊन संपतो. या प्रवासात कधीही सहज सोपा विजय त्याला मिळत नाही न त्याचा प्रवास एका लिनीयर पद्धतीने होतो. म्हणून तर जहीरुद्दीन मुहम्मद बाबरचा first mughal emperor बाबर कसा झाला हे यात पाहायला मिळते.  

स्टारकास्ट जबरदस्त आहे. शबाना आझमीचे बर्‍याच दिवसांनी झालेले दर्शन जबरदस्त. बाबरची आजी म्हणून प्रभावी. ती गेल्यानंतर बाबरची बहीण खानजादा बेगम म्हणून द्रष्टिने केलेलं काम देखील कौतुकास्पद. कुणाल कपूरने बाबरला न्याय दिला आहे. तो फिल्मी वाटतच नाही ही फार मोठी जमेची बाजू आहे. बाबरचा मित्र कसिमची भूमिका केलेला इमाद शाह 'दिल दोस्ती, etc' मध्ये 2007-08 मध्ये मी पहिला व शेवटचा पहिला होता. तिथे देखील तो मुख्य भूमिकेत असलेल्या श्रेयस तळपदेवर बर्‍याचदा हावी होतांना दिसतो. त्याचा तो बिनधास्त व कायम बॉक्स/रूल्स तोडण्याचा आवडेल असा अंदाज इथे देखील घेऊन आला आहे. राहुल देव मस्त. यातील सर्वात संस्मरणीय व धक्का देणारी  भूमिका केली असेल तर ती दिनो मोरीयाने. त्याच नाव घेतलं की बिपाशाबसू आठवते व तीच नाव घेतलं की तो ... इतपत आठवणीत असलेल्या दिनो मोरीयाने या सिरिज मध्ये शायबनी खान बनून जे काही केल आहे ते निव्वळ अप्रतिम म्हणता येईल. सिरिज बाबर वर असली तरी वाटत राहत शायबनी  खान स्क्रीनवर अजून हवा होता. (खर तर वेब सिरिजमुळे असे अनेक साईडला गेलेले कलाकार पुढे आले. जस आश्रम मध्ये बॉबी देओल.) 

डायरेक्टर मिताक्षरा कुमारला या सिरिजसाठी नक्कीच दाद द्यायला हवी. ती अर्थशास्रची पदवीधर आहे. तिने बाजीराव मस्तानी व पद्मावत मध्ये को-डायरेक्टर म्हणून काम केलेले असल्याने काही वेळा त्या चित्रपटांची आठवण येते पण ती तेव्हढ्यापुरती.  

थांबण्यापूर्वी अजून एक म्हणजे या सिरिज मधील संवाद. अगदी समर्पक व मनात जाऊन बसतील असे. कुठेही आक्रस्ताळे पणा नाही ना भडकपणा. जसे- 1) 'जो वक्त की जरुरते को समजते है, वक्त उनकी जरुरतो का  भी खयाल रखता है... ' 2)  'ना रिश्तेदारी के लिये ना मोहोबत के लिये....आप हमारी मदद कर रहे हैं सिर्फ तख्त के लिये...' 3) 'जिंदगी सिखा देती है, जितने के लिये हर चाल जायेज है..'  4) बात जब तखत की हो तो शराफत हार ही जाती है... 5) एक बाप नही एक शहेनशाह की तरह सोचो... असे अजून बरेच काही. 

इतिहास आवडणार्‍यानी तर ही सिरिज नक्की पाहायला हवी.

- समाधान महाजन