प्रेरणा मंच या नावाने तरवाडे या माझ्या गावात एक ग्रुप आम्ही स्थापन केला साधारणतः तीन चार वर्षांपूर्वी. तेव्हा आम्ही वाचनालयाची स्थापना केली. वृत्तपत्र सुरु केलीत. काही मासिके मागवली. हे सर्व काही दिवस जोमात सुरु होते नंतर ते स्लो झाले. त्या वेळी आमचे टार्गेट होते गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा.
अर्थात हे असे वाटायला कारण होते ते म्हणजे मी स्वतः राज्यात इकडे तिकडे फिरत होतो. ठिकठिकाणी माझा सत्कार होत होता किंवा मी कोणाचातरी सत्कार करत होतो. गेल्या दिवाळीत शेजारील कुंझर व पोहोरे गावात मुख्य अतिथी म्हणून मला बोलावण्यात आले होते त्या कार्यक्रमास आमच्या तरवाड्यातील काही युवक उपस्थित होते त्यांनी त्या कार्यक्रमानंतर ध्यासच घेतला कि जर बाजूच्या गावांमध्ये असा कार्यक्रम होत असेल तर आपल्याकडे का नाही?
पण ज्यावेळी मी गावातील युवकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले कि कदाचित माझा फोकस ग्रुप किंवा माझे टार्गेट चुकत आहे कारण म्हणावा तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडून येत नव्हता अर्थात त्याच्या मुळाशी असलेल्या अनेक कारणांचा शोध मला नंतर लागला.
मग आम्ही आमचा फोकस बदलवत शालेय वयातील मुलांवर स्थिर केला. त्याचवेळेस गावातील वाचनालयासाठी एक पर्मनंट जागा पण आम्हाला मिळाली. त्या वास्तूला रंग वैगेरे देऊन तिथे लाईट ची पण व्यवस्था करण्यात आली.
आता आमच्या प्रेरणा मंच च्या सदस्यांची इच्छा होती कि लोकांसाठी पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर काही कार्यक्रम झाला पाहिजे जो कि अजूनपर्यंत गावात झाला नसेल. मग तशा पद्धतीचे नियोजन करून 27 फेब्रुवारी ला कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली.
गावातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात होतो कि जो लोकांना लोकांच्याच भाषेत समजावू शकेल, त्यांच्या मनापर्यंत पोहचू शकेल. मग सर्व मिळून जळगावच्या दीपस्तंभ चे यजुर्वेनद्र महाजन यांचे नाव फिक्स केले व दुसरे म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची अधिकारी मंडळी कशी असतात व त्यांनी कसे यश मिळवले तेही समजण्यासाठी काही अधिकारी मित्रांना बोलवायचे ठरले, त्याप्रमाणे श्री. ईश्वर कातकडे(dy.sp.पाचोरा), श्री राघवेंद्र घोरपडे( Bdo, धुळे), श्री. हेमंत भदाणे( CDPO,धुळे) यांना आमंत्रित करण्यात आले.
कार्यक्रमात माझे प्रास्ताविक व अधिकाऱ्यांचे मनोगत झाल्यानंतर यजुवेंद्र यांच्या हाती जेव्हापासून माईक गेला तेव्हापासून वातावरणात एक सळसळत चैतन्य आले, थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भाषेत बोलण्याच्या यजुर्वेनद्र यांच्या शैलीला विद्यार्थी व गावकरयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याच कार्यक्रमात त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावकरयांनी तब्बल एक लाखाची देणगी जाहीर केली हे खऱ्या अर्थाने लाखमोलाचे काम होते.
या कार्यक्रमाचा प्रतिसाद खऱ्या अर्थाने दुसऱया दिवशी कळला. सध्या जी जागा वाचनालयाची होती ती इतकी फुल भरली कि नंतर आलेली मुले चक्क बाहेर बसून अभ्यास करायला लागली. त्यांना नंतर यायला सांगितले तरी ती उठली नाहीत.
हि सुरु झालेली एक प्रकारची शैक्षणिक क्रांती आता थांबू नये मध्येच बंद पडू नये, यासाठी लागते सातत्य व कार्यकर्ते. प्रेरणा मंच चे सदस्य आता स्वतः च इतके प्रेरित झाले आहेत कि नक्कीच हि चळवळ ते यशस्वी करतील.


