दो लफ़्जो कि है दिल कि कहानी......

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjf4M-hju7YAhVHXrwKHZ9rCPoQ3ywIKDAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DwaeAGdCvJd8&usg=AOvVaw0l4vv4Ii5PNv1PtFsniK8Uदो लफ़्जो कि है,दिल कि कहाणी,
या है मोहोबत या है जवानी।  .................

रात्रीची वेळ,स्टॉप आल्यावर बसने स्वतः च्या गर्दीतून अक्षरशः खाली लोटून स्वतः च एक उसासा टाकून निघून गेली. खाली उतरताच जाणवला तो मिट्ट अंधार.एरवी लाईट कुठंतरी चमकतोच पण आज कुठंच नाही , चालतांना एक दोनदा पाय
डबक्यात जाऊन ओला झालो. बेमोसमी पावसानं शहराला झोडपून काढलेल्याचा परिणाम अंधार सर्वत्र पसरला होता.
सवयीचा रस्ता व वळण असली तरी अंधारात नेमकं चालावं कुठं ते लक्षात येत नव्हतं , आकाशात वाऱ्याने पळणाऱ्या ढगांमधून मध्येच कुठंतरी चांदण्यांचा उजेड चमकून जाई, पावसाने गारठलेल्या कुत्र्यांचा रडण्याचा आवाज,पुन्हा
शांतता, पुन्हा अंधार........
अशावेळी कायच्या काय आठवत राहत.

* * * * * * *
अंधारगच्च पडदयावर लख्खकन ..व्हेनिसच्या कालव्यातून जाणाऱ्या बोटीत बसलेले अमिताभ व झिनत-
"ये कश्तीवाला क्या गा रहा था, कोई इसे भी याद आ रहा था" अस गाणं दिसायला लागलं. म्हणजे असच कॉलेज च कुठलं तरी वर्ष असेल, पैसे संपले, रूम सोडलि, मित्राच्या घरी मुक्काम,मित्र पुण्याला. एकुलत्या एक मुलाचा मित्र म्हणून
सर्व सामानासहित माझी रवानगी हॉल मध्ये , पुस्तक पोत्यात बंदच होते, समोर भला मोठा टीव्ही तोही रंगीत,कसाबसा खटपटून सुरु केला.इतक्या मोठ्या स्क्रीनवरच रंगीत चित्र प्रथमच पाहत होतो,छोट्याशा डब्यावर काळं पांढर पाहण्याची सवय असलेल्या डोळ्यांना रंगावर स्थिरावण्यास वेळ लागला.
थकवा,उत्सुकता,नवं घर, वय, वेगळेच वास, वेगळ्याच वस्तू साऱ्यांची समिश्रता खोलीभर पसरली असतांनाच स्क्रीनवर झिनत अमिताभ च 'दो लफ़्जो कि है दिल कि कहाणी' अशाच्या आवाजात ऐकत असतांनाच डोळ्यात दाटून आलेली झोप-
खोलीभर व्हेनिस चा कालवा व मी त्या वातावरणाचा एक भाग बनत असतांना - कदाचित टीव्ही रात्रभर सुरु राहिला, दुसऱ्या दिवशी सकाळीच अनेक कारणांचा गोड दाखला ऐकत हेही घर सोडावं लागलं, नंतर राहिलो असेल कुठं बरेच दिवस इकडं तिकडं आठवत नाही, पण ते गाणं, ती झिनत, तो अमिताभ, ते व्हेनिस व आशा विसरलो नाही.
कसा विसरेल? रात्रभर टीव्ही सुरु राहण्यापायी घर,मित्र,नात
सार दुरावल होत.

* * * * * *

तर मग अस ते गाणं आज ओठांवर आलं,भर अंधारात,चालत चालत आता घर जवळ आलं होत, नाल्यावरचा पूल पार केला. दूरवरून थोड्या काळपट उजेडात ते भव्य वडाच
झाड चमकल, मग मागचं ते जुनाट मंदिर, त्यातील मिनमीनता दिवा.कमालाय इतक्या वादळात,कोणी लावला असेल परत? नाल्याचे पाणी एरवी काळेजर्द,असंख्य जीवजंतू सारखे खालीवर करत राहतात त्यांचा एक नरकच वाटत असतो .त्याचा एक वेगळाच घाण वास परिसरात पसरलेला असतो  तो वास नाकासोबत जीवनाचाही भाग झालेला. हा
वड,नाला,हे मन्दिर, हा वास या सर्वांचा मी भाग आहे वर्षानुवर्षे अस वाटत राहत,अनेकदा ...वाटायला काय काहीही वाटत.

' दिल कि बातों का मतलब न पूछो
  कुछ और हमसे बस अब न पूछो '

काळेभोर केसं कपाळावरून सावरत,सुंदर डोळे,पांढऱ्या पिवळ्या फुलांचा टॉप घातलेली झिनत , निळे पाणी व खोल डोळ्यात खोलवर भाव दिसणारा अमिताभ. अस चित्र डोळ्यापुढं उभं राहत असतांनाच दरवाजाजवळ पोहचलो, किल्ली घेऊन कुलूप चाचपडल पण ते हाताला लागलच नाही,वरती हात करून कडी काढली अन आत पडलेलं
पहिलं पाऊल पोटरी पर्यंतच्या पाण्यात गेलं,दुसरा पाय आत घेऊन रूम मधील पाण्याच्या पातळीत उभा राहिलो. हे काय कस झालं काहीच कळत नव्हतं. खालची गादी, सर्व सामान, सर्व पुस्तकं, मासिकं, पेपर, कपडे व एकूण एक वस्तू या पाण्यात तरंगत असावी याचा अंदाज आला,अरे अस काय म्हणून मान वर केली तर  वरच्या पत्रया ऐवजी वरच आभाळच एकदम खोलीत आलं त्या सोबत मध्येच
चमकणाऱ्या चांदण्या दिसू लागल्या व  हळूहळू डोळ्यात पाणी पसरून उद्विग्नता आली,यश-अपयशाच्या चक्रातून आधीच सुटका नसतांना रुसो कांट हेगेल मार्क्स सहित सारे विचारवंत पाण्यात तरंगत होते  रोमिला थापर ,बाशम
सहित सर्व इतिहास हि पाण्यात होता, हे खूप मोठं नुकसान होत हि अपयशाच्या साखळीची अजून एक कडी होती जी माझ्या हातात नव्हती,मी बसायला माझी एकुलती एक खुर्ची शोधत असतांना  परत अडखळून जोरात वर  पुढच्या ओळी आल्या,

"इस जिंदगी के दिन कितने कम है
कितनी है खुशियाँ और कितने गम है"

आता हे गाणंच नको होतं, आता यातलं कोणीच नको होतं,
तू रहा बाई अमितसोबत त्या सुंदर लोकेशन वर असंही या फालतू पत्रे उडून गेलेल्या रुम मध्ये येऊन तू काय करशील? आणि असंही love cant divide at
single time so buy...
इथल्या अपयशाच्या भिंतींवर विजयाची सोनेरी अक्षर कोरण्याचा इतिहास अजून बाकीय ,  तो तर मी लिहिणारच आहे तोवर कैकपटीने सहन करण्याची ताकद हा अंधारच मला देईल.

                                                       - समाधान महाजन

                                                         # लिटररी नोंदी #