... तर श्वास म्हणजे फक्त तडफड राहिली असती !
समाधान महाजन | Update - Feb 22, 2015, 12:34 AM IST
जसजसं कवितेच्या खोलात जायला लागलो तसा स्वत:चा शोध लागत गेला. स्वत:च्या विचारांची, अनुभवांची मुळं शोधत गेलो. लिहिता लिहिता स्व-जाणिवेचा शोध घेण्याची प्रक्रिया कधी जाणीवपूर्वक, तर कधी नकळत घडत गेली.
अस्वस्थ विचारांना वाट मोकळी करून देण्याची ताकद कवितेत आहे. कविता लिहिणे, ही मनाची गरज आहे. मी का लिहितो, किंबहुना मी अभिव्यक्त होण्यासाठी कवितेचाच आधार का घेतो, याचे कारण कवितेच्या ठायी असणारी कमी शब्दांतील ताकद. अत्यंत मोजक्या आेळींत आणि शब्दांत कविता माणसाला अपेक्षित उंचीवर घेऊन जाते.जिंतूरला असताना इंद्रजित भालेराव सरांच्या सहवासातून कवितेची वाटचाल सुरू झाली. शेतीचे, पाण्याचे, मळ्याचे चित्र उभे करताना ना. धों. महानोरांच्या नादमयी शब्दांतून होणारा धूसर अर्थबोध वेड लावून जायचा. पण जसजसं कवितेच्या खोलात जायला लागलो, तसा स्वत:चा शोध लागत गेला. स्वत:च्या विचारांची, अनुभवांची मुळं शोधत गेलो. लिहिता लिहिता स्व-जाणिवेचा शोध घेण्याची प्रक्रिया कधी जाणीवपूर्वक, तर कधी नकळत घडत गेली.दहावीपर्यंतचे शिक्षण नवोदयमध्ये झाल्यामुळे वाचनाचे विपुल भांडार तेथे उपलब्ध होते. याचा खूप फायदा झाला. वाचनामुळे विचारी व चिंतनशील स्वभाव घडत गेला, विश्लेषणाची आवड निर्माण झाली. वाढत्या वयात जगाविषयी, समाजविषयी, नातेसंबंधाविषयी निर्माण होणारे कुतूहल व पडणारे प्रश्न यांची बरीचशी उत्तरे पुस्तकांतून शोधण्याचा छंद लागला. त्यामुळे कधीकधी छोट्या प्रश्नांना फार मोठी व वैविध्यपूर्ण अशी उत्तरे मिळत गेली.मी जे वाचत होतो, त्या पुस्तकांमधून मला माझ्या अनुभवांशी समरस होणारे लिखाण कमी सापडायचे. याचा शोध घेत गेलो, तेव्हा असं लक्षात आलं की, माझं बालपण वडलांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांमुळे एकाच जागी गेलेलं नव्हतं. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील तरवाडे या माझ्या मूळ गावी जाण्याचा योग पार कळतं सवरतं झाल्यावर आला. ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांतील साखुरसारखी छोटी वस्ती असो की सातपुड्याच्या नंदुरबारमधील मांडवीसारख्या दुर्गम भागातील आश्रमशाळा असो, अक्कलकुवा ते मुक्ताईनगर हा पर्वताच्या पायथ्याखालील पट्टा किंवा मराठावाड्यातील जिंतुरसारखे मैदानावर वसलेले शहर असो, की मुंबई, दिल्लीसारखी महानगरे; या सर्व ठिकाणी या-ना त्या कारणास्तव केलेल्या वास्तव्यामुळे विविध व्यक्ती, भाषेचा बदलता लहेजा, विविध भौगोलिक-सामाजिक वातावरण, सामाजिक बदल, प्रवासादरम्यानचे विविध अनुभव यांमुळे असंख्य घटनांचा एक कॅलिडोस्कोप मनात तयार झाला होता. असंख्य प्रतिमा ज्या एकापेक्षा वेगळ्या पार्श्वभूमीवरच्या होत्या, अशा असंख्य कटू-गोड आठवणींचे जाळे विणले गेले होते. जीवन जगण्यातील विरोधाभास डोक्यात विचारांचे काहूर माजवत होता. मेट्रो शहरातील रात्रभर तळपणारे एलईडी जाहिरात फलक, दिव्यांची आरास, आकाशातील रोषणाई व जिथे साध्या एका पिवळ्या बल्बचा प्रकाशही पुरेसा वाटावा, अशी अंधारात बुडालेली गावेच्या गावे, तेथील घटना, घडामोडी एका वेगळ्या पद्धतीने माझ्या कवितेत येऊ पाहत होत्या.सर्व माझं वाटत असतानाच, परत माझं कोणीच नाही, या असुरक्षिततेच्या भावनेला खऱ्या अर्थाने पदरात घेतलं असेल तर ते कवितेनेच. मग एकाच वेळी रोजीरोटीचा प्रश्न सोडवत असताना, स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असताना वाचनाची तहान तर प्रचंड होती; परंतु वेळेअभावी मोठमोठी पुस्तके वाचणं व गद्यात्मक लिहिणं शक्य नसतानाच्या काळात कवितेच्या रूपाने मी अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न केला. मग एकाच वेळी शिक्षकाची नाेकरी, कौटुंबिक जबाबदारी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, त्यातील यश-अपयश पचवत असताना कविता पचवणंही सुरू होतं. ग्रेसच्या ‘संध्याकाळच्या कविता’ यू.पी.एस.सी.च्या अभ्यासक्रमात होत्या. ज्या दिवशी ते पुस्तक हाती आलं, त्यानंतर किती तरी दिवस ग्रेसने मनाचा ताबा घेतला. मग त्यासोबतच ग्रेसचे सर्व कवितासंग्रह, ललित ते पार समीक्षा सारं वाचून संपवलं. दि. पु. चित्रे, नामदेव ढसाळ व नारायण सुर्वे यांच्या कविता, विजय तेंडुलकरांची नाटके यांनी मेंदूतील अनेक कवाडे उघडत गेली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या घरीच निवांतपणे भेटण्याचा योग आला. त्यांचा प्रत्यक्ष सहवास भारावून टाकणारा होता. कोसला ते हिंदू यातील अगदी स्थळ, काळ व व्यक्तींसहित चर्चा झालीच; पण कादंबरी लिहिण्याआधीची प्रक्रियाही समजून घेता आली.अपयशाच्या रात्री पचवणं अवघड होतं, समजून घेणारं कोणी जवळ नव्हतं. पाहिजे तसं का होत नाही, जे दिसतेय त्यावर कुणी का बोलत नाही, ज्यांची गरज नाही त्याच विषयांवर का परत परत बोललं जातंय, पिळवटून टाकणारा आक्रोश किंकाळी बनून, आसमान का छेदत नाही? अशा असंख्य प्रश्नांच्या जंजाळात अडकलेलो असताना कविता हाती आली नसती, पार आतून अस्वस्थ करणाऱ्या हजारो क्षणांनी जगणं नकोसं केलं असतं. प्रत्येक श्वास म्हणजे, फक्त तडफड राहिली असती.शब्दांकन : विष्णू जोशीvishnujoshi80@gmail.com