पहिल्या सीरिज मध्ये गणेश गायतोंडेचे वाढते प्रस्थ दिसते. "बिच्छु है अपुन की कहानी, चिपक गई है आपको" हे तो जे स्वतः बद्दल सांगतो ते खर असल्यासारख आपण त्यात अटकुन पडतो त्यामुळे दुसऱ्या सीरिज मध्ये गायतोंडे बद्दलच पुढच्या घटना असतील असे वाटत असतांनाच हळूहळु गणेश गायतोंडे एका मोठ्या व्यापक कथेच्या प्लॉट मधील एक पात्र आहे अस जाणवायला लागते. नदीत ऐटबाज पणे चालणारी गायतोंडे ची नाव समुद्रातील मोठमोठ्या जहाजांमध्ये अगदीच केविलवाणी वाटायला लागते. पहिल्या भागातील घट्ट व गोळीबंद वाटत जाणारी कथा या दुसऱ्या सीरिज मध्ये काहीशी संथ व विसविशित वाटायला लागते. आपण त्याही प्रवाहाशी रिलेट होत असतांनाच अचानक ती संपते.
पण तरी देखील अनुराग कश्यप व् विक्रमादित्य मोटवाने यांच्या दिग्दर्शनाची पकड़ इतकी घट्ट आहे की, शेवटपर्यंत सीरिज बघत रहाविशी वाटते. भारतातील आतापर्यंत आलेल्या नेटसीरिज पैकी ज्या काही सीरिज उत्कृष्ट असतील त्यात सेक्रेड गेम्स आहे हे नक्की.
कथा पटकथेचा विचार केला तर जो प्लॉट अनुराग व आदि मंडळींनी निवडला आहे (अर्थात विक्रम चंद्राच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हि सीरिज आहे) तो अप्रतिम आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील त्यातही १९७५ नंतरच्या काही घटना व विशेषतः ९० च्या पीढ़ीतील काही घटनांवर यात फ़ोकस केलेला जाणवतो. माझ्या वयातील पीढ़ी जी या काळात मोठी होत होती, नुकतेच वर्तमानपत्र वाचू लागली होती व सॅटेलाइट व केबल टिव्हीला सरावत होत त्या काळातिल अनेक घटनांचे पडसाद या सर्व भागात उमटलेले दिसतात. टायटल सॉंग मधील काही दृश्य व अनेक संवाद तो काळ आपल्यापुढे उभे करतात. राजीव गांधी, बाबरी मजीद, हिंदू-मुस्लिम दंगे, बॉम्बस्फोट ते पार या काळात चर्चेत असलेल्या मॉबलीचिंग पर्यन्तच्या अनेक घटनांचे पदर मुख्य कथेला जोडले गेले आहेत.
धर्म राजकारण व गुन्हेगारी हा बदनाम ट्रँगलl इथेही दाखवतांना पात्र जे म्हणतात ते डायलोग्ज लोकांच्या तोंडी सहज बसले.
"दुनिया के बाजार में सबसे बडा धंदा है धर्म" किंवा "हिन्दुस्थान जब हिन्दुस्थान नहीं बना था तब से पोलिटिक्स की मच्छी को धर्म के तेल में फ़्राय करते हुए आय है"
भारत पाकिस्तान या देशातील पारंपरिक द्वेष दाखवत असतांनाच त्याला जोडून आलेले अंतरराष्ट्रीय धागेदोरे वापरलेले दिसतात. ओसामा - ट्विन टॉवर यांचे उल्लेख येतात. अर्थात ते अजुन एकत्र करता आले असते पण अनुरागच्या गुलाल मधील "जैसे बिना बात अफगानिस्थान का बज गया भइयो बैंड , जैसे सरे आम इराक में जाके बस गये अंकल सैम" या गाण्यातील ओळी ज्या प्रतीकात्मक पद्धतिने येतात त्याचप्रमाने ते इथेही येतात.
वास्तविक व्यक्तिशी जूळनारी पात्रे या दोन्ही सीरिज मध्ये अनेक आहेत. गणेश गायतोंडे पासून इसा म्हणजे दावूद का? धार्मिक गुरु पंकज त्रिपाठी म्हणजे ओशो का? होम मिनिस्टर नक्की कोण,?परुलकर चे पात्र कोणाशी साम्य दाखवते इथपासून अनेक चर्चा हि सिरीज पाहणाऱ्या मंडळींच्या झाल्या आहेत त्यावर अगदी पैजा लावून पण झाल्या आहेत. पण एक नक्की की वास्तविक घटनांतील अनेक पात्रांचा वापर या सीरिज मध्ये आहे. बऱ्याचदा तीन चार वास्तविक character मिळून एक पडद्यावरचे पात्र तयार करण्यात आले आहे असे जाणवते.
दूसरी सीरिज जी आता रिलीज झाली ती अधिक फिलोसोफीकल झाली आहे. किंबहुना तशी दाखवण्यात आली आहे. गणेश गायतोंडे सारखा एक क्रूर गुंड एकदम गुरुजीच्या आश्रमात अहम ब्रम्हास्मी म्हणत असल्याचे पाहने एंटरटेनिंग तितकेच वैचारिक पातळीवर १८० अंशाच्या कोनातून फिरल्यासरखे वाटते. पण ज्या लोकांनी ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टसन ची शांताराम हि कादंबरी वाचली असेल त्यांना ते फार काही वेगळे वाटणार नाही. त्यातही अंतरराष्ट्रीय गुन्हेगार असणार्या शांताराम चा प्रवास अध्यात्माकड़े वळतांना दिसतो. फार लांब कशाला कमलेश वालावरकर यांच्या बाकी शून्य कादंबरीतील नायकाचा प्रवास शेवट अध्यात्मकडेच वळलेला दिसतो. दुनिया के बाजार में सबसे बडा धंदा है धर्म असे सांगत या सिरीज मधील धर्माचे नेक्सेस जबरदस्त दाखवले आहेत.
सेक्रेड गेम्स ची स्री पात्रांच्या आपआपल्या वाटा आहेत. जोजो, कुक्कू, गणेश ची बायको, अमृता सुभाष ते राधिका आपटे प्रत्येक पात्र यूनिक आहे. "अगर मर्द फिल्ड पे काम करना चाहे तो पॅशन और औरत करना चाहे तो भुत" अशी फिलोसोफी घेउन वावरनारी राधिका आपटे पहिल्या सीरिज मध्ये लक्षात राहून जाते.
या सम्पूर्ण सीरिजमध्ये मराठी कलाकार आपला ठसा उमटवून जातात. राधिका आपटे पहिल्या सीरिजमध्ये संपली असली तर दुसर्या सीरिज मध्ये आलेली अमृता सुभाष त्याहून हि सुंदर अभिनय करून भाव खावुन जाते. जितेन्द्र जोशिचे अकाली जाणे मनाला चटका लावून जाते. गिरीश कुलकर्णी नेहमीप्रमाने दमदार. अनुराग च्या अग्ली मध्ये या आधी त्याने काम केलेले होते त्याहीपेक्षा अधिक मोकळा तो या ठिकाणी वाटला. अमेय वाघ काहीच मिनिट पण ताकदवान वाटतो, त्याला अजून थोडा वेळ मिळाला असता तर चांगलं वाटलं असत.
दोन्ही सिरीज मधील नॉन सेन्सॉर शिवराळ भाषा व न्यूड सीन्स वर काहींचा आक्षेप असला तरी एकूण सिरीज एक हायर intellectual लेव्हल वर आहे. "अगर भगवान नहीं होता तो आदमी के अंदर भगवान का आयडिया किधर से आता" यासारखे अनेक लक्षात राहणारे संवाद व वाक्य या सिरीज ची ताकद आहे. अतापी वतापी सारखी अनेक पौराणिक नावे सिरीज च्या पार्टस ला देण्यात आली आहेत. एकूणच सेक्रेड गेम्स बघणं तुमची बौद्धिक भूक भागवू शकते.
- समाधान महाजन