पिढीजात ही श्रीकांत देशमुख सरांची कादंबरी नुकतीच वाचून संपवली. प्रशासनात असलेल्या व येऊ इच्छिणार्या प्रत्येकाने हा दस्ताऐवज एकदा नक्कीच वाचावा. किंबहुना प्रशासकीय अधिकार्यांना प्रशिक्षण देणार्या पुण्याच्या यशदा व नागपूरच्या वनामतीने तर हे पुस्तक त्यांच्या अंतर्गत प्रशिक्षनात वाचण्यास बंधनकारक कराव अस माझ मत आहे. मला समाजासाठी/देशासाठी/गावासाठी काही करायचे आहे अस आयोगाच्या मुलाखतीत बाणेदारपणे सांगून झाल्यावर एकदा प्रशासनाचा तळ व किमान प्लॅटफॉर्म माहीत असण्यासाठी तरी हे पुस्तक वाचने गरजेचे आहे....... एकतर हे माझ्याबाबत घडणार नाही किंवा मी हे सर्व बदलून दाखवेन असे काहीतरी केमिकल तयार होईल.
याचा अर्थ ती प्रशासनाबद्दल आहे असच नाही. उलट सामान्य माणसाला एकूणच राजकारण व प्रशासन या दोन्ही बद्दल असणारे अज्ञान, गैरसमज, गोड समजुती, अकारण उभे केलेले आयडॉल, समाजाबद्दल खोटी आपुलकी असणारे राजकारणी, रोजचा प्रशासनावर असलेला नेमका ताण कसला आहे हे सर्व कळाव यासाठी ती कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे.
महात्मा फुल्यांनी पाहिलेले स्वप्न ‘बहुजन शेतकरी मुले शिकतील त्यांच्या हाती प्रशासन-सत्ता असेल आणि मग ते आपल्या बांधवांच्या कल्याणासाठी काही करतील’ हे सर्व कुठे गेले व त्याचे काय झाले याचा अगदी आडवा-उभा पट पिढीजातचा नायक नवनाथ शेळके याच्या नजरेतून आपल्यापुढे मांडण्यात आला आहे.
2019 मध्ये ही कादंबरी आली. कादंबरीचे लेखक श्रीकांत देशमुख हे राज्यसेवेतून डीडीआर (आता रिजनल जॉइंट डायरेक्टर) असल्याने काही ठिकाणी या कादंबरीचा उल्लेख सहकार क्षेत्र व साखर कारखाने याशी सबंधित असल्याचे वाचण्यात आले होते. मुळात अस समजण हे अत्यंत एकांगी व कादंबरीवर अन्याय करणारे आहे. नवनाथ शेळके हा नायक प्रशासनात डीडीआर या पदावर असतो व साखर कारखान्याचा अवसायक, बँकेचा प्रशासक अशी कामे त्याचा दैनदिन नोकरीचा भाग असतात पण म्हणून पूर्ण कादंबरीच त्यावर आहे अस बिलकुलच नाही.
‘केलेल्या चांगल्या कामाबद्दल संथ, तटस्थ प्रतिक्रिया देण किंवा अजिबात न देण ही प्रशासनातील परंपरा आहे. पण एखाद किरकोळ काम नाही केल तर डोंगर उभा केला जातो’ ...... नवनाथने नोंदविलेले हे निरीक्षण प्रशासनाच्या कोणत्याही खात्याचा अगदी प्रोबेशनरी ट्रेनी ऑफिसर पण सांगेल हे आमचेच अनुभव आहेत म्हणून. महसूल, पोलिस, सहकार, विक्रीकर, विकास, पशूसंवर्धन, कृषि बांधकाम अशा अनेक विभागाबद्दल निरीक्षणे आहेत, नोंदी आहेत व त्या बाहेरच्या नाहीत आतल्या आहेत आणि म्हणून जास्त आपल्या व वास्तव आहेत.
जिल्हाधिकारी म्हणून काम करणारी व्यक्ती, त्या व्यक्ती कोणीही असो पण त्यांचा एकूण काम व अधिकार्याबद्दलचा दृष्टीकोण, त्यातही थेट आयएएस व प्रमोशनने झालेले आयएएस यांच्यातील फरक. मुळात आयएएस म्हणून नॉमिनेशन व्हावे यासाठी व त्याआधी सबंधितांनी केलेलं ‘प्रयत्न’. बर प्रमोशन झाल्यानंतर एकूणच व्यक्तिमत्वात झालेले 180 डिग्रीचे बदल. नॉन मराठी अधिकार्यांची मराठीची लकब. महसूलमध्ये कायमच मंत्री व मोठ्या अधिकार्यांसाठी लागणारे प्रोटोकॉल, ‘सांग्रसंगीत’ दौरे त्यांची व्यवस्था. प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कायम सवयीचे असणारे व ते प्रकरण न पेलवणारे असे दोन्ही प्रकार. मंत्री व आमदार म्हणून समाजात मोठे नाव व स्थान असतांना प्रत्यक्षात जनतेला चुना लावणारे. पोलिस प्रशासन, बांधकाम व सिंचन विभागातील अधिकारी त्यांच्या व इतर सर्वांच्या पोस्टिंग, बदली, प्रमोशन, नॉमिनेशन यातील सर्व तथाकथित घडामोडी अगदी कोणताही आव न आनता, कथनकाचा एक भाग म्हणून येतात किंबहुना या सर्वांच डिटेलिंग कादंबरीचा पट व आशय अधिक व्यापक होत सर्वसमावेशक करतो.
कृषि व सहकार मधील खरा लाभार्थी शेतकरी असतांना नेमका तोच या व्यवस्थेच्या परिघाबाहेर कायमच त्याच्या दीनवाण्या अवस्थेत उभा राहतो तेव्हा रूढार्थाने ज्याला आपण ‘सिस्टिम’ म्हणतो ती नेमकी काय आहे हे लेखक आपल्यापुढे मांडतो व जणू म्हणतो ‘हे पहा हे खर अस आहे’
अधिकारी जमातीचे अनेक प्रकार यात आहेत. पुस्तके घ्यायला पैसे नसणारा अधिकारी झाल्याच्या काही वर्षात किती भंपकपणे ओळख पण दाखवत नाही. घरी जेऊनखाऊन गेलेला व्यक्ती त्याच्या केबिनमध्ये गेल्यावर बस पण म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिवसातून दहा वेळा घेत काम करणारे अगदी त्यांच्या विचारांच्या विपरीत वागतात. अशा सर्व घटना नवनाथ पावलोपावली अनुभवतो.
या कादंबरीची एक महत्वाची बाजू म्हणजे प्रशासनातील आतापर्यंत झाकल्या गेलेल्या अर्थात कोणीही न मांडलेल्या गुंतागुंतीच्या पण तितक्याच महत्वाच्या असणार्या अनेक बाबी पहिल्यांदाच मराठी कादंबरी मध्ये इतक्या थेट व धीट पणे येत आहेत. खरे म्हणजे पिढीजात ही कादंबरी प्रशासनाची बखर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पिढीजात ही कादंबरी फक्त प्रशासनच नव्हे तर राजकारण व त्याही पुढे जाऊन समाज व जात कारणावर पण तितकेच दमदार भाष्य करते. फुले-शाहू-आंबेडकर-कर्वे-महर्षि शिंदे यांच्या विचारांना वर्तमानावर घासून पुसून घेत असतांनाच कर्झन व ब्रिटिशांची नीती तसेच स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण, विखे पाटील, गडाख यांची सामान्य शेतकरी प्रती असलेली बांधिलकी देखील विचारात घेत ही कादंबरी वर्तमान व्यवस्थेचे एक भेदक रूप आपल्या समोर आरशा सारखे उभे करते.
‘...बाबासाहेबांनी गांधीजींचा प्रतिवाद केला, द्वेष नाही केला. आणि आज गांधीजींना शिव्या दिल्याशिवाय आपल्याला बाबासाहेब मोठा वाटत नाही हे दुर्दैव आहे.’ ‘..... गांधीजींच्या अंत्ययात्रेतही बाबासाहेब पायी चालत गेले, हे किती दलितांना ठाऊक आहे?’
या ओळींचे विवेचन कळण्यासाठी व त्या मागची भूमिका समजण्यासाठी कादंबरी वाचन महत्वाचे आहे.
अलीकडे जात पुन्हा एकदा सगळीकडे मुसंडी मारून वर आलेली आहे. पण प्रशासनातील जात-वास्तव तुम्ही पहिल्यांदा येथे वाचाल तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काही स्वार्थी काम करून घेण्यासाठी जातीचे कार्ड पुढे करणारे लोक यात आहेत. जातीच्या आधारावर प्रशासकीय अधिकार्यांना एकत्रित करण्यास आलेल्या एका जातीय गटाला नवनाथ शेळके जे विवेचन करतो ते किंवा ठाकरे नावच्या मित्राशी त्याचे जे संवाद वा चर्चा होत राहतात ते किंवा नवनाथ स्वतःशीच जो विचार करत राहतो ते अशा अनेक ठिकाणी समाज-जात यावर वास्तव व बुद्धीवादी भाष्य यात आहे.
एका ठिकाणी आलेल्या ओळी अशा आहेत-
.... “मारवाडी मंत्र्याचा पीएस मारवाडी, दलित मंत्र्याचा दलित, आदिवासी मंत्र्याचा आदिवासी किंबहुना मराठा मंत्र्याचा पीएस मराठा असणे हे जातीव्यवस्थेच प्रशासकीय व्यवस्थेतल नव रूप, त्याला तोडता नाही येणार. त्याला बांध नाही घालता येणार. प्रवाह अडवता येईल, सूक्ष्म झर्यांना कस आडवणार?”
महसूलभिमुख वा डॉमीनेटिंग असलेल्या प्रशासनाचा चेहरा बदलण्यासाठी सर्व सेवा समावेशक एक महाराष्ट्र कॅडर तयार करण्याची गरज असल्याचेही लेखक एक ठिकाणी बोलून दाखवतो. अपेक्षाभंगाने वा त्रासाने प्रशासनातून बाहेर पडणार्या मंडळींवर लिहितांनाच.... स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या विश्वावर देखील तो भाष्य करतो.
पुस्तक एकूण तीन प्रकरणात असले तरी ते एकमेकांशी जोडलेले आहेत. पहिल्या भागाची रचना एकूण सहकार विभाग, त्यांचे कामकाज व इतर विभागाशी येणारे संबंध एकूण चांगले वाईट लोक अशा सर्वांवर आहे, दुसऱ्या विभागात मुंबईचे व मंत्रालयाचे विविध अनुभव व किस्से आहेत. तिसरा भाग शेवटचा. लेखकाचे मुळात कवी असण्याच्या खुणा कादंबरीत मध्ये जाणवतात पण तेव्हढयाच पुरत्या.
अशा अनेक बाबी जुन्यांना उजळणी व नव्यांना मुळाक्षरे शिकविण्यासारख्या आहेत. इतक्या सर्व अस्ताव्यस्त पसरलेल्या पसार्यात नवनाथ स्वतःला मांडताना जेव्हा म्हणतो, “मी एक साधा सरळ माणूस आहे. फार डिप्लोमेटिकली जगणं मला नको वाटते, माझे काही मर्यादित इंटरेस्ट या नोकरीत अडकलेले आहेत म्हणून मी माझ संपूर्ण स्वत्व गहाण ठेवावे अस मला वाटत नाही.” ही त्याची भूमिका पण पटत जाते.
एकूणच नेहमीपेक्षा काही वेगळे वाचायचे असल्यास नक्की हे पुस्तक वाचा.
....
- समाधान महाजन
(01/08/2020)