नोंदी दोन

# लिटररी नोंदी # दोन

दोन तीन दिवसांचा ताप उतरणीला  लागल्यानंतरची रात्र, सततच्या गोळ्यांनी  आलेला बराचसा  अशक्तपणा, सर्वांगाला घाम येऊन थंड पण येत असतांनाच आतून आद्रमय झाल्याची  जाणीव, मंद दिवे.....बाहेर आतापर्यंत काहीही नसतांना एकदमच बेमोसमी पावसाची सुरुवात झालेली, कदाचित असेल  वातावरण तसे बाहेर सकाळपासून ...पुलकित झालेल्या  मातीचा गंध जाणवतोय , मग जागेवरच बसून बाहेरच्या बाजूचे  दृश्य डोळ्यापुढे तरळत  राहत, ओलगच्च झालेले समोरच मैदान , चिंब होऊन पडलेले कोरड गवत, त्यातून भिजत  जाणारी  पायवाट , तावदांनावरून गळणार पाणी, झाडांमधून टपटपनारे चुकार थेंब ...तिसऱ्या प्रहरातील कुठलातरी प्रहर ...डोळे  सताड उघडे.
मग हळूहळू दिवस उजाडेल,रात्रभर तसा कुठलाही पाऊस पडलाच नाही अस सांगणार वातावरण,हळूहळू वर चढत जाणारा सूर्य,हलकस झालेला देह गोळा करून धडपडत उभं राहून दिवसाला सामोरा जात असलेला मी,

मग हि रात्र व त्यानंतर उगवणारा दिवस कुठलाही असेल ,

एकदम नववीतून -दहावीत गेलेल्याला एक दीड महिना झालेला असतांना ऐन उन्हाळाच्या शेवटच्या दिवसात मातीला डोळ्यासमोर पार अस्तव्यस्त करून चिरडत जाणारा रात्रभरचा निर्दयी पाऊस व सकाळी सकाळी शाळेच्या व्हऱ्यांड्यात चहाच्या लाईनीत मगा घेऊन सर्व कोलाहलात अत्यन्त एकटेपणाने उभा असलेला मी.
किंवा
कॉलेज चा प्रतिनिधी म्हणून कुठल्याशा लांबच्या गावाला डिबेटिंग कॉम्पिटिशनसाठी आलेलो असतांना ज्या मंडपात सकाळी स्पर्धा होणारेय त्या मंडपाची वादळामुळे होणारी वाताहत पाहत खिडकीत जागा असलेला मी.
किंवा
मुलाखतीची आदली रात्र व नंतरची सकाळ ...ठाणे,कल्याण,कुर्ला किंवा दादर यापैक्की कुठलेही एक स्टेशन.मुंबईच्या पावसाळा पूर्वीच्या उकाड्याची सकाळ, कधीही सुरु होईल अस तुडुंब भरलेलं आभाळ. धूर-धुकं-दमट हवा-घाम-चिकचीक-न येणारा पाऊस-कानाजवळ मध्येच घूं करणारं चिलट-गर्दीन गच्च स्टेशन व तितकीच गच्च भरलेली लोकल फलाटावर येतांना, माझ्यासकट हातातील फाइल सांभाळताना मी.
किंवा
अशाच अनेक रात्रींची पहाट

                                                                       # समाधान महाजन #
                                                               लिटररी नोंद # दोन

नोंदी एक

दैनंदिन जीवनातील अत्युच्च कोलाहल, त्रास, संकट आवश्यक, अनावश्यक ,महत्वाची ,अत्यंत बिनमहत्वाची सर्व कार्य व काम विसरायला लावून धातूच्या तप्त प्रवाहासारखा वाहत जाणारा हा मनोरस एकाच खांबावर अक्खा तंबू तोलल्यासारखा कोणतीही बाब (जी एरवी कदाचित म्हणजे कदाचित क्षुल्लक वाटावी) का इतकी डोक्यावर उचलून घेतो?
अशा वेळी चक्क वर्तमान व भूतकाळातील अनेक दिवस छेडणारी भूत चक्क गायब होऊन जातात , अन हे एकच येऊन बसते मानगुटीवर स्वतः चे उत्तर मागत तेव्हा जीवनातील सर्व कार्य जणू शून्यवत होऊन माझ्यासकट सारी सृष्टी अशे एकच उत्तर शोधण्यामागे स्वतः ला वाहून घेते काही काळ.
मग या नव्या त्रासाचे रेकॉर्ड गायब होऊन जाते कालांतराने फाईलींमधून -  मग मंगळावर ओघळ पडलेल्या रेषा या पाण्याच्याच होत्या हे सिद्ध करण्यात शास्रज्ञामध्ये अहमीका लागावी तसे कालांतराने पुन्हा दुसरा प्रश्न पडला कि स्वतः लाच हे व्रण पटवून देण्याचा पुन्हा एकदा मन आटोकाट प्रयत्न करते,पण ते प्रयत्नच असतात.
पुन्हा असा एखाद्या प्रश्नाने तापलेला मनोरस कधी स्वतः चा मनो शारीरिक उत्कलनांक बिंदू वाढवेल याची शाश्वती स्वतः ला हि नसते...

       लिटररी नोंदी # 1