घटत्त्कोच लेणी व जंजाळा किल्ला


जंजाळा किल्ल्याचा बुरूज
जरंडी मार्गे गेल्यास जंजाळा  किल्ल्याचा दिसणारा बुरूज 
या वेळी आम्ही ट्रेक व भ्रमंती साठी निवडलेला मार्ग होता जंजाळा किल्ला व घटत्कोच लेण्या....जळगाव पाचोरा व जरंडी मार्गे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी लागलो. जरंडी हे सोयगाव तालुक्यात येते. जळगाव-सिल्लोड-गोळेगाव मार्गे देखील या किल्ल्यावर जाता येते. सिल्लोड तालुक्यातील अंभई गावापासून हे १० किलोमीटरवर येते. अंभई गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या किल्ल्याला वैशागड किंवा तालतम असेही म्हणतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जंजाळा गावाच्या दिशेने हा भूदुर्ग आहे तर इतर तीन बाजूने हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. हा ट्रेक तसा छानआहे. उजव्या बाजूच्या छोट्या डोंगरावरून चालत वर चढून गेले की किल्ल्याचा जो 
डोंगर आहे त्याला जोडणारा एक उंचवटा 

लागतो. त्या उंच भागावर उभे राहिल्यास जंजाळा किल्ल्याचा विस्तार जाणवतो.  आपण जिथे उभे  राहतो त्याच्या समोरच किल्ल्याच्या   तटबंदीच्या  काही खुणा दिसतात. पण किल्ल्याचा डोंगर व आपल्यामध्य एक भलीमोठी दरी सते. त्या दरीच्या वरच्या बाजूला आपल्या उजव्या हाताला आपले डोळे पोहचतील इतक्या लांब किल्ल्याच्या डोंगराचा विस्तार आहे. हळूहळू आम्ही डाव्या बाजूने वर चढायला सुरुवात केली. हा शेवटचा चढ तसा आतापर्यंत चालून आलेल्या भागपेक्षा थोडा कठीण होता. कारण छोटी सरळ वर जाणारी पायवाट खाली दरी व पायाखाली सरकणारे छोटे खडे ... मध्ये एका ठिकाणी झाडी दिसली. सावलीतील मोठ मोठ्या दगडांवर बसून सोबत आणलेल्या sanck वर ताव मारला व पानी पिऊन परत चढाईस आरंभ केला. 

हे नोव्हेंबर महिन्याचे दिवस होते. दिवाळी नंतर लागलीच आलेला हा रविवार होता. साग व इतर झाडांमध्ये अजून पूर्ण पानगळ झालेली नव्हती. काही ठिकाणी अजूनही गवत हिरवेगार होते तर काही ठिकाणी ते पिवळे पडले होते. पण अजून पूर्ण सुकलेल नव्हते. संपूर्ण डोंगर व परिसर हिरव्या पिवळ्या रंगाच्या छटांमध्ये रंगून गेला होता. ऊनही फारसे नव्हते व थंडी देखील नव्हती. अशा टोपोग्राफी मध्ये फिरण्याची व  ट्रेक करण्याची वेळ आल्यास पाण्याचा साठा सोबत असलेले केव्हाही चांगले. 

आता ती छोटी पायवाट ज्या ठिकाणी पोहचली ते किल्ल्याचे एक द्वार होते. नक्कीच ते प्रवेशद्वार नसावे. हा दरवाजा इकडील गावाकडे जाण्यासाठी असलेला असावा. त्यावरही बरेच वेली व झाडे झुडपे उगवलेले होते. तो ज्या ठिकाणी किल्ल्यावर उघडतो तो प्रवेश देखील छोटा आहे. तेथून डाव्या हाताला थोड्या अंतरावर बरेच पडझड झालेल्या भिंती व बुरूज दिसत होते. त्यांच्या आजूबाजूला देखील बरीच झाडे झुडपे उगवली होती. हा भाग कदाचित समोरून सोयगाव गावावरुन जो जंजाळा किल्ल्याचा भाग दिसतो तो असावा. 

जंजाळा किल्ल्याचा इतिहास -  अजंठा  डोंगर रांगातील हा आमचा सहावा ट्रेक होता. (अजंठा लेण्यांजवळील डोंगर, अंतुर किल्ला, वेताळगड, पाटनादेवी  मार्गे पितळखोरा लेणी, फत्तेपूर जवळील गोद्रीच्या धबधब्याचा डोंगर ) पैकी त्यात दोन किल्ले होते. एकूण माहिती घेतली असता असे लक्षात येते की हे सर्व किल्ले टेहळणी किल्ले असावेत. उत्तरेकडून येणार्‍या शत्रूवर लक्ष ठेवणे व आपल्या सैन्याला शिदोरी पुरवणे व इतर व्यवस्था करणे अशा पद्धतींची कामांसाठी यांचा वापर होत असावा. त्यामुळे  विविध राजवटीतील अनेक राजे व  सरदारांनी यांचा उपयोग करून घेतला असावा. 


हा किल्‍ला कधी आणि कुणी बांधला, या बाबत वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे संशोधन आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्‍या घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. तसेच ही लेणी राजे वाकटाकचा मंत्री वराहदेव याने इसवी सन पाचव्‍या शतकात खोदल्‍या माहिती आहे. त्‍यामुळे त्‍याच दरम्‍यान हा किल्‍ला बांधला असावा, असा काही इतिहासकारांचा अंदाज आहे. सोळाव्या शतकात ह्या किल्ल्याचा ताबा अहमदनगरच्या निजामाकडे होता तर सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहजहानाने मराठवाड्यातील इतर अनेक किल्ल्यांबरोबरच इथेही कब्जा मिळवला असे म्हटले जाते. नंतर या किल्ल्यावर व प्रदेशावर स्वातंत्र मिळेपर्यन्त हैदराबादच्या निजामाचा अंमल होता. 

मागच्या  वेळी आम्ही ज्या वेताळगडावर गेलो होतो तेथून या जंजाळा किल्ल्याचे दर्शन झाले होते. दुरून देखील हा किल्ला विस्तीर्ण पसरलेला दिसत होता. काही ठिकाणी अजूनही शिल्लक असलेली तटबंदी व काही जुनाट पडलेले  बांधकाम बघता या किल्ल्याची कोणतीही देखभाल व दुरूस्ती झालेली दिसत नाही. किल्ल्यावर एका ठिकानी बरेच मोठे तळे आहे. काही जन त्यात मासे पकडत असतांना दिसले.  तळ्याच्या एका बाजूची भिंत देखील गडा इतकीच जुनी होती... या सारखे अजून दोन तळे किल्ल्यावर आहेत. किल्ल्याची एकंदरीत दुरावस्था आणि  माहितीफलकांचा अभाव पाहता पुरातत्त्व खात्याचे अजूनतरी किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.

घटत्कोच लेणी कडे - हळूहळू आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या तटबंदीकडे पोहचलो. इथे देखील बरोबर तटबंदी कदाचित फोडून वर येण्यासाठी रस्ता बनवलेला दिसत होता. कारण किल्ल्याच्या या शेवटच्या भागापासून जंजाळा गाव जवळच आहे. जवळ म्हणण्यापेक्षा किल्ल्याचा तटबंदीच्या बाजूलाच जणू किल्ल्याचाच एक भाग असल्यासारखे आहे. त्या रस्त्यावरून आम्ही थोडे  पुढे गेलो तर थेट गावातील . नुकतेच काढलेल्या पिकांच्या धसांमधून जाणार्‍या   छोट्या पाऊल वाटेने आम्ही  एक पाठोपाठ चालत होतो. आमच्या  सोबत जरंडी गावातील एक स्थानिक होते. त्यांनी  सांगितल्या   नुसार   

जंजाळा गाव मुस्लिम बहुल आहे आहे व हे मेवाती समाजाचे लोक आहेत. गावातील मोठी मजीद दुरूनच लक्ष वेधून घेत होती. आसपासच्या शेतातून चालत आम्ही आत्ता एका ओढ्याच्या काठी उभे होते.. त्याला वळसा घालून पुढे गेल्यास शेताच्या किनार्‍यावरून दुरूनच लेण्यांच्या प्रवेशद्वाराचे दर्शन होते. 

घटत्कोच लेणी -   जंजाळा किल्ल्याच्या अगदी उलट अनुभव या लेणी जवळ येतो. कारण पुरातत्व खात्याने लेंनींपर्यंत जाण्यासाठी अगदी सुंदर दगडी पायर्‍या केल्या आहेत. किंबहुना या पायर्‍यांवर उभे राहून मागील जंजाळा किल्ला आपल्या फोटोत घेण्याचा मोह आवरत नाही. लेणी जवळ असतांना मध्येच एक  पाण्याचा प्रवाह आपली वाट आडवतो. आम्ही गेलो तेव्हा त्याला फारच कामी पानी होते पण कदाचित पावसाळ्यात काळजी घेऊनच गेलेले बरे. कारण याच पाण्याच्या प्रवाहाचा खाली दगडांमध्ये धबधबा बनतो. पलीकडून आझून एक ओढा वेगाने येऊन त्याच्याही पाण्याचा  धबधबा पावसाळ्यात नक्कीच सुंदर दिसत असेल. अजंठा लेणीची आठवण या ठिकाणी नक्की येते. 

ही घटत्कोच लेणी अजंठा लेणीपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी लहान असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायान पंथीय लेण्यातील ही पहिली व अत्यंत महत्वाची लेणी आहे. पूर्वी येथे असणार्‍या घटत्कोच गावमुळे या लेण्यांना तेच नाव पडले आहे. या लेंनींमध्ये एक विहार आहे. हे विहार चौकोनी असून याला तीन आयताकृती प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वाराच्या समोरच्या भागात सहा अष्टकोणी स्तंभ असून त्यासमोर मोकळा व्हरांडा आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी शेवटी दोन खोल्या कोरलेल्या असून त्यांना आयताकृती प्रवेशद्वार आहेत. डाव्या बाजूस वाकाटक नरेश हरिशेण याचा प्रधान वराहदेव याचा 22 ओळींचा ब्राम्ही लिपीत कोरलेला शिलालेख आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या दोन्ही बाजूस दोन स्रि प्रतिमा कोरलेल्या आहेत. 

या चौकोनी विहारात 20 अष्टकोणी स्तंभ आहेत. पैकी उजव्या बाजूच्या एका स्तंभशीर्षावर मन्नत स्तूप कोरलेला आहे. विहाराच्या अगदी पाठीमागील बाजूस तीन गर्भगृहे आहेत. यातील मधल्या गर्भगृहात बुदधांची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील भव्य मूर्ति आहे. दोन्ही बाजूस उपगर्भगृहे आकाराने लहान असून यामध्ये कोणत्याही मुर्त्या नाहीत. डाव्या बाजूस उपगाभार्‍याला जोडून एक लहान आयताकृती खोली असून याचा उपयोग उपगर्भगृहाशी निगडीत असावा. 

विहाराच्या उजव्या व डाव्या बाजूस ओळीने आयताकृती लहान खोल्या कोरल्या आहेत. डाव्या बाजूस सात लहान खोल्या असून मधली खोली ही दोन भागात विभागली आही ती सर्वात मोठी आहे. उजव्या बाजूस पाच छोट्या खोल्या आहेत. दोन्ही बाजूंच्या मधल्या खोल्यांच्या प्रवेशद्वारांजवळ स्तंभ कोरलेले आहेत. 

आत मध्ये बर्‍यापैकी अंधार आहे. आम्ही पोहचलो तेव्हा मावळतीच्या सूर्याची तिरपी किरणे लेण्यांवर पडल्यामुळे आत थोडाफार उजेड होता पण तरी तो पुरेसा नव्हता. आत कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने सोबत असलेल्या मोबाइलच्या टॉर्च मध्ये बघावे लागत होते. 

या लेणीच्या अगदी विरुद्ध बाजूला व समोरच असलेल्या डोंगरात अजून एका ठिकाणी लेणी कोरलेल्या दिसतात पण तिथे जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळा संपल्यानतर कदाचित खालील दरीत उतरून मग पुन्हा समोरच्या डोंगरावर चदून तिथे जाता येत असावे. पुरातत्व खात्याने त्याही लेण्यांकडे लक्ष पुरविणे आवश्यक वाटते. कदाचित जर एखादा दुर्मिळ शिलालेख सापडला तर प्राचीन भारतातल्या संस्कृतीवर व कलेवर उपयुक्त माहिती मिळू शकते. ते असेच पडू दिले तर कदाचित हा अमूल्य ठेवा नष्ट होऊ शकतो. 

परतीचा रस्ता- सूर्य मावळतीला आलेला होता. डोंगरावरील बाजरी व मकक्याच्या रिकाम्या झालेल्या शेतातून आम्ही मार्ग काढत चालत होतो. जरंडी गावाच्या एका टोकावरुन आम्ही किल्ला चढलो होतो पण आता उतरतांना आम्ही दुसर्‍या टोकाने उतरण्याचा निर्णय घेतला. हा उतार उतरत असतांना पितळखोरा ट्रेक ची आठवण येत होती. तिथे तरी पायर्‍या दिसत होत्या इथे उंच व पिवळसर गवतामधून मार्ग काढत असतांना निसरड्या वाटेची भीती होती.  

उंचावरून अत्यंत विलोभनीय दृश्य दिसत होते. या अजंठा डोंगर रांगातील कोणत्याही उंच ठिकाणावरून पाहिले असता एक बाब लक्षात येते की अनेक पाण्याची तळे, धरणे खाली दिसतात. त्यांच्या बाजूची हिरवीगार शेती. मावळतीचा तांबूस रंग आकाशाच्या निळ्या रंगात मिसळून अनेक रंगाची उधळण झालेली दिसत होती. खाली उतरेपर्यंत चक्क अंधार पडला होता. आजचा दिवस अगदीच दुर्मिळ आनंद देऊन जाणारा होता. 

-  समाधान महाजन